Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

विशेष

अनिश्चिततेचा खेळ
बाजारातील किंवा बाजाराविषयीची अनिश्चितता हा अतिशय महत्त्वाचा असा मार्केट मेकर आहे. सध्या जगभरच मंदीची चर्चा सुरू आहे आणि त्यातच भर म्हणून नवनवीन आर्थिक घोटाळे सध्या उघडकीस येत आहे. त्यातून अनिश्चितता निर्माण होते किंवा आधीच असलेल्या अनिश्चितेत आणखीन भर पडते अशा तात्कालिक अर्थाने अर्थाने तर ते खरे आहेच. पण तितकेच ते प्रत्येक बाजार सहभाग्याच्या (मार्केट इंटरमीडिअरीज) प्रत्येक गोष्टीतील सहभाग आणि प्रतिक्रिया यातूनही अशी अनिश्चितता निर्माण होत असते. आजुबाजूच्या आर्थिक तसेच इतर घटकांवर बाजारात प्रतिक्रिया उमटत असतात आणि बाजारातील घडामोडींवर इतरत्र प्रतिक्रिया जन्माला येत असतात. ही प्रक्रिया सदैवच सुरू असते. यातून अशी अनिश्चितता हा बाजाराचा स्थायीभाव बनला आहे. जणू काही अनिश्चितता हेच भांडवल-बाजाराचे दुसरे नाव असते असे मत त्यामुळेच तयार होते.

गॅलिलिओने दिली संशोधनाला नवी दिशा
चारशे वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. १६०९ मध्ये इटलीमधील एका विद्वान माणसानं नुकत्याच शोध लागलेल्या, परंतु एक खेळणं म्हणून विकल्या जाणाऱ्या उपकरणाचं खरं सामथ्र्य जाणून त्याचा उपयोग अशा अभिनव पद्धतीनं केला होता, की विज्ञानाला तसेच संशोधनाच्या एकूणच विचारसरणीला त्यामुळे संपूर्णपणे वेगळी दिशा मिळाली. ज्या उपकरणानं ही मोठी क्रांती विज्ञानाच्या क्षेत्रात घडवली ते उपकरण होतं दुर्बीण आणि तो विद्वान मानव होता गॅलिलिओ गॅलिली! त्याच दुर्बिणीच्या शोधाला चारशे र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण यंदा खगोलशास्त्र वर्ष साजरं करीत आहोत. तो काळ असा होता, की सर्वच वैज्ञानिक त्यांना पडलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अ‍ॅरिस्टॉटलच्या लिखाणात शोधत असत.

‘तात्यानू, ‘क्रांती’ म्हणजे काय हो?’ ‘बाबल्या, मेल्या तुका एवढाय माहीत नाय, ‘क्रांती’ नावाचो मनोजकुमारचो पिक्चर होतो’
‘त्या’ ‘क्रांती’चा नाय हो बोलणय.’
‘मग आणखी खयची ‘क्रांती’?’
‘ती हो पेटून उठतत ती ‘क्रांती!’’
‘बाबल्या, तू काय मेल्या त्या विद्रोही संमेलनाक गेललय की काय?’
‘बरोबर, पण तुमी कसा ओळखल्यात?’
‘माका म्हायत आसा विद्रोह्य़ांचा आणि ‘क्रांती’चा काय नाता आसा ता?’
‘‘गेल्या शनवार-रविवारी सुट्टी होती म्हणान गेललय कणकवलीच्या संमेलनाक. तेच्येत प्रत्येक भाषणात ‘क्रांती’ शब्द इतकेदा ऐकल्यानी की माझा डोक्या आता भणभणू लागला’
‘रात्री झोपेतय माका आता ‘क्रांती’च दिसतासा’
‘तुका सांगलला कोणी त्या संमेलनाक जावक्. तुझो आणि विद्रोही चो काडीमात्र तरी संबंध आसा काय?’
‘तसा नाय हो तात्यानू, आपल्या कणकवलीत होता, म्हटला बघया तरी जावन्’
‘मग थयसर जावन् काय मोठो वाघ मारलाय? भाषणा कशी झाली?’
‘भाषणा झकास झाली.. पण माका काय समजूक नाय’
‘‘अरे म्हणान तर म्हटललय, तुझो आणि विद्रोही संमेलनाचो संबंध काय? तू काय पुरोगामी आसय, की क्रांतिकारी आसय? तू काय लोका पेटून उठतील अश्यो क्रांतिकारी कविता करतय? आयुष्यात तू एकच कविता केलय आणि ती होती कोकणाच्या सौंदर्यायार. गावच्या तिथॅटर विडय़ो फुकीत गेला तुझा आयुष्य.. तू काय विद्रोही आसय? मग तुका समजतली कशी भाषणा?’’
‘तात्यानू, तुमच्या सांगण्यानुसार मी विद्रोही नाय.. पण सर्वसामान्य माणूस तर आसय.’
‘‘ह्य़ा बघ बाबल्या तुका विद्रोही जाव्क तुझो मेकअप बदलूचो लागतलोच पण सतत तोंडात ‘क्रांती’ची भाषा व्होयी.’’
‘तात्यानू, आता बस करा, परत ‘क्रांती’ बोलू नकात. ह्य़ो शब्द दोन दिस ऐकून-ऐकून मी पुरतो बेजार झालसय’
‘सोडून दी, मग तु काय विद्रोही जाव शकणय नाय.. हा लक्षात ठेव! तू निदान महाबळेश्वर नाय तर अमेरिकेतल्या साहित्य संमेलनाक जा.’’
‘‘काय तात्यानू. थट्टा करतात काय, या दोनच ठिकाणी जावची माझी आर्थिक कुवत नाय. मी कणकवली ते मुंबयसुद्धा हल्ली ८० रुपयांत पॅसेंजर गाडीन जातय्.’’
‘‘तुझा फुकट आसा आयुष्य. तुझ्या जीवनात जर साहित्याचो लवलेश नसात तू त्या आयुष्य जगूक लायक नाय. अरे कसलाय साहित्यसंमेलन, मग ता ब्राह्मणांचा असो, दलितांचा असो, मऱ्हाठय़ांचा असो नाय तर विद्रोही असो खयतरी तुका जावकच व्होया..
‘‘पण तात्यानू, मी कित्याक जाव.. त्येच्यामुळे माझ्या आयुष्यात काडीचोय फरक पडूचो नाय.. ह्य़ा साहित्य आमच्या सर्वसामान्यांसाठी नाय, ता आसा केवळ साडेतीन टक्के लोकांसाठी..’’
‘बघ, शेवटी तू झालय विद्रोही!’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com