Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

ससूनमध्येही होणार आता ‘आऊटसोर्सिग’!
भोजन, धुलाई, स्वच्छतेसाठी प्रस्ताव
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

ससून रुग्णालयातील कपडय़ांची धुलाई, विविध ठिकाणची स्वच्छता तसेच रुग्णांना मोफत दिले जाणारे जेवण बनविण्यासाठी खासगी संस्थांना कंत्राट देण्याचा प्रस्ताव ‘बीजे’ मार्फत वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात पुणे, मुंबई आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्याचा विचार उच्चस्तरावर सुरू

 

आहे.
ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना महाविद्यालय प्रशासनाने तातडीने खासगी सुरक्षा संस्थेला काम देऊन टाकले. त्यानंतर महाविद्यालय, रुग्णालय तसेच विद्यार्थ्यांचे वसतिगृहात सुरक्षारक्षक तैनात असल्याचे दिसते. यासंदर्भात बीजेच्या अधिष्ठाता डॉ. निर्मला बोराडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘‘सध्या रुग्णालयातील वॉर्ड, स्वच्छतागृहे, ओपीडी, आवार तसेच विविध ठिकाणची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाते. वॉर्डातील खाटांवर वापरल्या जाणाऱ्या बेडशीट, उशीचे कव्हर, पडदे, कपडे आदी कपडय़ांची धुलाई बाहेरून केली जाते. रुग्णांना मोफत जेवण देण्यासाठी रुग्णालयात असलेल्या किचनमध्ये हे अन्न शिजविले जाते. त्यानंतर ते रुग्णांना वितरित केले जाते. मात्र आता या तीनही कामांचे ‘आऊटसोर्सिग’ करण्याचा महाविद्यालय प्रशासन विचार करीत आहे. त्यासाठी खासगी संस्थांमार्फत ही कामे करून घेता येईल काय, असा विचार सुरू आहे.’’
त्यासंदर्भात महाविद्यालयाकडून लवकरच वैद्यकीय शिक्षण खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याबाबत खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी स्वच्छतेबाबत काही ठिकाणांची पाहणी केली. ठिकाणे निश्चित केली आहेत. तसेच सध्याच्या किचनमधून जेवण तयार करून दिले जाते. मात्र खासगी संस्थांना कंत्राट देताना त्यांनी जेवण तयार करून आणावे आणि रुग्णालयात वाटप करावे किंवा परिसरात अन्न शिजविण्यासाठी रुग्णालयाने जागा द्यावी, यासाठी विचार करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे धुलाईचे कंत्राट कसे देता येईल तसेच प्रत्येक कामाचा खर्च किती येईल याचा विचार केला जात आहे. याबाबत लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे डॉ. बोराडे यांनी सांगितले.