Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही शौचालयांच्या व्यवस्थेची मागणी
मंचर, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

गुडमॉर्निग पथकाने सकाळी उघडय़ावर शौचास बसणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांवरही कारवाई

 

केल्याचे निदर्शनास आले असल्याने अशा चालक वाहकांना नाहकपणे बदनामीला सामोरे जावे लागत आहे. एस.टी. महामंडळाच्या बसेस मुक्कामी जातात अशा गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने वाहक आणि चालक यांच्यासाठी शौचालये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एसटीच्या चालक-वाहकांनी केली आहे. शौचालयाची सोय उपलब्ध करून न दिल्यास संबंधित गावातील एस.टी.चे मुक्काम बंद करावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने ‘निर्मलग्रामचा’ अभिनव उपक्रम हाती घेतला असताना शौचालये नसलेल्या अनेक गावांमध्ये गुडमॉर्निग पथकाद्वारे धाड टाकून उघडय़ावर शौचास बसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एसटी महामंडळाच्या एसटी बसेस बहुतांश गावात रात्रीच्या मुक्कामी जातात. मात्र सकाळच्या वेळी शौचालयाला जाताना संबंधित एसटी वाहक-चालकांना शौचालये उपलब्ध होत नसल्याने त्यांना उघडय़ावरच शौचासाठी बसावे लागत आहे.
सरकारने निर्मलग्रामसारखी अभिनव योजना राबवित असताना गुडमॉर्निग सारख्या पथकाच्या माध्यमातून सकाळी उघडय़ावर शौचालयास बसणाऱ्यांना अलगदपणे पकडले जात आहे. वास्तविक पाहता लोकांचे आरोग्य चांगले राहावे, लोकांच्या उघडय़ावरील विष्ठेपासून इतर आजार होऊ नये यासाठीच राज्य सरकारने ‘निर्मलग्राम’ सारखी अभिनव योजना राबविली आहे.
दरम्यान गुडमॉर्निग पथकाचा धसका अनेकांनी घेतला असला तरी गावोगावी मुक्कामी जाणाऱ्या एसटी बसेसच्या चालक-वाहकांची मात्र शौचालयाची गैरसोय होत आहे. काही वाहक-चालकांना सकाळी उघडय़ावर शौचाला जाताना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावांमध्ये शौचालयांची सोय उपलब्ध नसल्यावर संबंधित गावात एसटी मुक्कामी गेल्यानंतर सकाळी वाहक-चालकांच्या शौचालयाच्या सोयीबाबत गावपातळीवरील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन यांची भूमिका महत्त्वाची आहे.
ज्या गावांना मुक्कामी एसटी बसेस जातात अशा गावांमध्ये एसटी चालक आणि वाहकांसाठी ग्रामपंचायत प्रशासन किंवा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शौचालये उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करून जर मुक्कामी जाणाऱ्या एसटी गाडय़ांच्या वाहक-चालकांसाठी संबंधित गावांमध्ये शौचालयांची व्यवस्था न केल्यास अशा गावांमध्ये एसटी बसेसचे मुक्काम बंद करावे लागतील, असा इशारा एसटी वाहक-चालकांनी दिला आहे.