Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

अमळनेरच्या आमसभेत समस्यांचे वास्तववादी दर्शन
वार्ताहर / अमळनेर

सभापती, जिल्हा परिषद सदस्यांमधील खडाजंगी, वीज, महसूल, रस्ते यासंबंधी तक्रारींचा पाऊस आणि त्याला उत्तर देतादेता अधिकाऱ्यांची झालेली दमछाक व निर्भयपणे जाब विचारणारी जनता हे चित्र होत येथे आयोजित आमसभेचे. तब्बल साडेचार तास चाललेल्या आमसभेमुळे मुलभूत प्रश्न कसे कायम आहेत त्याचे दर्शन यानिमित्ताने झाले. या आमसभेत सर्वात जास्त तक्रारी वीज, महसूल, पुरवठा खाते आणि रस्ते यांच्याबाबतीत होत्या. वीज भारनियमन व्यतिरिक्त ट्रान्सफॉर्मर वेळेवर न मिळणे, वीज साहित्यासाठी जनतेकडून पैसे घेवून पुरवठा करणे, खोटय़ा केसेस करणे, नवीन जोडणीसाठी पैशांची मागणी करणे, लोखंडी जुने खांब न बदलणे अशा तक्रारी मोठय़ा प्रमाणावर होत्या.

घरपट्टी, पाणीपट्टी वाढ; भाजपचा आंदोलनाचा इशारा
वार्ताहर / जळगाव

महापालिकेच्या या आठवडय़ात होऊ घातलेल्या स्थायी समिती सभेत घरपट्टी आणि पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव असून शहरवासियांना मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यास अयशस्वी ठरलेल्या सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात महानगर भाजपाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते आ. सुरेश जैन हे आठवडाभरात सेना व भाजप यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करावा, हे जाहीर करणार असतानाच भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्याने जैन हे सेनेमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. महानगर भाजपतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात सत्ताधारी गटाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका सत्ताधारी व प्रशासनाने करवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा, असे भाजपने म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोध न जुमानता करवाढीचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केलाच तर भाजप महासभेत तसेच रस्त्यावर येऊन तीव्र विरोध करेल असेही पत्रकात म्हटले आहे. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था बिकट असतानाच स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्येही नाराजी आहे. विकासकामांकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी राजकारण करण्यातच मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरवासियांना स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, दिवाबत्ती, शहरातील रस्त्याचंी साफसफाई आदी मूलभूत सुविधा देण्यास सत्ताधारी अयशस्वी ठरले आहेत. स्वकर्तृत्वाचा डंका पिटणाऱ्या सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेत सादर करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात घरपट्टीमध्ये दुपटीने तर पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महापालिकेने गेल्या दहा वर्षांत शहरात कोणताच प्रकल्प राबविलेला नाही, जे राबविले ते अपूर्णावस्थेत आहेत. या आर्थिक वर्षांत शहरातील नागरिकांनी घर व पाणी कराची रक्कम वेळेवर भरून महापालिकेच्या महसुलात मोठी भर घातली असतांना सत्ताधारी याचा फायदा घेत मोठी वाढ करण्याचा प्रयत्न करित असल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. सध्या जागतिक मंदीचा फटका सर्वसामान्यांनाही बसला असतांना महापालिका नागरिकांवर करवाढीचा बोझा ठेवू पाहत आहे. प्रशासन व सत्ताधारी जमा होणाऱ्या रकमेतून जुनी नगरपालिका, खाजामिया झोपडपट्टीची जागा व साने गुरूजी रूग्णालयाच्या जागांवर व्यापारी संकुल बांधण्याच्या विचारात असल्याचा आरोप करून यात मोठा भ्रष्टाचार होणार असल्याचा संशय महानगर भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. मनपा विरोधी पक्षनेते सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवकांच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत

मराठा आरक्षणाला अत्तार समाजाचा विरोध
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक शहरातील अत्तार समाजासह इतर अनेक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला तीव्र विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ओबीसी समाजाच्या कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला धक्का लागल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील,असा इशारा देण्यात आला आहे.