Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अजित बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी सहा महिन्यांत मिळणार
पुणे, ३ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

अजित सहकारी बँकेवर अवसायक मंडळ नेमण्यात आले असले तरी ‘ठेव विमा महामंडळा’च्या सुरक्षा कवचामुळे एक लाख रुपयांच्या आत ठेवी असलेल्या सुमारे ३४ हजार ठेवीदारांचे पैसे परत मिळणार आहेत. या ठेवीदारांना साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत ठेवी परत करण्यात येणार

 

आहेत.
जिल्हा उपनिबंधक सुनील देशमुख यांनी ही माहिती दिली. अजित बँकेवर अवसायक मंडळ नेमण्यात आले आहे. त्यात उपनिबंधक कैलास वाबळे, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे व लेखापरीक्षक पाखले यांचा समावेश आहे. या अवसायक मंडळामार्फत बँकेच्या दोषी संचालकांकडील थकबाकी वसूल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित बँकेवर अवसायक नेमण्याचा आदेश भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने नुकताच दिला आहे. बँकेवर अवसायक नेमण्यात आला असला तरी ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. बँकेचे ३४ हजार ८०० ठेवीदार आहेत. त्यातील ३४ हजार १५० ठेवीदार एक लाख रुपयांच्या आत ठेवी असणारे आहेत. एका लाखांपर्यंतच्या ठेवींना ‘ठेव विमा संरक्षण महामंडळा’ची सुरक्षा आहे. महामंडळाकडून ही रक्कम घेण्यासाठी सहा महिन्यांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येतील. लाखापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेले ६४० ठेवीदार आहेत. त्यांना लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. त्यानंतर दहा ते बारा कोटींच्या परताव्याचा प्रश्न उरणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
बँकेत सुमारे ३७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात बँकेच्या माजी अध्यक्षांसह चार संचालकांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष विलास सरनोबत यांच्याकडे ९ कोटी ८६ लाख, किशोर कुंजीर यांच्याकडे ८ कोटी ६५ लाख, राजेंद्र कोंडे यांच्याकडे ५ कोटी ८९ लाख व राजू जवळेकर यांच्याकडे १० कोटी ९८ लाख रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली आहे. सरनोबत यांनी त्यापैकी १ कोटी ४५ लाख, कुंजीर यांनी २ कोटी ५ लाख, कोंडे यांनी साडेनऊ लाख व जवळेकर यांनी २८ लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांची वसुली करायची असल्याने त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, बँकेवर नेमलेले अवसायक मंडळ, बँकेची वसुली, ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न यासंदर्भात सहकार आयुक्त, ठेवीदार संघटना व अवसायक मंडळाच्या सदस्यांची उद्या, बुधवारी बैठक होणार आहे.