Leading International Marathi News Daily
 


बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
  आवाज की दुनिया
  सायकॉलॉजीतील करिअरच्या संधी
  फ्रॉंचायझी शेअर दलालाची
  जे. एन. टाटा एंडोमेंट स्कॉलरशिप
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे वेगळी
  संशोधन विषयाचा अभ्यास
  पार्लमेंट ऑफ इंडिया : प्रोटोकॉल ऑफिसर/ रिसर्च ऑफिसरपदाची तयारी
  मॅरेज प्लॅनर
  करिअरचाटर्निग पॉइंट
  देशातील ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षण

 

तुमचा आवाज जर लक्षवेधक असेल तर एंटरटेन्मेंट व मीडिया इंडस्ट्रीत याला मोठे अ‍ॅसेट मानले जाते. कर्णमधुर, धुमारेदार, दमदार, हळवा, आश्वासक, बालिश, प्रौढ असे आवाजाचे विविध पैलू पेश करण्याची जर तुमची कुवत असेल तर तुमचा आवाज तुम्हाला या क्षेत्रात भरपूर करिअर संधी मिळवून देऊ शकतो. कारण या क्षेत्रात तुमचा आवाज हीच तुमची ओळख असते.
अमीन सयानी, हरीश भिमानी, रोशन अब्बास, अन्नू कपूर, जावेद जाफरी, शेखर सुमन, प्रदीप भिडे, मिनी माथूर, पल्लवी जोशी या सर्व मंडळींमध्ये कुठली गोष्ट एकसमान असेल तर ती म्हणजे त्यांचा ‘युनिक आवाज!’ ही मंडळी यांच्या आवाजामुळे सर्वाच्या अधिक परिचयाची आहेत. उत्तम, लक्षवेधक, दावेदार आवाज ही ‘इ अण्ड एम’ उद्योगाची सर्वात मोठी गरज आहे. ‘एंटरटेन्मेंट अ‍ॅण्ड मीडिया इंडस्ट्री- सस्टेनिंग ग्रोथ’ या एफआय- सीसीआय प्राईस वॉटर कूपरच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार २००७ साली इतर भारतीय उद्योगधंदे फारसे प्रगती करताना दिसत नव्हते. तेव्हाही या उद्योगाची वाटचाल विकासाकडेच राहिली असे म्हटले आहे. गृहीत वाढीपेक्षा तीन टक्के वाढ अधिक दर्शविणारा हा उद्योग २०१२ पर्यंत १८ टक्क्यांनी
 
वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
जागतिक मंदीचे सावट गेल्या सहा महिन्यांत भारतीय उद्योगधंद्यावरही अधिक गडदपणे जाणवू लागले आहे. ‘इ अ‍ॅण्ड एम’ उद्योगही यातून सुटणार नाही. त्यामुळेच वरील अहवालाचे भाकीत पूर्णपणे अचूक ठरेल असे मानणे योग्य नाही. परंतु या व्यवसायाची सुनिश्चित वाढ भारतामध्ये दिसून येत आहे व पुढील दोन वर्षांत या क्षेत्रात १०,००० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील, असे जाणकारांचे मत आहे.
याची अनेक कारणेही देता येतील. १० वर्षांपूर्वी ज्याची कोणी कल्पनाही केली नसती ते आज प्रत्यक्षात घडते आहे. आजघडीला १५० चॅनेल्स दिसत आहेत व १०० वर अधिक येऊ घातले आहेत. एफएम रेडिओ आपली लोकप्रियता टिकविण्यात यशस्वी ठरला आहे आणि यापुढे प्रत्येक मोठय़ा शहरात एकतरी एफएम रेडिओ असेल असे दिसते आहे. मल्टिमीडिया व अ‍ॅनिमेशन क्षेत्राची भरारी वाखाणण्याजोगी आहे.
हल्ली सर्वसाधारण चॅनल्सपेक्षा विविध विषयांना वाहिलेल्या चॅनेल्सची चलती आहे. जसे, न्यूज चॅनेल्स, प्राणिजगत (अ‍ॅनिमल प्लॅनेट), भूगोल (नॅशनल जिओग्राफिक), इतिहास (द हिस्ट्री), तत्त्वज्ञान (आस्था), जीवनशैली (गुड टाइम्स), खेळ (स्टार, टेन, निओ, ईएसपीएन, डीडी, झी. इ.), लहान मुलांसाठी कार्टून नेटवर्क (कार्टून, हंगामा, पोगो, निक इ.) वगैरे..
या उद्योगात लक्षणीय वाढ दिसण्याचे अजून एक कारण म्हणजे भारतातील भाषावैविध्य! केवळ रामायण, महाभारतच नव्हे तर स्वाभिमानसारख्या महामालिकांचेही रिजनल भाषांमध्ये डबिंग होऊन प्रसारण केले जाऊ लागले. यामुळे ‘ई अ‍ॅण्ड एम’ उद्योगात कन्टेन्टचे महत्त्व अतिशय वाढले आहे. उत्तम स्क्रिप्टबरोबरच सुयोग्य आवाज मिळून पर्फेक्ट कन्टेटन्ट बनते. म्हणूनच आवाजाला एनकॅश करण्याची संधी या उद्योगात मिळते.
‘ई अ‍ॅण्ड एम’ उद्योगात आवाजाशी संबंधित खालील प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध आहेत -
व्हॉईस ओव्हर आर्टिस्टस्,
मिमिक्री आटिस्टस्/ स्टॅन्ड अप कॉमेडियन्स
नरेटर्स/ लाईव्ह प्रेझेंटर्स, एमसीज
कार्टूनसाठी चाईल्ड व्हॉईस आर्टिस्टस्
डबिंग आर्टिस्टस्
आर जेज
स्पोर्ट कॉमेंटटस
ट्रान्सलेटर्स इत्यादी.
जसजसा ‘ई अण्ड एम’ उद्योगाचा पसारा वाढला जाईल तसतशी सर्वच गुणवंत कलाकारांना भरपूर मागणी राहील. भारतीय ‘व्हॉईस’ला जगभरातून मागणी आहे. कारण भारतीय माणसे परदेशी भाषा, उच्चार इ. चटकन आत्मसात करू शकतात. भारतीय ‘ई अ‍ॅण्ड एम’ उद्योगात आंतरराष्ट्रीय कन्टेन्ट वाढत चालला आहे. जसे, अनेक परदेशी चित्रपट, मालिका भारतीय भाषांमध्ये डब करून बघितले जात आहेत. त्यामुळे कन्टेन्टची वाढती स्पेस भारतीय कलाकारांच्या पथ्यावर पडते आहे. प्रत्येक स्क्रीप्टला सुयोग्य आवाज हवा असतो.
व्हॉईस ओव्हर आर्टिस्टस् : अनेक जाहिराती, ऑडिओ व्हिज्युअल यूजर्स मॅन्युअल्स, पीआर मटेरिअल, प्रसिद्ध व्यक्तींची भाषणे असलेल्या सीडीज, सिनेमा, टीव्ही मालिका यांसारख्या बऱ्याच ठिकाणी उसना आवाज (व्हॉईस ओव्हर) वापरला जातो. व्हॉईस ओव्हर आर्टिस्टसना दिले गेलेले स्क्रिप्ट सुयोग्य उच्चार, लहेजा, आवाजातली कंपनी यासहित निर्देशकाच्या अपेक्षेनुसार वाचता येणे/म्हणता येणे गरजेचे असते.
मिमिक्री/स्टॅन्ड अप कॉमेडियन्स : जीवनातील ताणतणाव अत्यंत स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे वाढत चालला आहे. मिमिक्री (नकला) तसेच विनोद सांगून हसवता येणे जर तुम्हाला जमत असेल तर अनेकांच्या जीवनातील ताणतणाव तुम्ही कमी करू शकता व एक उत्तम करिअरही बनवू शकता.
भारतीय प्रेक्षक सतत रडक्या कथानकांनी भरलेल्या घरेलू मालिकांना कंटाळला आणि स्टार टीव्हीने आपल्याच स्टार वनद्वारा त्यावर लाफ्टर चॅलेंजची मलमपट्टी बाजारात आणली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला असे काही उचलले की, उत्तम टीआरपी हवा असेल तर कॉमेडी हवीच. हे ‘इक्वेशन’ चॅनलवाल्यांनी जाणले. उत्तम गुणी कलाकारांना या कार्यक्रमाद्वारे रेकग्विशन मिळाले व प्रतिष्ठाही. पण परिणामकारक कॉमेडी करणे काही सोपी गोष्ट नाही.
जर लहानपणीच तुम्ही इतरांना ‘जोक्स’ सांगून अथवा नकला करून हसवत असाल तर तुम्हीही हा ‘व्यवसाय’ करू शकता. कारण लोक कुठे व कशामुळे हसतात हे तुम्हाला निरीक्षणाद्वारे समजलेले असते. जबरदस्त निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि जीवनाकडे बघण्याचा प्रहसनात्मक तरीही सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी स्टॅण्डअप कॉमेडियन बनण्यासाठी आवश्यक असतात, तर कुणाच्याही स्वभावातील विरोधाभास, खाचा-खोचा, व्यक्तिमत्त्वातील वैगुण्ये त्या व्यक्तीला न दुखावता जसेच्या तसे पेश करता येणे मिमिक्रीसाठी गरजेचे असते.
कॉमेडियन्सना विषयाचे बंधन नसतं. (राजकारण, खेळ, सिनेमा, नातीगोती, रीतिरिवाज, कुटुंब, इ. कुठल्याही विषयांवर विनोद सुचला पाहिजे. कॉमेडी करताना सिलेब्रिटींच्या नकला, गाणी, हास्य दृश्ये (व्हिज्युअल गॅग्ज) तसेच स्टेज प्रॉप्सचा युक्तीने वापर आपल्या परफॉर्मन्समध्ये करता आला पाहिजे.
रोजच्या जीवनातील विसंगती शोधणे, आपला कन्टेन्ट सतत अपडेट करत राहणे, योग्य आवाजात तो मांडणे हे सरावाने अधिक चांगले जमू लागते. विनोद हा घडवून ओढाताण करून जुळवून आणलेला नसावा तर उत्स्फूर्त असावा; तरच तो प्रभाव पडतो. या क्षेत्रातही कॉपीकॅट्सना स्वीकारले जात नाही. मूळ, अस्सल तेच विकले जाते. म्हणून आपली ओरिजिनॅलिटी जमा व ‘एनकॅश’ करा. ‘पंच’ आपोआपच अ‍ॅड होत जाईल.
विविध कंपन्यांचे प्रॉडक्ट लाँच, कॉर्पोरेट इव्हेंट्स, फिल्म अ‍ॅवॉर्ड नाईट्स, रिअ‍ॅलिटी शोज, फॅशन शोज, म्युझिकल नाईट्स, टॉक शो, विविध फेस्टिव्हल्स (उदा. पुणे फेस्टिव्हल), काव्यवाचन/गायन, राजकीय पक्षांचे रोड शोज, कॅम्पस शोज इत्यादी अनेक ठिकाणी वरील मंडळींची गरज असते.
तर तुम्ही टीव्हीवर एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असाल तर तेथे हजर असलेल्या व्यक्तींशिवाय इतर लाखो प्रेक्षकांचे डोळे तुमच्यावर खिळलेले असतात. तुमचे बोलणे, तुमचा आवाज हा प्रेक्षकांशी तसेच दर्शकांशीही तुम्हाला ‘कनेक्ट’ करतो. फॅशन शो ‘होस्ट’ करत असाल तर शोचे उत्तम ऑर्केस्ट्रेशन म्हणजेच रॅम्पवरचे, मॉडेल्सचे नखरेल पदन्यास सुयोग्य संगीताद्वारे अधिक ‘अपीलिंग’ कसे करता येईल व इव्हेंट कशी यशस्वी होईल हे तुम्हाला ठाऊक असायला हवे.
अशा प्रकारचे काम सुरू करताना कार्यक्रमाच्या शक्य तितक्या अगोदर कार्यक्रमाची संपूर्ण संहिता लिहून काढावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती मिळवावी. कधी कधी केवळ स्क्रिप्टवर अवलंबून न राहता आयत्या वेळी काहीतरी वेगळा ‘पंच’ द्यावा लागतो. संबंधित क्षेत्रातील घडामोडींची माहिती असल्यास ती आयत्या वेळी रंजकपणे सादर करता आली पाहिजे. तुमची ‘ओरिजिनॅलिटी’ व नावीन्यपूर्ण कल्पना, तुमच्यातला सळसळता उत्साह, भावपूर्ण मन:पूर्वक शब्दोच्चार, दमदार आवाज, प्रचंड आत्मविश्वास याचे एक ‘पॅकेज’ तुमच्यात असले की तुमचे तेथे फक्त ‘हजर’ असणे हेही बऱ्याचदा बाजी मारून नेते.
आरजेज (रेडिओ जॉकी)
‘आरजे’ हे एक एफएम रेडिओचे ‘बायप्रॉडक्ट’ आहे असेच म्हटले पाहिजे. कारण पूर्वीही रेडिओवर अँकरिंग करणारी मंडळी होती. पण अमीन सयानींसारखे बोटावर मोजण्याएवढेच अँकर्स सर्वाना माहिती होते. आज मात्र ‘आरजें’ना जबरदस्त ग्लॅमर व लोकप्रियता लाभली आहे. इतर शॉर्ट व मीडियम वेव्ह चॅनल्सपेक्षा ‘एफएम’चे कन्टेन्ट, प्रेझेंटेशन, स्टाईल व डिलिव्हरी यात कमालीची वेधकता आहे. त्यामुळे ‘आरजे’ या मंडळींनी सदैव प्रसन्नचित्त असणे, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडींबद्दल सजग असणे तसेच ज्या चॅनेलसाठी ‘आरजेइंग’ करायचे आहे तेथील स्थानिक परिसर व परिस्थिती, माणसे, ठिकाणे व भाषा माहिती असणे गरजेचे असते. तसेच ‘बॉलिवुड’बद्दल शक्य तेवढी अधिक माहिती तुमच्या पोतडीत मौजूद असायला हवी.
सुप्रसिद्ध आर. जे. मंत्रा यांनी एका मुलाखतीत अतिशय नेमकेपणाने आरजे कसा असावा याबद्दल सांगितले होते. मंत्रा म्हणतो, ‘‘आरजेला लोकांशी बोलता येणे व त्याचा आनंद घेता येणे जमले पाहिजे. तुम्हाला अगदी सर्वच गोष्टी माहिती असाव्यात असेही नाही, पण प्रामाणिकपणे त्याची कबुली देता आली पाहिजे. यासाठी ‘आरजे’ हा माणूस मनातून सच्चा व प्रांजळ असायला हवा. एकदा का त्याच्या बोलण्यात, आवाजात हे ‘रिफ्लेक्ट’ झाले की ‘ऑडियन्स’ तुम्ही खेचलीच म्हणून समजा! उथळ, वायफळ बडबडीला येथे स्थान नाही.’
‘आरजे’ना कॉम्प्युटरबरोबरच इतर साऊंड इक्विपमेंट्स जसे साऊंड मिक्सर्स, फेडर्स, सीडी प्लेअर्स, कॉल इक्विपमेंट, अ‍ॅड डेटाबेस, मायक्रोफोन व हेडफोन्स हाताळता आले पाहिजेत. अर्थात, याचे ट्रेनिंग दिले जाते.
तसेच ‘भाषा’ हा ‘आरजेइंग’चा आत्मा आहे. इंग्रजी, हिंदी बरोबरच स्थानिक भाषेवर तुमची ‘कमांड’ हवी. विविध चॅनेल्सद्वारा होणाऱ्या ‘आरजे हंट’द्वारा संधी मिळणे शक्य असते.
डबिंग आर्टिस्टस्/चाईल्ड व्हॉईस आर्टिस्टस
‘प्लेबॅक सिंगिंग’च्या जमान्यापासूनच डबिंगची सुरुवात झाली होती. हल्ली सर्वच मूव्ही चॅनेल्सवर डब (विदेशी-ते भारतीय, भारतीय ते इतर भारतीय भाषांमध्ये) करून दाखवले जातात. त्यामुळे डबिंगसाठी विविध आवाजांची गरज असते. ‘डबिंग’ करतांना ‘टायमिंग’ चे महत्त्व वादातीत आहे. ओठांची हालचाल व्हिज्युअलप्रमाणे सिंक्रोनाईझ करता यायला हवी.
कार्टून डबिंगसाठी मोठय़ांप्रमाणेच चाईल्ड व्हॉईस आर्टिस्टचीही गरज असते. येथे लहान मुलांनाही संधी मिळते.
या प्रकारात आवाजात खूप व्हेरिएशन्स असणे आवश्यक असते. एकच व्यक्ती विविध पात्रांचे आवाज काढू शकते. स्क्रिप्टचा भाव ओळखून त्यानुसार आवाजाचा पोत, पट्टी इत्यादी बदलता आले पाहिजे. मूळ भाषा (सोर्स लँग्वेज) व ज्यात कार्यक्रम डब होतो आहे ती भाषा (टार्गेट लँग्वेज) या दोन्हींची जाण असल्यास ‘डबिंग’ करणे थोडे सोपे असते.
स्पोर्ट कॉमेंटेटर्स
विविध चॅनल्सवर खेळांची अशी खास बीट असतेच; परंतु निव्वळ खेळासाठी (म्हणजे भारतात फक्त क्रिकेट) अशी अनेक चॅनेल्स आहेत. यातील विविध टॉक शोज, मॅचची कॉमेंट्री तसेच पुरस्कार वितरण सोहळे इ.साठी होस्टची गरज असते. उत्तम क्रीडाविषयक पाश्र्वभूमी असेल, आवाजही वेधक असेल, भाषेवर प्रभुत्व असेल तर येथे संधी मिळते.
ट्रान्सलेटर्स : हल्ली अनेक घरगुती तसेच कार्यालयीन वापराच्या वस्तू/ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मायक्रोवेव्ह अवन, फूड प्रोसेसर, लॅपटॉप, अत्याधुनिक मोबाईल फोन्स यासारख्या इतर अनेक गोष्टी जेव्हा ग्राहक विकत घेतो तेव्हा त्याला ती वस्तू कशी, कशासाठी वापरावी तसेच तिच्या वापरासंबंधी सर्व डिटेल्स असणारे युजर्स मॅन्युअल ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात दिले जाते. अनेक भाषांमध्ये हे बनविण्यात येत असल्याने इथे ‘ट्रान्सलेटर्स’ना मागणी असते. तुम्हाला जितक्या भाषा उत्तम प्रकारे बोलता येत असतील तितकी अधिक संधी तुम्हाला मिळू शकते.
तसेच एज्युकेशनल मीडियामध्ये विविध भाषा शिकविणाऱ्या सीडी बनवल्या जातात. त्यात अचूक शब्दोच्चारावर भर दिलेला असतो. त्यामुळेच उत्तम आवाजाबरोबर उत्तम भाषिक कौशल्येही अवगत असतील तर अशांना येथे मागणी असते. व्हच्र्युअल क्लासरूम ही संकल्पना अजून तरी भारतात जाहिरातीतच (आयडिया- मोबाईल) दिसते. जसजसे या संकल्पनेचे रूपांतर प्रत्यक्ष प्रणालीत होत जाईल तसतशा इथेही करिअर संधी वाढत जातील.
प्रशिक्षण कोठे घ्याल?
या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींनी कुठेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते; परंतु प्रशिक्षणही आजच्या काळाची गरज आहे कारण यात व्यावसायिक दृष्टिकोनातून संपूर्ण ‘ट्रेनिंग’ दिले जाते, असे व्हॉईस कल्चर क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व व ‘इन्स्टिटय़ूट ऑफ व्हॉईस कल्चर’चे संचालक शेखर कुंटे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणतात की, या क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी आजही विविध स्टुडिओज्मध्ये सतत जात राहणे व संबंधित व्यक्तींच्या सतत संपर्कात राहणे हेच ‘घिसे-पिटे’ फंडे वापरले जातात. प्रोफेशनलिझमचा अभाव असल्याने केवळ ‘कॉन्ट्रॅक्ट्स’ असणे हेच आजही तुमच्यासाठी आवश्यक ठरते; परंतु जसजसे तंत्रज्ञान विकसित होत जाते आहे तसे, लांबच्या एखाद्या टॅलेंटेड आर्टिस्टला त्याच्या गावी राहूनही असाइनमेंट्स करता येतील. त्याने मुंबईच गाठली पाहिजे हे आवश्यक राहणार नाही. भारतीय ‘ई अ‍ॅण्ड एम’ उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याने यात आता प्रोफेशनॅलिझम येईल, असे दिसते.
व्हॉईस कल्चरच्या ट्रेनिंगमध्ये तुमच्या आवाजावर योग्य ते संस्कार केले जातात. विविध पट्टय़ांमध्ये आवाज कसा फिरवावा, आवाजाचा ‘व्हॅल्युम’ केव्हा किती वापरावा, रेसोनन्स कसा आणावा इ. अनेक बारीकसारीक खुबी शिकवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला भरपूर आत्मविश्वास प्राप्त होतो आणि तुमची पुढची वाटचाल अधिक सोपी होत जाते.
व्हॉईस कल्चर तसेच आरजे इंगचे ट्रेनिंग देणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी काही पुढीलप्रमाणे :
इन्स्टिटय़ूट ऑफ व्हॉईस कल्चर, होली क्रॉस रोड, टीसी कॉलनी एक्स्टेंशन, मुंबई- ४००१०३.
मुंबई फिल्म अ‍ॅकेडमी, फिल्म सिटी रोड, गोरेगाव इस्ट, मुंबई.
ईएमडीआय आयईएस मॅनेजमेंट कॉलेज, कॅम्पस, ४ था मजला, ऑपोझिट लीलावती हॉस्पिटल, बांद्रा रेक्लमेशन, मुंबई.
शर्वरी जोशी
sharvariajoshi@indiatimes.com