Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

राज्य

खोटय़ा अहवालांमुळे अग्यार आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
दिलीप शिंदे
ठाणे, ३ फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले असतानाच न्यायालयीन चौकशी आयोगासमोर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी ५१५ प्रकरणांची खोटी माहिती सादर करून अग्यार आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत बांधकामाची चौकशी निवृत्त न्यायाधीश अग्यार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग करीत आहे.

स्वरभास्कराला वाढदिवसाची स्वरभेट!
पुणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राग वृंदावनी सारंगातील ‘तुम रब साहेब..’ आणि भैरवी रागातील ‘फुलवन गेंद से मैला ना मारो मेरे राजा..’ या बंदिशी श्रीनिवास जोशी यांनी सादर करून आपले गुरु व पिता, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना आज वाढदिवसाची स्वरभेट दिली. निमित्त होते सारेगामा इं. लि. कंपनीतर्फे पं. भीमसेन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाच्या ‘माय म्युझिक द सारेगामा इअर्स : पं. भीमसेन जोशी’ या अल्बमच्या प्रकाशनाचे. जोशी यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

पोलिसांनी केली दोन मुलाची हत्या
माजी सैनिक रासम यांचा आरोप
ठाणे,३ फेब्रुवारी/प्रतिनिधी
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची सुपारी घेऊन दोन पोलीस अधिकाऱ्यांनी घातपाताने मुलासह दोन तरूणांची हत्या केली असून सबल पुरावे असतानाही आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप माजी सैनिक तथा मृताचे वडिल मनोहर देवजी रासम यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. हे आरोप त्यांनी भावनेच्या भरात केले असून याप्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील, असे सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी हत्येचा आरोप फेटाळून लावला.

अनधिकृत होर्डिग्जप्रकरणी राजकीय पक्षांवर फौजदारी गुन्हे
ठाणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अनधिकृत होर्डिग्ज पोस्टरचे पेव रोखण्याबरोबरच शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी ठाणे महापालिकेने अनधिकृत होर्डिग्ज लावणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. तर वर्तकनगर पोलीस गुन्हे दाखल करून होण्यात टाळाटाळ करीत असल्याने त्यांना पोस्टाने तक्रार पाठविण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे समजते.
ठाण्यात सगळीकडे होर्डिग्ज आणि पोस्टरबाजीला ऊत आला आहे. त्याबाबत ‘ठाणे तलावांचे नव्हे पोस्टर्सचे शहर’ या मथल्यात ‘लोकसत्ता’ने रविवारी वृत्तान्तमध्ये आवाज उठविला होता.

आदिवासी विकासाच्या नावाखाली राज्यात प्रचंड भ्रष्टाचार - रामदास कदम
ठाणे, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आदिवासी विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे आदिवासींच्या मुलांना अक्षरश: जनावरांचे जीणे जगावे लागत आहे. कुपोषण, आश्रमशाळा, आरोग्य व रोजगार या प्रश्नांवर सरकार पूर्णपणे उदासीन व संवेदनाहीन झाले असून महिनाभरात हे चित्र न बदलल्यास विधीमंडळाचे अगामी अधिवेशन चालवू देणार नाही, असा गंभीर इशारा आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केलेल्या दौऱ्यानंतर दिला.

‘आम्ही सख्ख्या नाही, पण पक्क्या बहिणी’
घरकामगार-मोलकरणींच्या संघटनेची घोषणा!
पेण ३ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
‘आम्ही सख्ख्या नाही, पण पक्क्या बहिणी’ अशा घोषणांनी पेण शहरात एका नव्या पर्वास प्रारंभ झाला. निमित्त होते- रायगड जिल्'ाातील घरकामगार-मोलकरिणींनी संघटित होण्याचे. दिवसातून किमान पाच ते दहा घरांत धुणी-भांडी करणाऱ्या, संसार चालविण्यासाठी धडपड करीत असतांनाच नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय स्त्रीचा भार हलका करणाऱ्या जिल्'ाातील घरकामगार-मोलकरिणींचा मेळावा नुकताच पेण येथे झाला़ या मेळाव्यात घरकामगार महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. आता आम्हीसुद्धा असंघटित कामगार वर्गाच्या महिला ‘संघटित’ झाल्याचे त्यांनी जाणीवपूर्वक सर्वाच्या लक्षात आणून दिल़े

कर्जत ते खोपोली रस्त्याची दुरवस्था
नेरळ रस्त्याचे काम असमाधानकारक

कर्जत, ३ फेब्रुवारी/वार्ताहर : कर्जत ते पळसदरीमार्गे खोपोली रस्त्याची गत काही महिन्यांपासून दुरवस्था झाली असून, कर्जत ते नेरळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे हाती घेण्यात आलेले कामही असमाधानकारकच आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्जत उपविभागाच्या या कार्यपद्धतीमुळे वाहनचालक कमालीचे संत्रस्त झाले आहेत. ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल, तर प्रथम कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याची आवश्यकता प्रकर्षांने जाणवत आहे.

वाहनाची धडक बसून हवालदाराचा मृत्यू
पिंपरी, ३ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

पुण्याहून चाकणकडे जाताना वाहनाची धडक बसल्याने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार खंडू कोंडीभाऊ शिंदे (वय-५०,रा.शिरोली,खेड) हे जागीच ठार झाले.भोसरी पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी रात्री शिंदे हे दुचाकीवर आपले मेहूणे शरद एकनाथ गाडे यांच्या समवेत चाकणच्या दिशेने निघाले होते.मोशी येथे मागाहून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या गाडीला जबरदस्त धडक दिली.त्यात शिंदे हे गंभीर जखमी झाले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यृ झाला.धडक देणारा वाहनचालक पळून गेला.पोलीस उपनिरीक्षक वाय.एस.राक्षे तपास करत आहेत.

बारावीतल्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
पाली, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

माघी उत्सवात जास्त वेळ न घालवता परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास कर, असे वडिलांनी सांगितल्याने त्याचा राग धरून बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने अंबा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीतेश सुनील काळे हा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता. बारावीची परीक्षा असल्याने उत्सवात जास्त वेळ न घालवता परीक्षेचा अभ्यास कर, असे सुनील काळे यांनी आपल्या मुलाला सांगितले. याचा राग मनात धरून त्याने अंबा नदीच्या पुलावरून रात्रीच्या वेळेस पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. नीतेशचे आईवडील दोघेही शिक्षक असून, तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक
नालासोपारा, ३ फेब्रुवारी/वार्ताहर : वसई पूर्वेकडील गोखिवरे ब्रिजच्या पुढे मोकळ्या जागेत मारून टाकलेल्या युवकाच्या खुन्याला माणिकपूर पोलिसांनी अखेर शोधून काढले. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष मोकाशी या युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. गणेश एक्सपोर्ट कंपनीत मॅनेजर पदावर तो कार्यरत होता व त्याच परिसरात राहात होता. संतोषवर १२ वार करण्यात आले होते व त्याच्या अंगावरील सोने काढून नेण्यात आले होते. त्यामुळे प्रथमदर्शी हा खून चोरीच्या उद्देशाने करण्यात आला असावा, असे पोलिसांना वाटले. पण नंतर मृतदेहावर १२ वार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले तेव्हा त्यामागे फक्त चोरी हा उद्देश नसल्याचे पोलिसांच्या ध्यानी आले.संतोष व महम्मद सबा अकबर अली खान (२०, रा. सातिवली) आणि महम्मदची बहीण एकाच ठिकाणी कामाला होते. त्यांच्यातील प्रेमसंबंधांवरूनच महम्मदने आपल्या साथीदारांसह संतोषचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. संतोषचा खून केल्यानंतर महम्मद व त्याचे साथीदार पळून गेले होते. महम्मद हा दहिसर येथील गोकुळ हॉटेलमध्ये मित्राला भेटायला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला व महम्मदला ताब्यात घेतले. मात्र त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

कर्जत ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात
कर्जत, ३ फेब्रुवारी/वार्ताहर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या कर्जत शाखेचा सोळावा वर्धापनदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. कर्जत तालुक्यातील लाखरननजीक असलेल्या ‘देवदत्त’ फार्महाऊसवर या सोळाव्या वर्धापनदिनाच्या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. देवदत्त फार्महाऊसचे मालक आणि पेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाचे प्रमुख एन. एस. राव हे या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कर्जत शाखेचे अध्यक्ष मनोहर रणदिवे हेदेखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसिद्ध साहित्यिक वसंत जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख रामकृष्ण दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी मनोरंजनाचे व क्रीडा विभागाचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. अशोक कारुळकर यांची विनोदी कविता, मुकुंद मित्रगोत्री यांनी सांगितलेले विनोदी किस्से, रजनी वैद्य यांनी सादर केलेली नाटय़छटा आदींचा या कार्यक्रमांमध्ये समावेश होता. विनोदी कथाकथनकार सुरेश पोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत जोशी यांनी यावेळी विनोदी कथा सांगितल्या. मुकुंद मित्रगोत्री यांनी या समारंभाचे सूत्रसंचालन केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर शहासने यांनी सर्वाचे आभार मानले.

मॅरेथॉन स्पर्धेत नीलम कदम, योगेश सरदेसाई अजिंक्य
महाड, ३ फेब्रुवारी/वार्ताहर : युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाड शाखेतर्फे रायगड जिल्हास्तरीय भरविण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला गटात उरण येथील नीलम कदम, तर पुरुष गटामध्ये अलिबाग येथील योगेश सरदेसाई हे दोघे अजिंक्य ठरले. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, पेण, पनवेल, उरण, मुरुड येथील सुमारे ७०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. युथ हॉस्टेल महाड शाखेतर्फे गेल्या अनेक वर्षांंपासून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पर्धाप्रमुख संजय माळवदे आणि अशोक तलाठी यांनी सांगितले. स्पर्धेत सात वर्षांंपासून ५० वर्षांंचे ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. महिलांच्या खुल्या गटाममध्ये उरण येथील नीलम कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक उरणचीच सुप्रिया पाटील हिने मिळविला. तिसरा क्रमांक अलिबाग येथील अपर्णा म्हात्रे हिने मिळविला. पुरुषांच्या खुल्या गटामध्ये अलिबागचा योगेश सरदेसाई याने प्रथम क्रमांक मिळविला, तर अनुक्रमे कर्नाळा येथील कमल्या भगत आणि कर्जत येथील संतोष भासे यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.

देशरक्षणात रत्नागिरीतील जवानांचे योगदान मोठे - कर्नल प्रताप शिंदे
चिपळूण, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

देशरक्षणात रत्नागिरी जिल्ह्यातील जवानांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. शत्रूची गोळी हसता हसता आपल्या छातीवर घेण्याच्या त्यांच्या या तयारीमुळेच हा जिल्हा शूरवीरांचा मानला जातो, असे प्रतिपादन कर्नल प्रताप शिंदे यांनी आज येथे केले.चिपळूण तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे येथील सैनिक मुलांच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आम्ही जेव्हा युद्धावर जायचो, तेव्हा कोकणातील जवानच सर्वाच्या पुढे असायचा. देशरक्षणासाठी फुललेली त्याची छाती केव्हाही मागे हटण्यास तयार नसायची. शत्रूवर विजय मिळविणाऱ्या मराठा बटालियनचा इतिहास मोठा आहे. हा इतिहास कोकणातील जवानांनी आपल्या मनात आणि हृदयात चिरंतर टिकविणे फार गरजेचे आहे. बहुतांशी तरुण या क्षेत्राकडे वळत नाहीत. कारण त्यांना कुणाचे मार्गदर्शन लाभत नाही, मात्र तुम्ही तुमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज करा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बेळगाव येथील लेफ्टनंट कर्नल डिसोजा यांचेही भाषण झाले. चिपळूण तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. शिंदे यावेळी उपस्थित होते.