Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रोग्रेसिव्ह सोसायटी-‘लोकसत्तात’र्फे राज्यव्यापी शैक्षणिक व्याख्यानमाला
पुणे, ३ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि लोकसत्तातर्फे ‘उच्चशिक्षण-दशा आणि दिशा’ या विषयावर राज्यव्यापी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव आणि ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या उपस्थितीत

 

येत्या शनिवारी (दि. ७) पुण्यात तिचे उद्घाटन होणार आहे.
पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यंदा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने लोकसत्ताच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी त्याबाबत माहिती दिली. शालेय शिक्षणाविषयी राज्यभर विविध उपक्रम, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. परंतु, एकविसाव्या शतकाला साजेशा उच्चशिक्षणाविषयी फारशी जागरूकता नाही.
राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या (नॉलेज कमिशन) शिफारशींबाबत विद्यार्थी-पालकच नव्हे, तर शिक्षकांनाही त्रोटक माहिती आहे. उच्चशिक्षणाचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र संस्था (ऐरा) स्थापन करण्यात येत आहे. त्याचीही फारशी माहिती शिक्षण क्षेत्रामध्ये नाही. दुसरीकडे उच्चशिक्षणावर जाहीरपणे अविश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
उच्च व व्यवसायशिक्षण देणाऱ्या संस्था म्हणजे पैसे उकळण्याची कुरणे झाली आहेत, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रातील घडामोडींचा नेमका वेध घेण्याची गरज आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा डॉ. एकबोटे यांनी व्यक्त केली.
या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत होणार आहे.
त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, मुंबई अशा राज्याच्या सर्व विभागांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. उच्च व व्यवसायशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून त्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
संबंधित शहरांमधील विद्यापीठांमधील शिक्षक, विद्यार्थी संघटना, पालकवर्ग आदींना या व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे व्याख्यानानंतर तज्ज्ञांसमवेत प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी समुपदेशनही केले जाईल.
मुंबईतील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांना आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू आहे.