Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गुंडगिरीबद्दल गुन्हा का नोंदवला नाही ?
सुरक्षा रक्षक काय करत होते ?
‘टेंडर सेल’ ताब्यात घेण्याच्या प्रकाराबद्दल संस्था-संघटनांकडून विचारणा
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नगरसेवक महापालिका भवनात खुलेआम गुंडगिरी करत असताना महापालिकेचा सुरक्षा विभाग काय करत होता आणि एवढय़ा गंभीर प्रकारानंतरही महापालिकेने पोलिसांकडे तक्रार का दाखल केली नाही, अशी विचारणा सर्व स्तरांतून केली जात आहे.
महापालिकेचा ‘टेंडर सेल’ ताब्यात घेऊन १२० कोटी रुपयांच्या निविदा हितसंबंधियांनाच भरता याव्यात यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी शंभर ते दीडशे तरुणांच्या मदतीने ही प्रक्रियाच ताब्यात घेण्याचा प्रकार सोमवारी पालिका भवनात केला. या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या असून पुण्याचा बिहार होण्याची ही प्रक्रिया तातडीने थांबवा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
‘हा संगनमताचा गुन्हा’
‘टेंडर प्रक्रिये’ची अब्रू सशस्त्र गुंडांनी वेशीवर टांगल्यानंतर गुन्हेगारांना जबर शासन होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने काय केले, असा प्रश्न सुराज्य संघर्ष समिती, क्रिएटिव्ह फाऊंडेशन, पीएमपी प्रवासी मंच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, आरपीआय युवक विभाग आदींनी आयुक्तांना विचारला आहे. हा सर्व प्रकार संगनमतानेच घडल्याची शंका आम्हाला वाटते. गुन्हा घडल्यानंतर त्याबाबत पोलिसांना माहिती न देणे हे गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासारखेच आहे. या काळात सुरक्षा रक्षक काय करत होते, असे प्रश्न या संघटनांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून विचारले आहेत.
‘पुण्यासाठी लाजीरवाणी घटना’
महापालिकेचा ‘टेंडर सेल’ ताब्यात घेऊन जे भीषण व लाजीरवाणे प्रकार करण्यात आले, त्याने पुण्याची मान शरमेने खाली गेली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रा. विकास मठकरी, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर आणि नगरसेवक अशोक येनपुरे यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. मुळात असे प्रकार घडू नयेत म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया ‘ऑन लाईन’ का केली जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
‘प्रक्रिया रद्द करा’
गोंधळ व गडबडीत झालेली ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून या निविदा नव्याने भरून घ्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते आबा बागूल यांनी केली आहे. घटना अत्यंत खेदजनक असून महापालिकेतच कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. नगरसेवक अविनाश बागवे यांनी या प्रकाराला महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले असून ‘टेंडर सेल’मधील भ्रष्टाचारामुळेच तेथे असे प्रकार घडतात. आता तरी संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘प्रशासनाचे बोटचेपे धोरण’
झालेल्या प्रकाराचा आमदार विनायक निम्हण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषी नगरसेवकांवर आणि गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकाराबाबत सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत, धक्काबुक्की करणे असे गुन्हा का दाखल केले नाहीत, अशीही विचारणा त्यांनी केली आहे. प्रशासनाचे या प्रकारातील संपूर्ण धोरण बोटचेपे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
‘आमचा संबंध नाही’
काँग्रेसचे नगरसेवक शैलेंद्र नलावडे आणि संजय नांदे हे या प्रकरणात सहभागी नव्हते. तर त्या भागात गडबड झाल्याचे कळल्यावरून काय झाले हे बघायला ते तिकडे गेले होते, असा दावा बागूल यांनी केला आहे. त्या भागात लाठीमार झाल्याचे दिसताच आम्ही तिकडून पळून आलो. आमचा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही, असे नांदे म्हणाले. राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे म्हणाले की, सभागृहनेते अनिल भोसले यांनी मला सांगितले की तिकडे काही तरी गडबड झाली आहे. तिकडे टेंडर भरून दिली जात नाहीयेत. काय झाले ते पाहा. म्हणून मी तिकडे जायला निघालो होतो, तर तेथे मला नगरसेवक सुनील टिंगरे आणि बाळासाहेब बोडके भेटले. फक्त गोंधळ झाला म्हणून तो बघायला आम्ही तिकडे गेलो होतो. पण तोवर निविदा भरण्याची प्रक्रिया संपलेली होती.
दरम्यान, या प्रकारासंबंधी चौकशी करून अहवाल तयार करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले असून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.