Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शिरूरमध्ये तोडफोडीच्या राजकारणाला ऊत
मंचर, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्यास अनेक कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. पक्षसंघटनेत, स्थानिक स्वराज्य निवडणुका किंवा वैयक्तिक काम न झाल्याने दुखावलेले काही कार्यकर्ते

 

नेत्यांना धक्का देण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना-भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी लक्ष्य केले आहे. विशेषत: फेब्रुवारी महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात कृषिमंत्री शरद पवार यांच्या खेड, जुन्नर आदी ठिकाणी सभा व मेळावे होणार आहेत. तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिक्रापूर येथील मेळाव्यात अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे समजते. तूर्त तरी तोडाफोडीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष सरसावलेले दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा, उमेदवारांच्या नावांच्या घोषणा अजून व्हायच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची, शिवसेना-भाजप अशी युती कायम राहण्याची चिन्हे आहे. त्यादृष्टीने आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्ष आग्रही आहे. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाढीव लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्याने हा मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपापेक्षा कर्नाटक-महाराष्ट्र सीमा यामुळे ठिणगी पडली आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. तेथील मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याने शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. या दोन्ही मित्रपक्षांमध्ये गढूळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी समिती नेमून त्याद्वारे चर्चेची फेरी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जागावाटप निश्चित नाही. उमेदवार निश्चित नाही. निवडणूक आयोगाच्या तारखा निश्चित नाहीत, परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांची निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार असे निश्चित मानले जात आहे. दोन्ही दिग्गज नेते निवडणुकीत एकमेकांना सामोरे जाणार म्हटल्यावर तोडफोड करून पक्षप्रवेश केलेले कार्यकर्ते महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काही ना काही कारणास्तव दुखावलेले आहेत. नेत्यांना किंवा तालुका लोकप्रतिनिधींना अद्दल घडविण्यासाठी हीच लोकसभा निवडणुकीची पर्वणी मानून पक्षांतराच्या पक्षप्रवेशासाठी काही कार्यकर्त्यांनी बोलणी सुरू केली आहेत. कार्यकर्त्यांची तोडफोड केल्यावर आपोआपच नेत्यांची लढाईची ताकद खच्ची होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. शिरूर तालुका भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शब्द झेलणारा कार्यकर्ता म्हणून सन २००५ पर्यंत परिचित होते. परंतु त्या वेळी शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोपटराव गावडे यांना उमेदवारी दिल्याने ऐनवेळी भाजपच्या उमेदवारीवर बाबुराव पाचर्णे हे विजयी झाले.
त्यानंतर बाबुराव पाचर्णे हे शरद पवारांपासून दूर गेले असले तरी गेल्या एक-दीड वर्षांपासून पुन्हा पाचर्णे हे शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या संपर्कात आले. अनेक जाहीर कार्यक्रमांत पाचर्णे यांनी पवार यांच्या कामकाजाचा गौरव केला आहे. तसेच पाचर्णे आणि त्यांचे सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
या पाश्र्वभूमीवर खेड तालुक्याच्या दौऱ्यावर पवार येणार आहेत. त्या वेळी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या झंझावाती दौऱ्यात विरोधकांपैकी कोण केव्हा सामील होईल याचा भरवसा नाही.
जुन्नर तालुक्यात आळे येथे शेतकरी मेळावा होणार आहे. तेथेही काही शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सांगितले.
शिक्रापूर येथे सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्या वेळी आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती वसंतराव भालेराव सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.
त्यामुळे नेतेमंडळींनी आपल्या पक्षामधून कोणी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही, याकडे बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली असली तरी तोडफोडीचे राजकारण होणार हे निश्चित!