Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

सामाजिक सेवेच्या व्रतबंधातून लोकशाही रुजवा - डॉ. तात्याराव लहाने
डोंबिवली/प्रतिनिधी

भारतमातेची वेदना काय आहे, हे ओळखून देशातील प्रत्येक नागरिकाने सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारले तर लोकशाही रुजविण्याचे महान कार्य आपल्या हातून होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम आपली संस्कृती, प्रथा आणि परंपरा जतन करण्याचे कार्य करीत आहे ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केले. अभ्युदय प्रतिष्ठानतर्फे नागालॅन्ड वसतिगृहाचा दहावा वार्षिक उत्सव आदित्य मंगल कार्यालयात आयोजित केला होता.

‘सागरी तटरक्षक दलात आगरी-कोळी तरुणांना संधी द्यावी’
ठाणे/प्रतिनिधी

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात येत असलेल्या तटरक्षक दलात आगरी आणि कोळी समाजातील तरुणांना संधी द्यावी, अशी मागणी सिडकोचे संचालक आणि ठाणे महापालिका नगरसेवक सुभाष भोईर यांनी केली आहे.त्यासंदर्भात भोईर यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सागरी किनाऱ्यावर असलेली गावे ही बहुतेक आगरी व कोळी समाजाची आहेत. सदर समाजाचा मासेमारी हा पिढीजात व्यवसाय असून या समाजातील तरुणांना सागरीमार्गाची व नद्या-नाल्यांची भरती-ओहोटी व समुद्रामध्ये वेळोवेळी होणाऱ्या अनपेक्षित बदलांची परिपूर्ण माहिती असते. त्यामुळे सागरी तटरक्षक दलात आगरी-कोळी समाजाच्या तरुणांना संधी दिल्यास तटरक्षक दल प्रबळ होईल, तसेच युवकांना देशसेवेची संधीही मिळेल, असा विश्वास भोईर यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.

विठ्ठलवाडी स्थानकाजवळ सबवेचे काम सुरू
कल्याण/वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पूर्व भागातील वालधुनी नदीच्या पुराच्या पाण्यापासून सुटका करणाऱ्या सबवेच्या कामाची सुरुवात विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशननजीकच्या एफ कॅबिन येथे शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.दरवर्षी पावसाळ्यात वालधुनी नदीला पूर येतो आणि याचा फटका खडेगोळवली, नेहरूनगर, श्रीरामनगर, साईनगर, जाईबाई विद्यामंदिर व आनंदवाडी परिसरातील नागरिकांना बसतो. त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात. या पुराच्या पाण्याचा निचरा वेगाने होईल व इतर वेळी या सबवेचा हलक्या वाहनांच्या वाहतुकीला उपयोग होईल, असा सल्ला पालिकेच्या तंत्रज्ञांनी दिला होता. यामुळे महासभेने या सबवेला मंजुरी दिली आहे. रेल्वे प्रशासनाने या कामाला परवानगी देण्यास दिरंगाई केल्याने २६ जुलै २००५ रोजीच्या अतिवृष्टीमुळे कल्याण पूर्व भागाला मोठा फटका बसला होता. यामुळे महापौर रमेश जाधव यांनी या कामासाठी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले.या कार्यक्रमाला खासदार आनंद परांजपे, महापालिका आयुक्त गोविंद राठोड, बाळ हरदास, आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

प्रत्येक विभागाने मिळवावी भारनियमनाची ‘अ’ श्रेणी
कल्याण/वार्ताहर

वीज ग्राहकांना चांगली सेवा देऊन त्यांची विश्वासार्हता मिळवा व भारनियमन कमी करून प्रत्येक विभागाने भारनियमनाच्या ‘अ’ श्रेणीत येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक कार्यकारी संचालक सुभाष ठाकूर यांनी केले.शहरातील गोदरेज हिल परिसरात महावितरणच्या प्रादेशिक कार्यकारी संचालक कार्यालयाचे उद्घाटन व ध्वजारोहण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर येरमे, भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता अशोक गुजर, महाव्यवस्थापक मनोहर बढिये, अधीक्षक अभियंते आर.एम. गोळे, प्रकाश रंगदळ, जयंत जोशी, उपसंचालक दक्षता व अंमलबजावणी सुमीत कुमारसह कल्याण भांडूप परिमंडळातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते.या कार्यालयाच्या अखत्यारित महावितरणाचे कल्याण, भांडूप आणि रत्नागिरी ही तीन परिमंडळे येणार आहेत. या कार्यालयामुळे ग्राहकांची कामे सुरळीत होणार असून, छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी मुख्यालयात जाण्याचा त्रास वाचणार आहे. महावितरणाच्या एकूण महसुलात कल्याण, भांडूप आणि रत्नागिरी परिमंडळाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे. तो वाटा ५० टक्के करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून कल्याण, भांडूप व रत्नागिरी परिमंडळाचा मासिक महसूल वाढविणाऱ्या अधिकाऱ्याचा या कार्यालयाच्या आढावा बैठकीत सत्कार करणार असल्याचे ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वृत्तपत्र विक्रेत्यांना ओळखपत्रांचे वाटप
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे रेल्वे स्थानक, वागळे इस्टेट, टेंभी नाका, कापूरबावडी, किसननगर, मुंब्रा व दिवा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी डेपोवर वृत्तपत्रे आणण्यासाठी, तसेच वृत्तपत्रांचे वाटप करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून या विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांच्यासाठी ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे प्रमुख सल्लागार आमदार एकनाथ शिंदे यांनी विक्रेत्यांची नोंदणी केली होती. या ओळखपत्रांचे वाटप अलीकडेच नगरसेवक अशोक वैती यांच्या हस्ते करण्यात आले. मुकुंद जाधव यांना प्रथम ओळखपत्र देण्यात आले. यावेळी अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, संघटक बाळू भोसले, समीर कोरे, दीपक सोंडकर, दीपक चाळके, मंगेश काकडे, प्रमोद गांगुर्डे, सतीश साळवी, प्रदीप पदके, विकास शिंदे आदी उपस्थित होते.

सचोटी असेल तरच यश टिकते-सुनील बर्वे
कल्याण/वार्ताहर

सचोटी असते तेथे यश टिकून राहते. पदाधिकाऱ्यांची बँकेवरील निष्ठा व स्वत:वरील विश्वास यामुळेच कल्याण जनता सहकारी बँकेचे यश टिकून आहे, असे गौरवोद्गार अभिनेता सुनील बर्वे यांनी काढले.
कल्याण जनता सहकारी बँकेच्या कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एटीएम केंद्राचे उद्घाटन बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष डॉ. वसंतराव काणे, उपाध्यक्षा सुषमा फडके, शिरवाडकर, मोहन आधारकर, प्रा. विलास पेणकर, हेमल रवाणी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
जनता सहकारी बँक फक्त सहकार क्षेत्रात काम करीत नसून, सामाजिक बांधिलकी जपत आहे. बँकेने वनीकरण व अन्य सामाजिक उपक्रम जपत असताना नाती जपत असल्याने बँकेचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, एटीएम, सीडीएम व सीआयएमसारख्या सुविधा ग्राहकांना देत असल्याने स्लो बट शुअर अशी आपल्या मूळ स्वभावासारखी ही बँक असल्याने आपण बँकेच्या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.शासनाला ३३ टक्के वनीकरण हवे आहे, पण प्रत्यक्षात २० टक्के वनीकरण आहे. आम्ही व ठाणे भारत सहकारी बँकेने १० हजार झाडे लावली असून, त्यापैकी ९५ टक्के झाडे जगविली आहेत. फक्त वृक्षारोपणाचे काम न करता त्याची जोपासनाही करीत आहोत. आमची बँक समाजहिताची कामे करणारी असून, जनता सहकारी बँक हा समाजाचा घटक आहे. बँकेच्या संचालक मंडळात विविध क्षेत्रातले लोक असल्याने अपूर्णांकाचा पूर्णांक होतो. बँकेच्या समृद्धीकरिता त्याची मदत होत असल्याचे प्रास्ताविक भाषणात बँकेचे अध्यक्ष डॉ. वसंतराव काणे यांनी सांगितले.

कोकण दरबारमध्ये मालवणी फेस्टिव्हल
ठाणे/प्रतिनिधी

मालवणी फूड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मालवणी फूडची असली चव चाखायला मिळावी, यासाठी केव्हिला परिसरातील कोकण दरबार हॉटेलमध्ये मालवणी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी २० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. कैरीचे पन्हे, सोलकढीपासून भरलेले पापलेट, रावस, मोरी रस्सा, चिंबोरी अशा नॉनव्हेजच्या भरपूर डिशेसची रेलचेल या महोत्सवात असणार आहे, तर शाकाहारी लोकांसाठी खास काजुकरी, मालवनी पनीर मसाला, मालवणी हंडी यासारख्या डिशेस उपलब्ध असतील. संपर्क : ९७०२००५७१७.

रविवारी स्वयम्चा तिसरा वर्धापनदिन
ठाणे/ प्रतिनिधी

बहुविकलांग मुलांच्या मदतीसाठी कार्यरत स्वयम् या पुनर्वसन केंद्राचा तिसरा वर्धापन दिन रविवार ८ फेब्रुवारी रोजी सहयोग मंदिर, दुसरा मजला, घंटाळी, ठाणे (प) येथे आयोजित केला जाणार आहे. बहुविकलांग मुलांच्या पालकांनी तीन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. वर्धापनदिनानिमित्त ‘पालकत्व माझ्या खास बाळाचे’ या विषयी बहुविकलांग मुला-मुलींच्या पालकांसाठी सकाळी साडेनऊ ते साडे बारा या वेळेत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते पालकांशी हितगुज साधणार आहेत. बाळाचे संगोपन करताना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींना तसे सामोरे जावे, त्यातून उद्भविणाऱ्या ताण-तणावांचा कसा सामना करावा, याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे परिसरातील पालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- ९८६७३५५५३५.

डोंबिवलीत शुभंकरोति गणितप्रेमी मंडळ
डोंबिवली/प्रतिनिधी : आनंदकुमार गोरे यांच्या ‘डोंबिवली पॅटर्न’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. मुलांना गणित सोपे जावे, सोपे वाटावे यासाठी गेली सात वर्षे एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी १०० मुलांना बेसिक गणित शिकविण्याचे वर्ग घेतले जातात. त्या अनुषंगाने येथील गणितप्रेमी मंडळींनी शुभंकरोती मित्रमंडळाची स्थापना केली आहे. गणित हा विषय अगदी सोपा जावा यासाठी इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘डोंबिवली पॅटर्न’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डोंबिवलीतील जास्तीत जास्त मुलांना बेसिक गणिताचे धडे देण्यासाठी सध्या असलेला शिक्षकवर्ग फारच कमी आहे. या गणितप्रेमी मंडळाचे सभासदत्व स्वीकारण्यासाठी महिन्यातून किमान तीन तास देणे आवश्यक आहे. ज्या गणितप्रेमींना यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी अश्विनी साने (६४१५६१३/९२२४३११८८८), विलास सुतावणे (२४३६४९०), आनंदकुमार गोरे (२८८३५८३/९८६९६०५०९५) यांच्याशी संपर्क साधावा.

शहापुरात जाणीव प्रतिष्ठानची स्थापना
शहापूर/वार्ताहर

आजच्या व्यवस्थेत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक भान निर्माण व्हावे व युवा वर्ग विधायकतेकडे झुकावा, या हेतूने शहापुरातील युवकांचे संघटन करून जाणीव प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली. शिक्षक, डॉक्टर, अभियंते अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या समविचारी व्यक्तींचा जाणीव प्रतिष्ठानमध्ये समावेश आहे.
पत्रकार सुभाष हरड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या जाणीव प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ शहापूरच्या गंगादेवस्थान येथे झालेल्या बैठकीत रोवण्यात आली. जाणीव प्रतिष्ठान शहापूर शहरात व तालुक्यात सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी अविरत धडपडणार आहे.
जाणीव प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुभाष हरड यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिष्ठानच्या आगामी वाटचालीसाठी कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- सल्लागार- कवी विलास वेखंडे, अरुण पाटील, भरत पवार, अनिल भोईर, बाळकृष्ण बांगर. अध्यक्ष- सुभाष हरड. उपाध्यक्ष- सुरेश सापळे, प्रवीण विशे, शरद भोईर, रमेश तारमळे. कार्याध्यक्ष- मधुकर हरणे. सचिव- चंद्रकांत पाटील. सहसचिव- संजय भोईर. खजिनदार- केशव शेलवले. सदस्य- बाळू वेखंडे, एकनाथ पवार, हरिश्चंद्र मडके, प्रमोद पाटोळे, राजेश मोगरे.

नारायण तेजे यांचे निधन
भिवंडी/वार्ताहर : येथील नारायण राजाराम तेजे यांचे ३१ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी व मुले, मुली, नातवंड असा परिवार आहे. भिवंडीतील ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव तेजे यांचे ते धाकटे बंधू तर ‘लोकसत्ता’चे पत्रकार रतनकुमार तेजे यांचे काका होते.नारायण तेजे यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला होता, विविध सामाजिक कार्यामध्ये तसेच आंदोलनामध्येही सहभाग होता. त्यांच्यावर भिवंडी येथेचअंत्यसंस्कार करण्यात आले.