Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘कठीण परिश्रम, शिस्त, सततचा सराव यांमुळे स्पर्धात्मक युगात यश मिळविण्याची ताकद विद्यार्थ्यांंच्यात निर्माण होईल’
पुणे, ३ फेब्रुवारी /प्रतिनिधी

कठिण परिश्रम, शिस्त, अहंकार न बाळगणे व सतत सराव करणे यासारख्या गोष्टींवर विद्यार्थी दशेतच प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित केल्यास आजच्या स्पर्धात्मक युगातही यश मिळविण्याची जबरदस्त ताकद

 

तुमच्यात निर्माण होईल, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनी आज व्यक्त केले.
नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या व्ही. एस. देवधर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. डी. बकरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हेमंत देवस्थळी, सचिव प्रा. के. एस. पिंगळे, विद्यापीठ प्रतिनिधी जयेश भानुशाली, जी.एस. अनिश धोत्रे, विद्यार्थिनी प्रतिनिधी राधा सराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, आपले प्रशिक्षक किंवा वरिष्ठांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे कौशल्य खेळाडूंमध्ये असायला हवे. सराव आणि शिस्त यासारख्या छोटय़ा गोष्टीदेखील यश मिळविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे शिस्त व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे.
महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या वार्षकि क्रीडा व कला प्रकारांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. गायनामध्ये नितीन सरोदे व प्रसाद जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून जयेश भानुशाली तर उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तनया भरूचा तसेच नृत्याचे पारितोषिक मुलांमध्ये अनिश धोत्रे याने तर मुलींमध्ये माधवी गुर्जल यांनी पटकाविले. तसेच उत्कृष्ट नायक म्हणून आशुतोष पाटणे, बेस्ट माऊंटेरिंग म्हणून संदेश मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून विघ्नेश ठुबे व उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आरती शिंदे हिला गौरविण्यात आले. या बरोबर वक्तृत्व, निबंध, वादविवाद, खेळामध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांंचाही या वेळी सत्कार करण्यात आला.