Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

योग्य पुरस्कारांना योग्य व्यक्ती मिळत नाही आणि योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार दिला जात नाही, अशा कोंडीत समाजजीवन सापडले असताना योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार दिला जावा आणि तो देण्याचा समसमा योग दृक्कलांच्या क्षेत्रात जुळून यावा, यापरता दुसरा आनंद कुठला असावा? हा योग जुळून आला आहे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पहिल्याच जीवनगौरव पुरस्काराबाबतीत. ५० हजार रुपयांचा हा पहिलावहिला पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव तथा भाऊ साठे यांना जाहीर झाला आहे आणि तो आजच एका विशेष समारंभात दिला जाणार आहे. शिल्पकलेतील साठे यांची वाटचाल तब्बल साठ वर्षांची. ४८च्या एप्रिलमध्ये स्कूल ऑफ आर्टस्चा शिल्पकलेचा अभ्यासक्रम साठे यांनी पुरा केला. शालेय जीवनापासूनच मूर्तिकलेशी त्यांचा संबंध होता. काकांच्या गणपतीच्या कारखान्यात मातीशी खेळणे तेव्हाच सुरू झाले होते. पण गणपतीवर मनाचे समाधान होत नव्हते. अशातच शांतारामबापूंची भेट झाली आणि राजकमल स्टुडिओसाठी सेटवर लागणारे मोठमोठे पुतळे तयार करण्याचे काम

 

मिळाले. नवनवे पुतळे धडाक्याने करायला मिळत होते, पण शिल्पकला म्हणून त्यात दाखविण्यासारखे काहीच नव्हते. स्वतंत्र कलानिर्मितीलाही वाव नव्हता. अशातच दिल्लीतल्या एका पंजाबी गृहस्थांचे पत्र हातात आले आणि साठे मागचा पुढचा विचार न करता दिल्लीला गेले. तिथे संधी चालून आली ती तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या ओळखीची. देशमुखांनी तरुण साठेंना पुतळ्यासाठी सिटिंग देणे मान्य केले आणि मग साठेंनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. महात्मा गांधींचा पुतळा तयार करण्याचे दिल्ली महानगरपालिकेचे काम साठेंनी मिळवले. त्या पुतळ्याचे कौतुकही पं. नेहरूंकडून झाले. साठे या नावाचा दबदबा शिल्पकलेच्या क्षेत्रात निर्माण होऊ लागला. तेव्हापासून ते थेट २००३ सालापर्यंतच्या ५० वषार्र्त भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, विक्रम साराभाई, पं. दीनदयाळ, यशवंतराव चव्हाण, लोकमान्य टिळक, रामनाथ गोएंका, महर्षी कर्वे, झाशीची राणी, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, डॉ. हेडगेवार, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, अटलबिहारी वाजपेयी, अशी अनेक कामे लीलया पेलली. साठे यांच्या कलेचा खरा गौरव झाला तो लॉर्ड माऊंटबॅटन, प्रिन्स फिलिप यांचे पुतळे त्यांनी बनवले तेव्हापासून. एकापेक्षा एक मोठय़ा शिल्पांची कामे साठेंकडे येत होती, पण ती सारी पारंपरिक होती. त्या चौकटीबाहेर पडून अपारंपरिक संकल्पना साठेंना राबवायची होती, पण साथ मिळत नव्हती. कितीतरी संकल्पना साठेंनी सुचविल्या होत्या. त्या संबंधितांना पसंतही पडल्या होत्या, पण कुठेतरी माशी शिंकल्याने त्या कार्यान्वित होऊ शकल्या नव्हत्या. याचे साठेंना जाणवलेले एक मुख्य कारण म्हणजे, शिल्पकलेची जाण नसणे आणि व्यक्तिपूजेपलीकडे शिल्पविषय न जाणे. वस्तुत: महापुरुषांची शिल्पेच करायची तर ती त्यांच्या जीवनातील स्फूर्तिदायक घटनांचे विषय घेऊनही करता येऊ शकतात. नव्या दमाच्या प्रतिभावान कलाकारांना नवनव्या संकल्पना साकार करण्याची संधी मिळाली तर प्रतिभाशून्य डबक्यात अडकून पडलेली शिल्पकला मोकळ्या वाटेने प्रवास सुरू करू शकेल असे त्यांना वाटते. घारापुरी, वेरुळ लेण्यांमध्ये शतकानुशतके कलावंत दगडांना आकार देत होते, त्यांच्या पिढय़ा बदलल्या, पण विषय संपले नाहीत आणि त्यातला भारतीयत्वाचा आविष्कारही सुटला नाही. मानवाने अंतराळ पादाक्रांत करायला सुरुवात करताच रशिया, अमेरिकेत प्रतीकरूपाने त्यांची शिल्पे तयार झाली, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला, हिरोशिमा जळून खाक झाले, ते थरारक अनुभवही शिल्परूपाने जर्मनी-जपानमध्ये उभे राहिले, पण आपल्याकडच्या धरणांची, प्रक्षेपणास्त्रांची, अणुस्फोटांची, चांद्रमोहिमांची अशी शिल्पदखल घ्यावी असे कुणालाच वाटले नाही. असे का घडले असावे या प्रश्नाने साठे व्यथित होताना दिसतात. त्यांची ही व्यथा नवनिर्मितीला प्रेरणा देणारी ठरेल तर त्या पुरस्काराला अर्थ प्राप्त होईल.