Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

लोकमानस

नेमका कोणाचा वारसा सांगता आहात?

 

मा. अशोक चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
उद्योजकांच्या बैठकीनंतर (सामंजस्य करारावर सह्य़ा झाल्यानंतर) आपण केलेले महाराष्ट्रद्रोही विधान वाचून एक मराठी माणूस म्हणून आपली लाज वाटली.
खरं म्हणजे तुम्हाला ध्यानीमनी नसताना ही जी मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली, त्यामुळे काही गोष्टींची जाणीव तुम्हाला होणे आवश्यक आहे, की तुम्ही महाराष्ट्रातील १२ कोटी मराठी जनतेला बांधील आहात. उपऱ्यांना व दिल्लीला तोंड देणे हा तुमचा पक्षांतर्गत राजकारणाचा भाग आहे. ज्या महाराष्ट्राच्या सर्वोच्चपदी तुम्ही बसला आहात, तो महाराष्ट्र स्थापन होण्याकरिता १०६ हुतात्म्यांनी बलिदान केले आहे. हा लढा ऐन भरात असताना सर्व काँग्रेसी नेते हे नेहरूंच्या पदराआड लपून मराठी माणसाच्या विरोधात मोरारजी या नरराक्षसाला मदत करीत होते. (यात सर्व लहान थोर नेते व आपले पिताजी पण होते.) हे महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात काँग्रेस पक्षाचा शून्य सहभाग होता, जरा स्वपक्षातील इतर बाणेदार मुख्यमंत्र्यांकडे पाहा. तिकडे कर्नाटकात तीन वर्षांपूर्वी धरमसिंह बोलले होते, की बंगळुरू शहरामध्ये आयटी उद्योगात कन्नडीगांना प्राधान्य नसेल तर कशाला यांना सवलती द्यायच्या?
आज याच कर्नाटकात सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते सरकार बेळगावात राज्य अधिवेशन घेते. घरांवरच्या, दुकानांवरच्या मराठी पाटय़ा पोलीस जबरदस्तीने काढायला लावतात, मराठी भाषिकांना झोडपतात. साडेचार कोटी कन्नडीगांपुढे केंद्र सरकार झुकते व १२ कोटी मराठी माणसांचा नेता सांगतो, की मराठी माणसांच्या रोजगाराकरिता कुणी महाराष्ट्रात आंदोलन केले तर गय केली जाणार नाही. तुम्ही काँग्रेसवाले आणि भाजपवाले एकाच माळेचे मणी आहात. तिकडे मिझोराममध्ये १ डिसेंबरपासून परमीट पद्धत सुरू केली जाते, तर इथे बाहेरच्या लोंढय़ांना नियंत्रित करण्याऐवजी एसआरएच्या एलिजिबीलिटीच्या तारखा वर्षांवर्षांने वाढवतात. मराठी माणसाला आश्वासक वाटेल, असे काही करता येत नसेल तर त्याला कोलदांडा तरी घालू नका. तो लालू असेल, मुलायम असेल कितीही नालायक असले तरी आपल्या राज्यातल्या लोकांकरीता दिल्लीवर दबाव आणतात. तामिळींकरीता द्रमुक आपली सत्ता पणाला लावतो आणि इथे आमचा मुख्यमंत्री मुंबईला नीट मुंबई न म्हणता बंबई व बॉम्बे म्हणण्यात धन्यता मानतो. तुम्ही सांस्कृतिकमंत्री नसून, मुख्यमंत्री आहात व महाराष्ट्राच्याप्रती आपली जबाबदारी सर्वात जास्त आहे. याचे भान ठेवा. जर बाहेरच्यांना नोकऱ्यांकरिता महाराष्ट्रात अग्रक्रम असेल तर मग तुमच्या नांदेड जिल्ह्य़ात तुम्ही २० वर्षांत बळकाविलेल्या सर्व एजन्स्या पण तुम्हाला एकटय़ालाच का? हा प्रश्न मराठवाडय़ातला मराठी माणसाचा आहे.
आणीबाणीच्या काळात आपले पिताजी शंकरराव चव्हाण यांनी संजय गांधींचे जोडे उचलून महाराष्ट्राचा अपमान केला होता.
आपल्यासारख्या सुशिक्षित व मुंबईत आयुष्य काढलेल्या व्यक्तीला हे कळणे आवश्यक आहे, की राज ठाकरे व मनसे पक्ष तुमच्या व विरोधी पक्षांच्या दडपशाही व महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणाने खचून न जाता रस्त्यावर उतरला तेव्हा कुठल्याही पदाची अपेक्षा न करता तरुण हातात असलेली डिग्य््राांची भेंडोळी बाजूला ठेवून दगड हातात का घेतो आहे? जर भाषावार प्रांतरचना जवाहरलाल नेहरूंनी केली असेल तर मराठी माणसाने आपल्या हक्काच्या महाराष्ट्रात नोकरी मागणे हा गुन्हा कसा काय होतो?
ज्या महाराष्ट्रातील राज ठाकरे मराठी तरुणांकरीता लढत आहेत, त्याच महाराष्ट्रात ४०० वर्षांपूर्वी सर्वश्रेष्ठ क्रांतिकारक व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाचा लढा उभारीत होते. त्या वेळेला तानाजी, बाजीप्रभू, मदारी मेहतर, मुरारबाजी या मावळ्यांनी जातधर्म न बघता महाराजांकरीता आपले प्राण दिले व सूर्याजी पिसाळ, चंद्रकांत खोपडे, चंद्रराव मोरे विरोधात गेले. आपण कोणाचा वारसा सांगता आहात, याकडे महाराष्ट्र आणि ५० लाख हुशार, कर्तबगार पण बेरोजगार मराठी तरुण वाट बघतो आहे, अन्यथा तो तुमची पण गय करणार नाही.
शिरीष पारकर
सरचिटणीस व प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

‘मिठीबाई ड्रामा टीम’ हे नाव केवळ स्पर्धेसाठीच!
चतुरंगच्या सवाई एकांकिका स्पर्धेत अंतिम फेरीत रद्द करण्यात आलेल्या ‘जिलबी’ या एकांकिकेसंदर्भात तिचा लेखक-दिग्दर्शक म्हणून पुढील खुलासा करीत आहे : मिठीबाई कॉलेजतर्फे अनेक स्पर्धात सादर झालेली आणि विविध पुरस्कार प्राप्त केलेली ही एकांकिका सवाईमध्ये सादर करण्यास, कॉलेजने मुलांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांचा विचार करून परवानगी नाकारली होती. म्हणून मग मी ‘मिठीबाई ड्रामा टीम’ या नावाने सवाई स्पर्धेत प्रवेशिका भरली. चतुरंग प्रतिष्ठाननेही ती विशेषाधिकाराने स्वीकारली.
पण मिठीबाई कॉलेज ही एकांकिका सादर करीत नसल्याने ‘मिठीबाई’ या नावाला महाविद्यालयाने आक्षेप घेतला. त्याबद्दल मी कॉलेजला क्षमापत्र लिहून दिलं. मुलांच्या मेहनतीचं आणि कलाकृतीचं चीज व्हावं म्हणून कॉलेज व्यवस्थापनानंही मग मला फार वेठीस धरलं नाही. सवाई स्पर्धेचं महत्त्व लक्षात घेऊन कॉलेजनं सौम्य भूमिका स्वीकारली आणि प्रयोगात बाधा येऊ दिली नाही.
मात्र, अंतिम फेरीत ‘जिलबी’तली प्रमुख कलाकार श्रेया बुगडे हिच्याबाबत जे गैरसमज पसरविण्यात आले, ते अत्यंत चुकीचे होते. ती प्रयोगाला येणार होती. त्यासाठी तिला नागपूरहून आणण्याची व्यवस्थाही करण्यात येणार होती. दरम्यान, मी दोन दिवस अनुपस्थित असताना miscommunication मुळे आम्ही दोघं गैरसमजाचे बळी ठरलो. श्रेया या प्रयोगास हजर राहू शकली नाही.
त्यामुळे तांत्रिक कारणास्तव चतुरंगने आमची एकांकिका बाद ठरविली. मात्र, चतुरंगने आमची अडचण जाणून घेत नियमांच्या चौकटीत राहूनही शेवटपर्यंत आम्हाला सर्वतोपरी साहाय्य केलं. मी महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल त्यांचाही आभारी आहे.
सुनील हरीश्चंद्र
लेखक-दिग्दर्शक : ‘जिलबी’

जनतेच्या हिताचाच निर्णय
नांदेड येथे नवीन महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करण्याच्या निर्णयाआधी मराठवाडय़ाच्या औरंगाबाद येथे जाण्या-येण्यासाठी जनतेस साधारण ३०० कि. मी.च्यावर प्रवास करावा लागत होता. यामध्ये जनतेच्या वेळेबरोबरच प्रवासासाठी येणारा खर्च हीसुद्धा अतिशय महत्त्वाची बाब होती. मराठवाडय़ातील गोरगरीब जनतेसाठी ही बाब म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच म्हणावी लागेल. ज्या जिल्ह्य़ासाठी हा निर्णय घेतला गेला, त्यांच्या दृष्टीने ही घटना अतिशय चांगली अशी आहे. भौगोलिक दृष्टीने पाहिल्यास नांदेड हे ठिकाण परभणी, हिंगोलीपासून हाकेच्या अंतरावर असल्यासारखेच आहे. हे लक्षात घेतल्यास लातूर हे ठिकाण या सर्व जिल्ह्य़ांना खूपच दूरवर आहे. लातूरसह परभणी, हिंगोलीसाठी नांदेड अतिशय सोयीचे नैसर्गिक असे ठिकाण आहे. सर्व राजकीय मंडळींनी सदर निर्णयाचे स्वागतच करायला पाहिजे.
किशन शिंदे, नेरूळ, नवी मुंबई

किल्ल्यांचे जतन करा
छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांनी आदिलशाही, निजामशाही आणि बलाढय़ मुघल साम्राज्यशाहीशी लढा देऊन मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा जन्मदिन तिथीप्रमाणे ‘शिवजयंती उत्सव’ म्हणून सर्वत्र धूमधडाक्यात साजरा होतो. त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या संदर्भात जर विचार केला तर आपली मान शरमेने खाली जाईल इतकी किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. शिवरायांचा तेजस्वी इतिहास जपण्यासाठी किल्ल्यांचे सुशोभीकरण व डागडुजी करणे गरजेचे आहे. अनेक शिवजयंती मंडळे गुलाल उधळत मिरवणुका काढतात; परंतु केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा जमलेल्या पैशांतून काही ठराविक रक्कम बाजूला काढून ती एकत्र करून मोठा ‘निधी’ उभा करता येईल. अभ्यासकांचे मार्गदर्शन घेऊन दरवर्षी टप्प्याटप्प्याने किल्ल्यांची दुरुस्ती, सुशोभीकरण व अन्य विकास कामांकरता केला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती उत्सव साजरा केला असे म्हणता येईल!
संजय पाटील, बोरिवली, मुंबई