Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महाविद्यालयांमध्ये वाहताहेत ‘डेज’चे वारे
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ट्रॅडिशनल डे, वार्षिक स्नेहसंमेलन, युवक महोत्सव अनेक महाविद्यालयामध्ये सुरू असून यामध्ये नृत्य, नाटय़ सादर करण्यासाठी लागणारे पोषाख घेण्यासाठी शहरातील विविध वेशभूषाकारांकडे विद्यार्थ्यांची

 

एकच झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.
शहरामधील महाविद्यालयांतील स्नेहसंमेलने, युवक महोत्सवामध्ये नाटय़ापासून ते पाश्चिमात्य संगीताचे प्रयोग एकाच व्यासपीठावर सादर केले जातात. यातील नाटकांमध्ये पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक संगीत नाटके, महाराष्ट्राची लोककला असे विविध कार्यक्रम सादर केले जातात. या कार्यक्रमांसाठी लागणारे पोषाख, टोप, नकली दाढी, मिशा, तलवारी आदी साहित्य उपलब्ध असून येथून विद्यार्थी हे साहित्य भाडय़ाने घेत आहेत.
सध्या सर्व महोत्सवामध्ये पाश्चिमात्य संगीताकडे तरुण पिढी वळलेली पाहायला मिळत असून, विविध ‘ट्रॅडिशनल डे’च्या माध्यमातून या संगीतानुसार आपले पोषाख खरेदी करत आहेत.
याबद्दल जाधव ड्रेपरीचे वीरेंद्र जाधव यांनी सांगितले की, सध्या ट्रॅडिशनल डे हे जास्त साजरे केले जातात. तसेच पौराणिक, ऐतिहासिक नाटकेही सादर करण्यात येतात, परंतु सध्याची पिढी नाटक हे कला म्हणून न करता एक मनोरंजन म्हणून सादर करत आहे. एखादे पौराणिक पात्र सादर करताना, गमती जमती करताना ही तरुण पिढी दिसत आहे.
आमच्याकडे राजे, देव, लोकमान्य टिळक, पंडित नेहरूंबरोबरच अरबी, पंजाबी, स्त्रियांना लागणारे विविध पोषाख आहेत. रघुनाथ ड्रेपरीचे मिलिंद करबेळेकर म्हणाले, तरुणांमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’च्या पोषाखास सर्वात जास्त मागणी असून लहान मुले ही प्राणी, पक्षी, फळे, फुले यांना पसंत करत आहेत. तसेच फॅन्सी ड्रेसचाही भरपूर वापर होत आहे.
सध्या हिंदी चित्रपटातील गीतांवर नृत्य अधिक प्रमाणात केले जात आहे. आमच्याकडे शंभरपासून ते चारशे रुपायांपर्यंत पोषाख भाडय़ाने मिळतात.