Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘धनगर समाजाला आरक्षण हे राज्यघटनेनुसार योग्यच’
शिरूर, ३ फेब्रुवारी /वार्ताहर

‘मराठा समाज आरक्षण मागतो आहे म्हणून धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केलेली नाही. घटनेने धनगर समाजास दिलेल्या आरक्षणानुसारच धनगर समाजास अनुसूचित जातीत समाविष्ट करावे, अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. शासनाने या मागणीकडे लक्ष न दिल्यास समाजातील युवक कार्यकर्ते जलसमाधी व आत्महत्या करतील असा इशारा महाराष्ट्राचे माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शिरूर येथे

 

दिला.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीकरिता धनगर समाजाचा विराट मोर्चा शिरूर तहसील कार्यालयावर आज काढण्यात आला. शिरूर शहरातील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरवात झाली. हजारो धनगर समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. पुणे-नगर रस्त्याने मोर्चा तहसील कार्यालयावर आला. या ठिकाणी नायब तहसीलदार हृषीकेश शेळके यांना मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री अण्णा डांगे व महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे माजी अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी केले.
तहसील कार्यालयासमोरील सभेत बोलताना डांगे म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर ६० वषार्ंमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांला मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र २ कोटी धनगर समाजाची लोकसंख्या असतानाही या समाजाचा एकही कार्यकर्ता खासदार झाला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार केला असता महाराष्ट्राच्या विधिमंडळात ३७ ते ४० आमदार धनगर समाजाचे असावयास हवेत मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार विधिमंडळात आहेत.
मागच्या निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी धनगर समाजातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या पक्षांनी धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची टीका डांगे यांनी केली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी धनगर समाजाकरिता स्वतंत्र महामंडळे निर्माण करण्याचे जाहीर केले होते. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही, असे डांगे म्हणाले. आपल्याला देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. प्रवेश करून अडीचतीन वर्षे झाली, पण धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्याची मागणी पूर्ण झाली नसल्याचे डांगे यांनी सांगितले.
सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विचार करणार नसेल तर इतर समाजातील मागास लोकांच्या आरक्षणासंदर्भातही शासनाला विचार करावाच लागेल, असे डांगे म्हणाले. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीकरिता सर्व धनगर समाजाने एकत्रित लढा उभारावा, असे आवाहन डांगे यांनी केले.
आमदार प्रकाश शेंडगे या वेळी बोलताना म्हणाले, की धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे, हे शासनास ठणकावून सांगण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. धनगर व धनगड अशा शब्दजंजाळात अडकवून धनगर समाजास एसटी प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भात वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठविला असे शेंडगे यांनी सांगितले.
यशवंत सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बिडगर, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा अलका घोडे, पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कोळेकर, शिरूर विभाग आरक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावडे, रामहरी रुपनवर यांची या वेळी भाषणे झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सरके या वेळी उपस्थित होत्या.