Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गाडीच्या चालकाचा खून करणाऱ्या तिघांना अटक
दौंड, ३ फेब्रुवारी / वार्ताह

दौंड बारामती रस्त्यावर जिरेगाव येथील स्टोन क्रशरजवळ गळा आवळून खून करून टाकलेल्या हडपसर येथील कॉल सेंटरच्या गाडीच्या चालकाच्या खुनाचा तपास दोन आठवडय़ात करून खुनाशी संबंधित व्यक्तींना दौड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सूर्यकांत पोपट रणदिवे (वय २० रा. पारगाव ता. दौंड) माऊली ऊर्फ भाऊ मच्छिंद्र बांदल (रा. पारगाव) विजय गवारे (रा. शिरूर) यांना

 

सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
येत्या १५ जानेवारी रोजी कॉल सेंटरच्या एका गाडीचा चालक पंडित जगन्नाथ शिंदे याचा मृतदेह जिरेगाव येथील स्टोनक्रशर जवळ आढळून आला होता. वैद्यकीय अहवालानुसार त्याचा गळा आवळल्याने मृत्यू झाला होता. त्याच्या शर्टवरील ह्रल्ल२ि या इंग्रजी अक्षरावरून दौंड पोलिसांनी पुणे येथे शोध घेतला असता, पंडित शिंदे हा डिजीटल ट्रान्सपोर्टकडे कॉलसेंटरच्या कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या गाडीवर चालक असल्याची माहिती मिळाली. १४ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता त्याने कर्मचाऱ्यांना कॉल सेंटरवर सोडले. त्यानंतर रात्री १० वाजता दुसऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सोडवायचे होते. परंतु तो कामाच्या ठिकाणी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला.
दौंड पोलिसांनी पंडित शिंदे याच्या मोबाईलवर आलेल्या फोनचा तपशील संबंधित मोबाईल मिळवला व त्यानुसार आरोपींना ताब्यात घेतले. तिघांनीही पंडित शिंदे याचा खून त्याच्याकडील इंडिका गाडी पळवून कंपनीत भाडय़ाने देण्यासाठी केल्याचे कबूल केले. पंडित शिंदे याला तिघांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भाडय़ाने गाडी पाहिजे म्हणून १४ जानेवारीला रात्री बोलावून घेतले होते व त्याचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह गिरेगाव येथे आडमार्गाला टाकून दिला. शिंदेचा मोबाईल संच व इंडिका गाडीसह पलायन केले. परंतु खुनाच्या प्रकाराने घाबरून इंडिका गाडी रस्त्यात सोडून दिली व शिंदेच्या मोबाईल संचातील सिमकार्ड काढून तो हँडसेट खैरे नावाच्या व्यक्तीला विकला.
या प्रकरणी दौंडचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्यासह जगन्नाथ अहिरे, विठ्ठल वारघट, महेंद्र गायकवाड, एस. के. थोरात, संतोष कदम, एस. एन. कुंभार, एस. सी. थोरात यांनी वेगाने तपास केला.