Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

लाचप्रकरणी ‘सीईओ’सह अभियंत्यास शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
सोन्याचे लगड सापडले
पुणे, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सव्वालाख रुपयांच्या लाचेसह देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार यांच्या गाडीत सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे लगड सापडल्याची माहिती सीबीआयचे वरिष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. एजाज खान यांनी न्यायालयात दिली. अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, ही सीबीआयची मागणी मान्य करून दोघांची सहा फेब्रुवारीपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे

 

आदेश विशेष न्यायाधीश पी. आर. बोरा यांनी दिले.
या संदर्भात आनंद इंजिनिअरिंगचे रमेश चुघ यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सव्वालाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांची रक्कम जप्त केली. या दोघांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी येथील न्यायालयात आज हजर केले. त्यावेळी सीबीआयचे वरिष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. एजाज खान आणि अ‍ॅड. मोहनराव देशमुख यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. खान म्हणाले, ‘‘ प्रामुख्याने लाच घेतल्याचा खरा गुन्हा हा राजेंद्र पवार यांच्या विरोधात आहे. लाच घेतल्याची शहानिशा करताना शशिकांत शिंदे यांचे नाव पुढे आले. त्यामुळे दोघांना अटक केली. या दोघांचा नेमका आणि अन्य अधिकाऱ्यांचा काय संबंध आहे? तसेच गुन्हा अत्यंत चलाखीने करण्यात आला असून कार्यालय बंद झाल्यानंतर पैसे हातात घेण्याऐवजी खुर्चीवर पैसे ठेवले होते. तसेच पवार यांच्या घराची झडती घेता ८२ हजार रुपये तसेच साडेतीन लाखांचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणात शिंदेने पवार यांना मदत केली. दोघांची झडती घेण्यात आली. पवार यांनी साडेतीन लाखांची मागणी केली होती. हे प्रकरण साधे नसल्याने त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे.’’
यावर राजेंद्र पवार यांच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. रक्कम जप्त झाली आहे. ८२ हजारांच्या रकमेबाबत नंतर स्पष्टीकरण देऊ तसेच दोन भिन्न गोष्टी एकत्र करण्याचा सीबीआय प्रयत्न करीत आहेत, असे ते म्हणाले. तर, ‘ शिंदे याने पैश्याची मागणी केली नाही. तसेच पैसे घेतले नाही. पैसे कार्यालयाच्या मोकळ्या आवारात ठेवले होते. तसेच शिंदे याला २५ हजार वेतन असून त्याची बायको शिक्षिका आहे. त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही’, असे अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. एल. एम. कौशल यांनी शिंदे याच्या वतीने सांगितले.