Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

कान्हेरीचा किल्ला आणि स्मशानलेणी
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकापासून सुमारे १२ किलोमीटर्स अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कृष्णगिरी अर्थात कान्हेरीची लेणी वसलेली आहेत. गेल्या खेपेस याच सदरामध्ये आपण कृष्णगिरीच्या या लेण्यांच्या एका बाजूचा फेरफटका मारला. त्यामागचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेण्यांचा गुजरातशी आणि तत्कालीन सिंध प्रांताशी पर्यायाने प्राचीन सिल्क रूटशी असलेला संबंधही आपण शोधून पाहिला. त्यानंतर तीन ते चार वेळा पुन्हा एकदा कान्हेरीची वारी झाली.. आणि त्याचसुमारास आणखी एक नवीन गोष्ट समोर आली. अर्थात याही वेळेस सोबत होते पुरातत्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित. अगदी बालपणापासून फेरफटका मारताना ही लेणी सूरज पंडितांच्याही मनात कायमची घर करून राहिली होती. आजही आपण त्यांच्यासोबत या लेण्यांचा फेरफटका मारतो त्यावेळेस लक्षात येते की, आता तर ती लेणी त्यांच्या नसानसामध्ये चांगलीच मुरली आहेत. कदाचित डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना इथे सोडले तरीही ते डोंगरात तीन स्तरांवर वसलेल्या या लेण्यांचा व्यवस्थित फेरफटका मारू शकतील. पण असे असले तरीही आपल्यासोबत मात्र ते अगदी नव्यानेच प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असल्याप्रमाणे फिरत असतात. कदाचित म्हणूनच आजही या परिसरामध्ये त्यांना अनेकदा काही नवे शोध लागतात. कधी ते लेण्यांच्या विविध संदर्भाचे असतात. काही वेळेस एक नवे लेणेच त्यांना सापडते. आता तर आजवर फारशी माहिती नसलेला कान्हेरीच्या किल्ल्याचा नवा संदर्भच त्यांच्या हाती लागला आहे.

कान्हेरीमध्ये सिटीवॉक!
लोकसत्ता आणि मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण िवभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थेट इतिहासाचाच फेरफटका मारण्यासाठी कान्हेरी लेण्यांमध्ये सिटीवॉकचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी व रविवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० या वेळात हे सिटीवॉक होणार आहेत. लोकसत्ताच्या वाचकांनी त्यासाठी आगावू नोंदणी आवश्यक आहे. पुरातत्व तज्ज्ञ डॉ. सूरज पंडित आणि इतर तज्ज्ञ या सिटीवॉकमध्ये आपल्या सोबत असतील. रुपये शंभर भरून त्यासाठी नोंदणी करावी लागेल, त्याची पावती विद्यापीठातर्फे देण्यात येईल. एका वेळेस ३० वाचकांच्या गटाला सिटीवॉकमध्ये सहभागी होता येईल. ही नोंदणी लोकसत्ता कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट आणि कालिना विद्यानगरीतील मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाच्या कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क ६५९५२७६१, ६५२९६९६२ (सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.) लोकसत्ता कार्यालयातील नोंदणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच होईल. वाचकांना स्वखर्चाने कान्हेरी गुंफांच्या प्रवेशद्वारावर यावे लागेल. राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे पैसे भरून उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून ते कान्हेरीपर्यंत उपलब्ध असलेल्या बससेवेचा लाभ घेता येईल. शंभर रुपये शुल्कामध्ये केवळ तज्ज्ञांचे मानधन व कान्हेरी गुंफांचे प्रवेश शुल्क याचाच केवळ समावेश आहे

गिर्यारोहकांचा प्रजासत्ताकदिन
प्रजासत्ताकदिनी संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. सरकारी इमारती व मैदानांवर सर्वत्र ध्वजारोहणाचे विविध उपक्रम होत असतात. पण सह्य़ाद्रीतल्या दऱ्या, डोंगरात भटकणाऱ्या, सुळक्यांवर आरोहण करणाऱ्या काही मंडळींनी मात्र चक्क सुळक्यांवरच तिरंगा फडकविला आहे. विक्रोळी येथील ‘सह्य़ाद्री अ‍ॅडव्हेंचर क्लब’ (सॅक) या संस्थेची स्थापनाच मुळी १० वर्षांपूर्वी प्रजासत्ताकदिनी झाली. त्यामुळे संस्थेचा प्रत्येक वर्धापनदिनी कायमच सुळक्यांवरील आरोहणाने साजरा होत असतो. या वर्षी दशकपूर्तीसाठी त्यांनी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची निवड केली होती. रायगडच्या चारही अंगांनी तासलेल्या कडय़ांपैकी टकमक कडा, भवानी कडा व हिरकणी कडा अशा तीनही कडय़ांवर या मावळ्यांनी यशस्वी आरोहण केले आहे. २४ जानेवारी रोजी हिरकणीच्या साहसाला वंदन करीत तुळशीदास मांजरेकरने हिरकणी कडय़ावर आरोहण केले, तर प्रजासत्ताकदिनी अतिशय थरारक एक प्रस्तरारोहण करीत महादेव गायकवाड व महेंद्र कुबल यांनी टकमक कडा सर केला. तर २७ जानेवारी रोजी आरोहक प्रवीण फणसे याने सचिन पवारच्या साथीने भवानी कडा सर केला. या अशा थरारक आरोहणानंतर या सर्वानीच रायगडी शिवरायांची पालखी मिरवणूक अतिशय जल्लोषात काढली होती. विशेष म्हणजे गडावरील इतर पर्यटकदेखील या कार्यक्रमात उत्साहाने सामील झाले. या अनोख्या प्रजासत्ताक मोहिमेत वरील आरोहकांच्या सोबतच केशव नाईक, दत्ता चाळके, पॉल पेंटर, संजय बाबर, सुरेश नागवेकर, वनिता नागवेकर, किशोर कडवेकर, प्रदीप हरचरकर, रवींद्र खुळे, तृप्ती नाईक, श्रुती हरचरकर, अजय चव्हाण, राकेश मोरे, सुचित्रा मोरे व नीला आदित्य, गीतांजली मोदी, गोविंद साकी यांनी सहभाग घेतला होता. तर शेखर राजेशिर्के, रंजन गावडे, विनायक वाडेकर यांनी छायाचित्रण व चलचित्रण केले आहे. महाडचे डॉ. प्रशांत चुटके वैद्यकीय अधिकारी होते तर स्थानिक औकीरकर कुटुंबीय व डॉ. राहुल वारंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सुहास जोशी