Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कान्हेरीचा किल्ला आणि स्मशानलेणी
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकापासून सुमारे १२ किलोमीटर्स अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कृष्णगिरी अर्थात कान्हेरीची लेणी वसलेली आहेत. गेल्या खेपेस याच सदरामध्ये आपण कृष्णगिरीच्या या लेण्यांच्या एका बाजूचा फेरफटका मारला. त्यामागचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेण्यांचा गुजरातशी आणि तत्कालीन सिंध प्रांताशी पर्यायाने प्राचीन सिल्क रूटशी असलेला संबंधही आपण शोधून पाहिला. त्यानंतर तीन ते चार वेळा पुन्हा एकदा कान्हेरीची वारी झाली.. आणि त्याचसुमारास आणखी एक नवीन गोष्ट समोर आली. अर्थात याही वेळेस सोबत होते पुरातत्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित. अगदी

 

बालपणापासून फेरफटका मारताना ही लेणी सूरज पंडितांच्याही मनात कायमची घर करून राहिली होती. आजही आपण त्यांच्यासोबत या लेण्यांचा फेरफटका मारतो त्यावेळेस लक्षात येते की, आता तर ती लेणी त्यांच्या नसानसामध्ये चांगलीच मुरली आहेत. कदाचित डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना इथे सोडले तरीही ते डोंगरात तीन स्तरांवर वसलेल्या या लेण्यांचा व्यवस्थित फेरफटका मारू शकतील. पण असे असले तरीही आपल्यासोबत मात्र ते अगदी नव्यानेच प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असल्याप्रमाणे फिरत असतात. कदाचित म्हणूनच आजही या परिसरामध्ये त्यांना अनेकदा काही नवे शोध लागतात. कधी ते लेण्यांच्या विविध संदर्भाचे असतात. काही वेळेस एक नवे लेणेच त्यांना सापडते. आता तर आजवर फारशी माहिती नसलेला कान्हेरीच्या किल्ल्याचा नवा संदर्भच त्यांच्या हाती लागला आहे.
आजवर आपल्याला माहीत होती ती कान्हेरीची लेणी. पण याच कान्हेरी लेण्यांच्या माथ्यावर कान्हेरीचा किल्लाही अस्तित्वात होता. त्याचा ढासळलेला बुरूज, त्याची तटबंदी आजही आपल्याला इथे पाहायला मिळते. मात्र जोवर आपल्याला याची पाश्र्वभूमी ठावूक नसते, तोपर्यंत हे सारे किल्ल्याचे अवशेष आहेत, याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनात येते नाही. या किल्ल्याचा शोध डॉ. पंडित यांना अलीकडेच लागला. आणि निमित्त ठरल्या त्या त्यांच्या पत्नी प्राची चौधरी. वारली साहित्यावर संशोधनात्मक काम करत असताना त्यांना वारली पंरपरेतील लोककथा- गीतांमध्ये कान्हेरी किल्ल्याचा संदर्भ सापडला. त्यानंतर या दांपत्याने नव्या संदर्भानिशी कान्हेरीची वारी केली आणि मग आजवर अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न उलगडत तर गेलेच पण अनेक गोष्टींचे दुवेही जुळून आले. मग किल्ल्याच्या तटबंदीची रेखाही सापडली आणि तटबंदीचे अवशेषदेखील. आजवर आपल्याला केवळ मुंबईमध्ये असलेले किल्ले माहीत होते. त्यात कान्हेरीचा उल्लेख आजवर कधीच आलेला नव्हता. मात्र आता याचा विचार करावाच लागेल. या किल्ल्याच्या संदर्भात फारशी माहिती कागदपत्रांमध्ये किंवा इतरत्र कुठेही उपलब्ध नाही. सर्वसाधापणपणे आजूबाजूच्या प्रदेशावर देखरेख करण्यासाठी किल्ल्यांचा वापर व्हायचा. तसा हा किल्ला नेमका केव्हा अस्तित्वात आला आणि त्याचा संदर्भ इतरत्र कुठे सापडतो काय याचा शोध आता इतिहास संशोधकांना घ्यावा लागेल. नाही म्हणायला वारल्यांच्या मौखिक परंपरेमध्ये या किल्ल्याचे अस्तित्व आजही सापडते. आपल्य़ा मौखिक परंपरांचे दस्तावेजीकरण म्हणूनच व्हायला हवे. कान्हेरीच्या किल्ल्यासारखे कदाचित आणखी अनेक संदर्भ आपल्याला त्यात सापडू शकतात..
कान्हेरीच्या लेण्यांवर आजवर केलेल्या या संशोधनानंतर आजही काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत का, या प्रश्नावर डॉ. पंडित उत्तरतात की, अनेक प्रश्नांची उकल झालेली असली तरीही अनेक नवीन प्रश्न पडत असतात. त्याचा इतिहासातील अनेक नोदींसह संगतवारी लावण्याचा प्रयत्न करतो. तरीही काही प्रश्न राहतातच. काही लेण्यांच्या संदर्भात आपल्याला निरीक्षणातून जेवढी माहिती मिळते तेवढीच. बाकी विशेष काही हाती लागत नाही. येथील लेणी क्रमांक १३ ते १९ बाबत असेच आहे. असे सांगून डॉ. पंडित माहिती देतात की, कान्हेरीचे महत्त्व कसे कमी होत गेले आणि त्याचे अस्तित्व संपुष्टात कसे आले, त्याची नेमकी माहिती नाही. त्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. त्या संदर्भातील एक गृहितक त्यांनी स्वतच तयारही केले आहे. ते सत्याच्या अधिक जवळ जाणारे आहे. मात्र तरीही आणखी अनेक गोष्टींचा शोध घ्यायला हवा, असे त्यांना राहून राहून वाटते.
कान्हेरीला येण्यापूर्वी दुर्गाबाई भागवतांचे पैस ज्यांनी वाचलेले असेल त्यांना हमखास आठवण होते ती स्मशान लेण्यांची. कान्हेरीला एरवी आपण फेटफटका मारतो त्यावेळेस ही स्मशानलेणी कधीच पाहण्यात येत नाहीत. साधारणपणे मंडळी या लेण्यांकडे फिरकतही नाहीत.
न फिरकण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही लेणी पाहण्यासाठी जाणारा मार्ग निसरडय़ा कातळावरून जातो. शिवाय काही ठिकाणी कडय़ाच्या एका बाजूने जीव धोक्यात घालून चालावे लागते. त्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. फिटनेस असेल तरच इथे येता येते. पण इथे आल्यानंतर जे पाहायला मिळते ते इतरत्र कुठेही दिसणार नाही. लेण्यांच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरच सुमारे ६३ लहान आकारातील स्तूप आहेत. कान्हेरीच्या विद्यापीठातील विविध आचार्याच्या नावे हे स्तूप बांधण्यात आले आहेत. त्यांच्या अस्थी या स्तूपामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय काही शिलालेख व ताम्रपटही इथे सापडले आहेत. यापैकी काहीच आज पाहायला मिळत नाही. त्याविषयी माहिती सांगताना डॉ. पंडित म्हणाले की, १८५० ते ६० च्यासुमारास वेस्ट नावाच्या एका शोधकाने य़ा स्थळाला भेट दिली होती. त्याने त्याच्या उत्सुकतेपोटी स्तूपांचे पूर्ण उत्खनन केले आणि त्यातील अनेक गोष्टी त्याने इथेच टाकून दिल्या. त्याच्यापैकी काही नोंदी केवळ उपलब्ध असून त्याचाच वापर पुरातत्व संशोधकांना होतो आहे. याच ठिकाणी लेण्यांच्या सुरुवातीस एक मोठा स्तूप पाहायला मिळतो. या स्तुपाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सूरज पंडित म्हणाले की, गौतम बुद्धाच्या तीन पट्टशिष्यांपैकी एक असलेल्या सारीपुत्ताचा हा स्तूप असावा, अशी शक्यता आहे. अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा मोठा स्तूप लेणी क्रमांक तीनच्या बाहेरच्या बाजूस आहे. त्याचे केवळ अवशेष आता आपल्याला पाहायला मिळतात. या अवशेषांमध्येही केवळ आता स्तूप असावा अशी शंका उपस्थित करणारा एक गोलाकार शिल्लक आहे. मात्र स्मशानलेण्यांमधील मोठय़ा स्तूपाचे अवशेष हे त्याची भव्यता स्पष्ट करणारे आहेत. त्याच्या खालच्या बाजूस दगडी तर वरच्या बाजूस विटांची बांधणी आहे. शिवाय त्यातील दगडी भागांवर कोरीव कामही करण्यात आले आहे. त्याची वरच्या बाजूस असलेली रचना ही अष्टकोनी पद्धतीची आहे. हा स्तूप कान्हेरीच्या सर्व स्तूपांमधील वेगळा व भव्य असा स्तूप आहे, त्यामुळे हा कोण्या विशेष व्यक्तीचा असावा. त्यामुळेच ज्या सारीपुत्ताचा उल्लेख कान्हेरीच्या संबंधात येतो, त्या सारीपुत्ताचाच तो असावा, अशी शक्यता डॉ. पंडित व्यक्त करतात. ज्यावेळेस वेस्ट यांनी उत्खनन केले त्यावेळेस काळजी घेतली असती तर आजही अनेक गोष्टी आपल्याला सापडल्या असत्या व इतिहासाचा नेमका उलगडा झाला असता, अशी शक्यता डॉ. पंडित व्यक्त करतात. यात कडय़ाच्या खालच्या बाजूस असलेल्या जंगलांमध्ये फिरणाऱ्या आदिवासींना सांगून तेथे सापडलेले काही शिलालेख कान्हेरीमध्येच बराच काळ काळजीवाहू म्हणून काम पाहिलेले व्ही. एम. वाणी यांनी स्वत: जमा केले. त्यावरील नोंदी उपलब्ध आहेत. वाणी यांचे हे कार्य पुरातत्व संशोधनाच्या दृष्टिने खूप महत्त्व राखणारे आहे.
येथे असलेल्या सर्व छोटेखानी स्तुपांची रचना ही एकसमान आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या विटा या खास केवळ स्तुपांसाठीच तयार करण्यात आल्या आहेत. त्या नेहमीच्या विटांप्रमाणे नाहीत तर त्यांचा आकार हा गोलाकाराबरोबर जाणारा आहे, हेच त्यांचे वैशिष्टय़ आहे. मोठय़ा स्तुपाच्या समोरच्या बाजूस आपल्याला तीन छोटेखानी लेणीही पाहायला मिळतात. या लेण्याकडून पुढे जाताना डाव्या बाजूस काही दगडी तर काही मातीचे स्तूपही दिसतात. अगदी टोकाला बसण्यासाठी एक जागा आहे. इथून समोर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मनोहारी भाग पाहाता येतो. पुढच्या बाजूस आणखी तीन लेणी आहेत. मात्र तिथे कोणत्याही शिल्पकृती पाहायला मिळत नाहीत. तर केवळ काही मानवनिर्मित भागच नजरेस पडतो. आपल्या संस्कृतीमध्ये स्मशानाला चांगली जागा मानली जात नाही. पण कान्हेरी फिरल्यानंतर स्मशान लेणे हीच कान्हेरीमधील सर्वात सुंदर जागा असावी, या निष्कर्षांप्रत आपण येवून पोहोचतो. आजही कान्हेरीचा शोध पूर्ण झालेला नाही. मध्यंतरी एकदा पाय घसरून पडल्यानंतर डोक्याला खोप पडली त्यावेळेस डोक्याला खोप पडावे असे टोकदार काय आहे, असा प्रश्न पडून त्याचा शोध घेतानाच डॉ. पंडित यांना एक लेणे सापडले, ते अद्यप स्वच्छ व्हायचे आहे. मात्र तिथे लेणे असल्याच्या खाणाखुणा आपल्याला बाहेरून पाहून स्पष्टपणे कळतात. शिवाय वन खात्याच्या क्षेत्रात येणाऱ्या आणखी काही लेण्यांचा अभ्यास होणे अद्यप बाकी आहे. कदाचित इतिहासाचा काही अनमोल ठेवा आपल्याला त्यामध्ये हाती लागेल, अशी शक्यता आहे. तोपर्यंत हा शोध असाच सुरू राहील..
vinayakparab@yahoo.com