Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

क्रीडा

विजयाच्या हॅट्ट्रिकसह भारताने जिंकली मालिका
कोलंबो, ३ फेब्रुवारी / पीटीआय

युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबंद शतकांनी आज श्रीलंकेची पुरती धूळधाण उडाली. या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत १४७ धावांच्या दणदणीत विजयासह पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेवर विजयाची मोहोर उमटवली. सचिन तेंडुलकरला पंचांनी सलग तिसऱ्यांदा ढापल्यानंतरही महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने आज सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपूर्वीच श्रीलंकन भूमीत सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका विजय साजरा केला. प्रेमदासा स्टेडियमवर दिवस/रात्र रंगलेल्या आजच्या लढतीत भारताने युवराज व सेहवागने तिसऱ्या गडय़ासाठी केलेल्या २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ५ बाद ३६३ अशी विक्रमी धावसंख्या नोंदवली आणि यजमान श्रीलंकेचा डाव ४१.४ षटकात २१६ धावांवर रोखला. कुमार संगकाराने ८२ चेंडूंवर काढलेल्या ८३ धावांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना भारताने विजयासाठी दिलेले २६४ धावांचे आव्हान झेपलेच नाही.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यश मिळवायचे आहे- सानिया
भारतातील टेनिस स्पर्धात खेळणार
हैदराबाद, ३ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविल्यानंतर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यश मिळविणे हे माझे ध्येय असल्याचे, सानिया मिर्झा हिने आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी सानिया ही पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे.
सानिया म्हणाली की, ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील विजयाने माझे स्वप्न साकार झाले आहे. कोणत्याही खेळाडूसाठी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविणे ही मोठी कामगिरी समजली जाते. मात्र या यशावर समाधान न मानता फ्रेंच खुल्या स्पर्धेतही यश मिळविण्याची माझी इच्छा आहे.

आयसीएलमधील पाकिस्तानी खेळाडूंवरची बंदी उठविली
कराची, ३ फेब्रुवारी / पीटीआय

इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवरील बंदी येथील सिंध उच्च न्यायालयाने उठविली असून आता हे खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये खेळू शकणार आहेत. येत्या १० फेब्रुवारीला पुन्हा एकदा याप्रकरणी सुनावणी होणार असून यावेळी पाकिस्तान बोर्डाने कोणत्या नियमांतर्गत या क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे.

युकी भांब्रीला सीनियर्ससह खेळू द्या - विजय अमृतराज
चेन्नई, ३ फेब्रुवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकाविणारा भारताचा युकी भांब्री याने डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे आणि भारताचे माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी त्याला समर्थनही दिले आहे. युकीला थेट डेव्हिस चषक संघात का स्थान देऊ नये, असा सवाल अमृतराज यांनी उपस्थित केला आहे. अमृतराज यांनी म्हटले आहे की, सीनियर खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव युकीला खूप उपयोगी ठरेल. त्याचा खेळ सुधारण्यास हा अनुभव नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. अमृतराज यांनी सांगितले की, भारताला अनेक वर्षांनी युकीने एक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावून दिले आहे. ही खरोखरच मोठी कामगिरी आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून सायमण्ड्सला डच्चू
मेलबर्न, ३ फेब्रुवारी/ पीटीआय

वादाशी जवळीक साधणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अ‍ॅन्ड्रयू सायमण्ड्सला त्याच्या बेशिस्त वर्तणुकीचा फटका पुन्हा एकदा बसला आहे. त्याचे मानसीक स्वास्थ चांगले नसल्याचे सांगत त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यातून डच्चू देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (एसीए) घेतला असल्याचे अहवालात सांगण्यात आलेले आहे." पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये सायमण्ड्सला संघप्रवेशाबद्दल आज ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एक बैठक बोलावली होती.

मला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीचा-पॉन्टिंग
मेलबोर्न, ३ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी मला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे, असे स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग याने केले आहे. मी दोन्ही सामन्यात खेळण्यास उत्सुक होतो मात्र निवड समितीनेच मला विश्रांती घेण्यास सांगितले, असे पॉंटिंगने ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात मॉन्टी पनेसार खेळणार नाही
लंडन, ३ फेब्रुवारी / पी. टी. आय.

इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज मॉन्टी पनेसार आयपीएलच्या दुसऱ्या मोसमासाठी करण्यात आलेल्या खेळाडूंच्या लिलावातही स्थान मिळविण्यात अपयशी ठरला आहे. नवीन मोसमासाठी नव्याने बनविण्यात आलेल्या १११ खेळाडूंच्या यादीत १९ इंग्लिश खेळाडूंचा समावेश होता. मात्र मॉन्टीसह अन्य १२ इंग्लिश खेळाडूंना फ्रेंचाइजनी नाकारले. इंग्लंडचा स्टार क्रिकेटर केविन पीटरसन आणि अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ यांचा मात्र ४३ खेळाडूंच्या अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे. डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार इंडियन प्रीमिअर लीगच्या नऊ फ्रेंचाइजपैकी कुणीही मॉन्टी पनेसार, तसेच वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन आणि फलंदाज इयान बेल यांना आपल्या संघात घेण्यात रस दाखविला नाही. नव्याने बनविण्यात आलेल्या यादीतील इंग्लिश क्रिकेटपटूंमध्ये अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ (९ लाख ५० हजार डॉलर्स), केविन पीटरसन (१३ लाख, ५० हजार डॉलर्स), ल्युक राइट (दीड लाख डॉलर्स), ओवेस शहा (दीड लाख डॉलर्स), पॉल कॉलिंगवूड (अडीच लाख डॉलर्स), रवी बोपाट (दीड लाख डॉलर्स), समीत पटेल (एक लाख डॉलर्स) यांचा समावेश आहे.

मुरलीधरनने केली अक्रमची बरोबरी
कोलंबो, ३ फेब्रुवारी / पीटीआय

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी करणारा श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने आज एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी नोंदवणाऱ्या पाकिस्तानच्या वासीम अक्रमच्या (५०२ बळी) विक्रमाची बरोबरी केली. मुरलीधरनने आज भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकवीर युवराज सिंगला (११७) चामरा कुपगेदराकडे झेल देण्यास भाग पाडत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०२ बळी घेण्याची कामगिरी केली. ३६ वर्षीय मुरलीधरनने ३२७ सामन्यात ही कामगिरी केली तर अक्रमने ३५६ लढतीत ५०२ बळी मिळवले आहे. गेल्या दोन एकदिवसीय सामन्यात केवळ एक गडी बाद करणाऱ्या मुरलीधरनने आज आठव्या षटकात अक्रमच्या विक्रमाची बरोबरी साधण्यात यश मिळवले. गोलंदाजी शैलीमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या मुरलीधरनने १२५ कसोटी सामन्यात सर्वाधिक ७६९ बळी मिळवण्याचा विक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नोंदवण्यासाठी त्याला एक बळी घेण्याची गरज आहे.

मॅक् क्युलम ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या ‘वन डे’साठी तंदुरुस्त
मेलबर्न, ३ फेब्रुवारी / पीटीआय

न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ब्रेंडन मॅक् क्युलमला येत्या शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी ‘फिट’ ठरवण्यात आले. मॅक् क्युलमच्या पाश्र्वभागाचे स्नायू जखडले होते पण, आज झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो यशस्वी झाल्यामुळे बदली यष्टिरक्षक गॅरेथ हॉपकिन्स आज मायदेशी परतणार आहे.न्यूझीलंड संघाचे व्यवस्थापक लिंडसे क्रॉकर म्हणाले की, गेल्या आठवडय़ात सरावादरम्यान मॅक् क्युलमला दुखापत झाली होती पण, उपचारांना त्याने योग्य प्रतिसाद दिला. रविवारी पर्थला झालेल्या सामन्यानंतर त्याचे स्नायू दुखावले होते पण, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तो शुक्रवारचा सामना खेळू शकेल, याचा पूर्ण विश्वास होता. मॅक् क्युलम तंदुरुस्त झाल्यामुळेच गॅरेथला बुधवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या देशांतर्गत ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी मायदेशी जाण्याची परवानगी निवड समितीने दिली असल्याचेही क्रॉकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने पर्थला झालेली सलामीची लढत जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

शिल्पा शेट्टीचा राजस्थान रॉयल्समध्ये १२ टक्के हिस्सा
मुंबई, ३ फेब्रुवारी / क्री. प्र.

शाहरुख खान, प्रीती झिंटा यांच्यापाठोपाठ आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईस्थित व्यावसायिक राज कुंदरा याच्यासह शिल्पाने राजस्थान रॉयल्स संघात १२ टक्के गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. ही गुंतवणूक १ कोटी १६ लाख अमेरिकन डॉलर इतक्या रकमेची आहे.गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स या संघाने विजेतेपद पटकाविले होते. या संघाकडून सुरुवातीला विजयाची अपेक्षाही नसताना त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली होती. शिल्पाने यासंदर्भात सांगितले की, ज्या संघाला प्रथम कमी लेखण्यात आले होते, त्यानेच शेवटी विजेतेपद पटकाविले. मला अशा संघात गुंतवणूक करणे आवडते.

आयसीसीने माझा एन्काऊंटर केला- डॅरेल हेअर
मेलबर्न, ३ फेब्रुवारी/ पीटीआय

विवादास्पद ओव्हल येथील सामन्याचा निर्णय बदलल्यानंतर मााझ्यावर प्रतिबंध लादून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने माझा एन्काऊंटर केला आहे, असे मत या सामन्यात पंचगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डॅरेल हेअर यांनी व्यक्त केले आहे. या सामन्यातील चहापानानंतर पकिस्तानला बॉल कुरतडल्याबद्दल पाच धावांचा दंड पंच डॅरेल हेअर आणि बिली डॉकट्रोव यांनी ठोठावला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ पकिस्तानने सामना सोडून दिला होता. पाकिस्तान खेळण्यास तयार नसल्याचे कळल्यावर पंचांनी हा सामना इंग्लंडच्या पदरात टाकला होता. त्यानंतर पाकिस्तानने या सामन्याचा निर्णय बदलण्यासाठी आयसीसीचा दरवाजा ठोठावला होता. आयसीसीनेही सामन्याचा निर्णय बदलण्याची भूमिका घेतली आणि सामना अनिर्णीत राखण्याचा निर्णय ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर आयसीसीने हेअर यांना डावलण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावर हेअर म्हणाले की, मला असे वाटते की, आयसीसीचे व्यवस्थापक डेव्ह रिचचर्डसन यांच्या हातात बंदूक होती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माल्कम स्पीड यांनी स्ट्रीगर ओढल्याने मी उद्वस्त झालो आहे. आयसीसीने त्यांचा फायदा बघून मला डावलण्याचा निर्णय घेतला आणि मला आयुष्यातून उठविले.

प्रबोधन क्रिकेट प्रशिक्षणास प्रारंभ
मुंबई, ३ फेब्रुवारी / क्री. प्र.

प्रबोधन गोरेगावच्या वतीने क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव (पूर्व) येथे होणारे हे शिबिर मंगळवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात एम. सी. ए.चे लेव्हल वन प्रशिक्षक मधुकर बोटले तर दुपारच्या सत्रात लेव्हल वन प्रशिक्षक सचिन खरतडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रबोधनचे व्यवस्थापक आणि क्रिकेट प्रशिक्षक शशी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होईल. शिबिरासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्यांसाठी १३००/- रुपये त्रमासिक शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी रमेश ईस्वलकर ९८२०३१३८५५, शशी नायक ९४२०२१०५३९ यांच्याशी किंवा प्रबोधन क्रीडाभवन २८७९७५८० / ८१ येथे संपर्क साधावा.

‘भगवा चषक’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
मुंबई, ३ फेब्रुवारी / क्री. प्र.

स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ‘भगवा चषक’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब जोगेश्वरी पूर्व येथे ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.
या स्पर्धेत अ, ब, आणि कुमार अशा तीन गटात सामने खेळविण्यात येणार असून प्रत्येक गटात १६ संघांचा समावेश करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी महेश सावंत यांच्याशी ९८२१६६६९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.