Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

विविध

पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिसाद नाहीच -मुखर्जी
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर भारताने सादर केलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानने एक प्रश्नावली पाठवून प्रतिसाद दिला होता, हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायणन यांनी केलेला दावा परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावला आहे. भारताला अजूनही कुठलाच अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही, असे मुखर्जी यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. श्री. नारायणन यांनी सीएनएन-आयबीएनच्या एका कार्यक्रमात जे वक्तव्य केले होते त्याच्या अगोदरच मुखर्जी यांनी पाकिस्तानने अधिकृत प्रतिसाद दिला नाही असे सांगितले होते.

लोकसभा निवडणुका अनेक टप्प्यांत घेण्यास विरोध
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुका एप्रिलअखेर व्हाव्यात, अशी सूचना करतानाच या निवडणुका अनेक टप्प्यांत घेण्यास बहुतांश राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. पैसा व राजकीय प्रभावाचा दुरुपयोग टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जास्तीत जास्त तीन आठवडय़ांत कमीत कमी टप्प्यांमध्ये पूर्ण करावी, अशा सूचना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आज निवडणूक आयोगाने बोलविलेल्या बैठकीत केल्या.

पैसे चोरल्याच्या संशयावरून दलित बालिकेला ‘थर्ड डिग्री’
इटावा, ३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

एका महिलेकडील २८० रुपये चोरल्याच्या संशयावरून अवघ्या सहा वर्षे वयाच्या दलित बालिकेला उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी बेदम मारहाण केल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी एका अधिकाऱ्याला बडतर्फ तर एकास निलंबित करण्यात आले असून अनुसूचित जाती-जमातीसंदर्भातील कायद्यांतर्गत सहा पोलिसांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाण झालेल्या मुलीची इटावाच्या पोलीस अधिक्षकांनी व्यक्तिश: माफी मागावी, असा आदेश उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक विक्रम सिंग यांनी दिला.

काकोडकर, नायर, गवळी यांचा अस्मिता पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर, इस्रोचे अध्यक्ष माधवन नायर, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आयआयएम कोलकाताचे संचालक शेखर चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्त आणि किसान शक्ती संघटनेचे संस्थापक अरुणा रॉय, निखील डे आणि शंकर सिंह यांना आज एका शानदार सोहळ्यात उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्या हस्ते २००९ सालच्या भारत अस्मिता पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

चार अणुऊर्जा प्रकल्पांमुळे या वर्षी १६६० मेगावॉट वीजनिर्मिती-काकोडकर
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी / पीटीआय

चालू वर्षांत भारत चार अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणार असून त्यामुळे देशात १६६० मेगावॉट इतकी अणुऊर्जा निर्मिती होईल असे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी आज येथे सांगितले. विश्वनाथ कराड यांनी स्थापन केलेल्या एमआयटी समूहाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता पुरस्कारांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर, इस्रोचे अध्यक्ष जी.माधवन नायर, सामाजिक कार्यकर्त्यां अरुणा रॉय, निखिल डे व शंकर सिंग, कोलकाता आयआयएमचे संचालक शेखर चौधरी , शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर श्री. काकोडकर यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, चालू वर्षांत तीन प्रकल्प सुरू होतील. चौथा प्रकल्प हा कुंडनकुलमचा असून भारत-रशिया यांच्या अणुसहकार्यातून तो सुरू होत आहे. राजस्थानात दोन तर कैगा येथे एक असे तीन प्रकल्प सुरू होत असून कुंडनकुलमचा प्रकल्प सुरू होण्यास थोडा वेळ लागेल.भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारामुळे देशातील अणुऊर्जा उत्पादनास चालना मिळाली असल्याचे सांगून ते म्हणाले की, सध्या देशाच्या वीज उत्पादनात अणुऊर्जेचा वाटा केवळ तीन टक्के आहे, तो वाढायला पाहिजे पण ही प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. आता त्याला वेग येईल एवढे मात्र निश्चित.व्हिएन्ना येथे कालच भारतविशिष्ट सुरक्षा करारावर स्वाक्षरी झाल्याचे सांगून ते म्हणाले की, अणुसहकार्यात ती महत्त्वाची पायरी होती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कराराच्या अंमलबजावणीसाठी हा करार होणे गरजेचे होते.

स्वात खोऱ्यात ७० तालिबानी ठार
इस्लामाबाद, ३फेब्रुवारी/पी.टी.आय.

वायव्य सरहद्दीत तालिबानी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराने उघडलेली मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून आज लष्कराच्या कारवाईत ७०हून अधिक तालिबानी ठार झाले.काल रात्रीपासून लष्कराने स्वात खोऱ्यात जमिनीवरून तसेच हवाई मार्गाने हल्ले केले. यामुळे या भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.तालिबान लवकरच इस्लामाबाद तसेच लाहोर शहरांपर्यंत आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, ही भीती व्यक्त करीत गेल्या आठवडय़ात अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने तालिबान्यांना स्वात खोऱ्यातून हुसकावून लावण्याचा निर्धार केला होता. चारबाग उपजिल्हा विभाग या तालिबान्यांच्या मौलाना फझलुल्ला या मूलतत्त्ववादी नेत्याचे वर्चस्व असणाऱ्या भागावर पाकिस्तानी लष्कराने काल केलेल्या हल्ल्यात ७०हून अधिक तालिबानी ठार झाल्याचे वृत्त डॉनने दिले आहे.

घातपातप्रकरणी स्पेनमध्ये चार भारतीय व पाकिस्तानी नागरिकासह १५ जणांना अटक
माद्रिद, ३ फेब्रुवारी/ए.एफ.पी.

इस्लामी दहशतवादी संघटनेशी लागेबंधे असल्याच्या संशयावरून स्पेनमध्ये पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून त्यामध्ये चार भारतीय व एक पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात स्पेनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, स्पेनमध्ये बार्सिलोना शहरातून १० जणांना तसेच मिस्लाटा शहरातून चार भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. या नागरिकांनी ओळखपत्रे तसेच इतर कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली असून, घातपाताच्या इराद्याने देशात आल्याचा संशय पोलिसांना असल्याचे ‘स्पेन रेडियो’ने म्हटले आहे. इस्लामी दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असण्याची शक्यताही त्यांनी युरोप प्रेसकडे व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेला भीषण हल्ला व २००४ साली माद्रिदमध्ये रेल्वेगाडीमध्ये झालेला बॉम्बस्फोट या घटनांनंतर स्पेनमध्ये अनेक संशयित इस्लामी अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. गेल्या २० जानेवारी रोजी कर घोटाळ्याच्या आरोपाखाली सहा पाकिस्तानी नागरिकांना स्पेन पोलिसांनी अटक केली होती. हे नागरिक घोटाळ्यातून मिळालेला पैसा इस्लामी अतिरेकी संघटनांना पुरवित असावेत असा संशय होता. मात्र पुरेशा पुराव्या अभावी या पाकिस्तानी नागरिकांची काही काळानंतर सुटका करण्यात आली.

‘रॉ’च्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

चेन्नईतील एका उद्योजकाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली. डॉ. ए. एस. नारायण राव असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते ‘रॉ’च्या तंत्रज्ञान विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.दिल्लीच्या करोल बाग येथील एका हॉटेलमध्ये डॉ. ए. एस. नारायण राव याने एका उद्योगपतीला लाच देण्यासाठी बोलावले होते. राव यांना लाच घेताना सोमवारी रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. चेन्नई येथील एका कंपनीकडे डॉ. ए. एस. नारायण राव यांनी निर्यात परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता करोल बागेतील एका हॉटेलमध्ये भेटून देण्याचेही ठरविण्यात आले. दरम्यान या गोष्टीची माहिती सीबीआयला मिळताच सापळा रचण्यात आला व ‘रॉ’मध्ये कार्यरत शास्त्रज्ञाला रंगंहाथ पकडण्यात आले. डॉ. ए. एस. नारायण राव यांच्याकडून चेन्नईतील कंपनीशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली. डॉ. ए. एस. नारायण राव यांना तीन दिवस सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश आज न्यायालयाने दिला आहे. गेल्या २००४ सालापासून रॉ गुप्तचर संघटना कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आली आहे. एका पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून ‘रॉ’चे तत्कालीन संयुक्त सचिव रविंद्र सिंग यांना अटक करण्यात आली होती.

घातपातावरून चार भारतीय अटकेत
माद्रिद, ३ फेब्रुवारी/ए.एफ.पी.

इस्लामी दहशतवादी संघटनेशी लागेबंधे असल्याच्या संशयावरून स्पेनमध्ये पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून त्यामध्ये चार भारतीय व एक पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे.
स्पेनमध्ये बार्सिलोना शहरातून १० जणांना तसेच मिस्लाटा शहरातून चार भारतीय व एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. या नागरिकांनी ओळखपत्रे तसेच इतर कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली आहे. इस्लामी दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असण्याची शक्यताही आहे. अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेला भीषण हल्ला व २००४ साली माद्रिदमध्ये रेल्वेत झालेला स्फोट यानंतर स्पेनमध्ये अनेक संशयितांना अटक झाली होती. गेल्या २० जानेवारी रोजी कर घोटाळ्यात सहा पाकिस्तानी नागरिकांना स्पेन पोलिसांनी अटक केली होती. हे नागरिक घोटाळ्यातून मिळालेला पैसा इस्लामी अतिरेकी संघटनांना पुरवित असावेत असा संशय होता. मात्र पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली.

सुशीलकुमार शिंदे यांना डॉक्टरेट
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मध्य प्रदेशच्या राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठाने डॉक्टरेट दिली आहे. भोपाळ येथे फेब्रुवारीअखेरीस होणाऱ्या दीक्षांत समारंभात शिंदे यांना सन्मानित करण्यात येईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील रचनात्मक कार्याबद्दल शिंदे यांचा हा गौरव होत असल्याचे कुलगुरु प्रा. पियुष त्रिवेदी यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल बलराम जाखड समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.