Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

कोल्हापुरातील महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प होणारच!
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच महिन्यात शुभारंभ शक्य
कोल्हापूर, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकणारा आणि शहरवासीयांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा देणारा २२० कोटी रुपये खर्चाचा रस्ते विकास प्रकल्प आता केवळ परमेश्वरच रोखू शकतो, अशा सुस्पष्ट शब्दांत महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकल्पाच्या सकारात्मक भवितव्याची ग्वाही दिली.

कोल्हापुरात १८ पासून लावणी महोत्सव
कोल्हापूर, ४ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

येथील लोकमंच चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर आणि परिसरातील रसिक प्रेक्षकांना मऱ्हाठमोळय़ा कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल, अशी माहिती ट्रस्टचे निमंत्रक नगरसेवक संभाजी देवणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.येथील केशवराव भोसले नाटय़गृह व शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. दिवसेंदिवस अस्तंगत होत चाललेल्या लावणी या लोककलेला पुन्हा एकदा सोन्याची झळाळी प्राप्त करून द्यावी, या उद्देशाने लोकमंचने कोल्हापुरात लावणी महोत्सवाला प्रारंभ केला. प्रारंभी पदरमोड करून आयोजित केला गेलेला हा महोत्सव आता रसिकांच्या जिव्हाळय़ाचा विषय बनला आहे.

ठेकेदारी सेवक, टपरीधारकांचे बार्शी पालिकेसमोर धरणे
सोलापूर, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बार्शी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील ठेकेदार कर्मचारी व टपरीधारकांच्या विविध मागण्यांसाठी लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने (आयटक) बुधवारी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. युनियनचे अध्यक्ष कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक ठेकेदार कामगार सहभागी झाले होते. पालिकेचे मुख्याधिकारी गोपीचंद राठोड यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यावर पालिका प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून आरोग्य विभाग ठेकेदार कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केले जाईल, असे आश्वासन दिल्याचे कॉ. प्रा. ठोंबरे यांनी सांगितले. कामगारांचा पगार ठेकेदाराने दरमहा ५ तारखेपूर्वी अदा करावा, साप्ताहिक सुट्टीसह सोयी-सवलती द्याव्यात, आवश्यक साधने व उपकरणांचा पुरवठा व्हावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन उदासीन असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत प्रा. ठोंबरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पालिकेने प्रस्तावित केलेल्या जागा व इतर जागांवर टपरीधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वेकडून खुली होणारी जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्या ठिकाणी टपरीधारकांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले. या आंदोलनात सम्राट अलाट, सचिन वाघमारे, वसंत कांबळे, रतन कांबळे आदींचा सहभाग होता. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील हे बार्शीत आले असता त्यांनाही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले.

माधवराव घाटगे यांना इंदिरा सद्भावना पुरस्कार
इचलकरंजी, ४ फेब्रुवारी / वार्ताहर

औद्योगिक प्रगतीमध्ये विकासात्मक योगदान देऊन सामाजिक जाणिवेतून कार्यरत राहिल्याबद्दल श्री गुरुदत्त शुगर्सचे कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांना राष्ट्रीय स्तरावरील इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार देऊन नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. नॅशनल इंटिग्रेशन अँड इकॉनॉमी कौन्सिलच्या वतीने शानदार समारंभात राज्यसभेचे उपाध्यक्ष के. रहमान खान यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी निवडणूक आयुक्त डॉ. कृष्णमूर्ती, बिहारचे राज्यपाल आर. एल. भाटिया, हरयाणा विधानसभेचे सभापती डॉ. रघुवीर सिंग कुडियान, तामिळनाडूचे राज्यपाल डॉ. भीष्मनारायणसिंग आदी उपस्थित होते. सुवर्ण व रौप्य कारागिरीचे वैशिष्टय़पूर्ण सन्मानपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त शुगर्स या खासगी कारखान्याच्या माध्यमातून माधवराव घाटगे यांनी सामाजिक कार्य केले आहे. सन २००५ च्या महापुरात ७ हजार पूरग्रस्त व जनावरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवा यांची केलेली सोय अतुलनीय ठरली. यापूर्वी माधवराव घाटगे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार उद्योगरत्न, नॅशनल बिझनेस लीडरशिप व कोहिनूर ऑफ इंडिया असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.

माघी एकादशीसाठी पंढरीत दीड लाख वारकरी
पंढरपुर, ४ फेब्रुवारी / वार्ताहर

पंढरी नगरीत दरवर्षी चार यात्रा भरत असून दोन मोठय़ा व अन्य दोन लहान यात्रांपैकी माघी यात्रा असून माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी नगरीत सुमारे दीड लाख वारकरी भाविक जमले असून, वारकऱ्यांनी चंद्रभागानदीचे वाळवंटही वारकरी अन् भक्त-भाविकांनी गजबजले आहे. विठ्ठलभक्त, वारकरी यांच्या सोयीकरिता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचे पाच मजले खुले केले असून, या मंडपातील दर्शन रांगेत सुमारे ५० हजार लोक उभे राहतात. दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले असून, इतर उपचार बंद केले आहेत. ज्यांना लगेच परतायचे आहे अशांकरता मुखदर्शनाची सोय अवघ्या ३० ते ४० फुटावर करण्यात आल्याने श्री. विठ्ठलाचे मुखदर्शन सहज होत आहे. यात्रा काळात अनुचित प्रकार होऊ नये या साठी उप पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक बालाजी इंगेवाड, उपनिरीक्षक राठोड प्रयत्नशील आहेत.

कालबाह्य़ वस्तूंच्या प्रदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद
फलटण, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

कालबाह्य़ होत असलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाद्वारे दर्शन घडवून आणण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष व स्वराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित वैविध्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनातील जुन्या काळातील लाकडी शेवगा, ग्रामोफोन, पितळीची भांडी, मोटारीच्या आकाराच्या पानपुडय़ा, बैलांच्या गळ्यातील घुंगराची चाळ, तलवार, गुप्ती, घंगाळे अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता. प्रदर्शनात २६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची वृत्तपत्रांतील फोटो, कात्रणे व संगणकातील फोटोंचा स्लाईड शोद्वारे शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कुस्ती स्पर्धेत ६० किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या इयत्ता बारावीतील अमोल लोखंडे याचा सत्कार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्राचार्य सुलोचना घनवटे, नगरसेविका मदलासा कुंभार व विजया जाधव, माजी नगरसेवक अशोक जाधव, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

कालिकादेवी पतंसस्थेचा शनिवारी ग्राहक मेळावा
कराड, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या विविध सेवा-सुविधांची माहिती व महती ग्राहकांना करून देण्यासाठी कर सल्लागार व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी साडेसह वाजता हा ग्राहक मेळावा हॉटेल अलंकारच्या सभागृहात होणार आहे. स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयडीबीआय, अ‍ॅक्सिस बँक, सिंडीकेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाबँक आदी बँकांच्या माध्यमातून कालिकादेवी पतसंस्थेने जलद सेवा देतानाच आयकर, इ-पेमेंटची सुविधाही दिली आहे. तरी या योजना व सेवा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्राहक कराडकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिरे यांनी केले आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे कार्यालय फोडून रोकड लंपास
सोलापूर, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बाळीवेशीतील गांधी नाथा रंगजी व्यापार संकुलात असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय फोडून चोरटय़ांनी ७२ हजारांची रोकड लांबविली. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. व्यापार संकुलात दुसऱ्या मजल्यावर कंपनीचे कार्यालय असून आसपास अन्य काही कार्यालयेही आहेत. चोरटय़ांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाच्या शटरची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी तेथील कपाट तोडून त्यातील तिजोरी बाहेर काढली आणि करवतीच्या साह्य़ाने तिजोरी मोडून ७२ हजारांची रोकड लंपास केली. या गुन्ह्य़ाची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अपहाराचा गुन्हा दाखल भारत निर्माण योजनेंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा ४ लाख ५३ हजार ७०० रुपये एवढा निधी परस्पर हडप केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक संगय्या चंद्रशेखर स्वामी व सोलापूर ग्रामीण बँकेचा शाखाधिकारी एल. व्ही. मदने या दोघाविरुध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २४ एप्रिल २००८ ते २५ ऑगस्ट २००८ या कालावधीत या दोघांनी संगनमत करुन सरपंचांच्या नावाच्या खोटय़ा सह्य़ा केल्या आणि अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

डाळिंबाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी
पंढरपूर, ४ फेब्रुवारी / वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील डाळिंबाच्या सौदे बाजारात ४ हजार क्रेट आले असून यात भगवा आरक्ता, गणेश या वाणाचा समावेश असून, मागील आठवडय़ात भगवा डाळिंबाला प्रति किलो १५१ दर मिळाला होता तर चालू आठवडय़ात १३१ रुपये प्रति किलोने विकला गेला असे सभापती दिनकर नाईकनवरे, सचिव कुमार घोडके यांनी सांगितले. पंढरपूरच्या मार्केट यार्डात डाळिंब उत्पादक शेतक ऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सौदे व विक्री होते.
डाळिंब सौदे बाजारात पंढरपूर तालुका तसेच आटपाडी, इंदापूर, मोहोळ, बारामती या भागातूनही डाळिंब विक्रीस येत आहेत. डाळिंब आवकेत वाढ होत असून, दरामध्ये वाढ अन् वजनावर विक्री यामुळे शेतकऱ्यांत विश्वास वाढल्याने या सौदे बाजारात वरचेवर वाढ होत आहे. मार्केट यार्डात मोठय़ा प्रमाणात डाळिंबाची होणारी आवक पाहून जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या हस्ते एक दिवसीय डाळिंब निर्यात वृद्धी या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. यात मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले, डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंनी उच्च प्रतीचे डाळिंब उत्पादन करून निर्यातदार शेतकरी अशी प्रतिमा तयार झाली पाहिजे. असे सांगितले.

सोलापूर जिल्ह्य़ातील पशुचिकित्सा व्यावसायिकांचे आज आंदोलन
पंढरपूर, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

पशुचिकित्सा व्यवसाय संघटना, नागपूर यांच्या आदेशानुसार पुकारलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा म्हणून सोलापूर जिल्ह्य़ातील सुमारे २०० ते २५० पशुधन पर्यवेक्षक ५ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. पशुवैद्यकीय व्यवसायास औद्योगिक दर्जा द्यावा तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषद कायदा १९८४ मधील तरतुदींची कसोशीने अमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी राज्यभर धरणे आंदोलन होत आहे. उद्या (दि.५) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यातील पशुवैद्यक व्यावसायिक संपावर जाणार आहेत, असे डॉ. सरताळे, शेंडगे, डॉ. भादले बोधसुर्वे यांनी सांगितले.

सांगली तालुक्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्याची मागणी
सांगली, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाने स्वतंत्र सांगली तालुक्याची घोषणा करावी, या मागणीचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले. मिरज तालुक्यात एकूण ६४ गावे असून, तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना महसुली कामासाठी मिरज हे गैरसोयीचे ठरत आहे. या भागातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी असून, राज्य शासनाने तात्काळ सांगली तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच पश्चिम भागातील सर्व ग्रामपंचायतींचे ठरावही उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी मनसेचे माजी आमदार नितीन शिंदे, काँग्रेसचे नगरसेवक हणमंत पवार, अमर पडळकर, समडोळीचे सरपंच एस. एम. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वैभव पाटील, सावळवाडीचे माजी उपसरपंच डॉ. मसुगटे, कवठेपिरानचे शिवाजी पाटील, कोळी, प्रकाश पाटील व आशिष कोरी आदी उपस्थित होते.

नवी पिढी समृद्ध असावी - खोत
गडिहग्लज, ४ फेब्रुवारी / वार्ताहर

उद्याच्या भारताचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आजची पिढी समृध्द झाली पाहिजे. स्वप्नातले सत्य साकारण्यासाठी, मातीतल्या मुलांना घडविण्यासाठी खरे बोलावे लागते. ती ताकद शिक्षक वर्गात दृढ व्हावी, असे विचार ग्रामीण कथाकार प्रा.अप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. शिवराज महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण समारंभात खोत बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कु.श्रध्दा डांगे या कॉलेज युवतीने ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत गावून सर्वाना भारावून टाकले. प्राचार्य एन.डी.खिचडी यांनी अहवाल वाचनातून वार्षिक आढावा घेतला. प्रा.व्ही.एम.सुरंगे यांनी स्वागत तर प्रा.आर.बी.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.खोत यांनी माणसे नावापेक्षा कामाने मोठी होतात. चांगल्या कार्याने नावारूपास येतो. तेव्हा माणुसकीची जपणूक करत निष्ठावंत बना असेही आवाहन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य भैरव कुंभार, प्राचार्य बी.एम.चांडके, टी.ए.पाटील, आनंदराव नाळे, के.जी.पाटील, जे.वाय.बारदेसकर, प्रा.आप्पासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी सचिव संतोष पाटील यांनी आभार मानले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी
सांगली, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील आत्महत्या केलेल्या विश्वनाथ शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश चिटणीस श्रीमती नीता केळकर यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या शेतकऱ्याने द्राक्ष बागेसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. पण द्राक्ष बागेवर दावण्या रोग पडल्याने या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेतूनच त्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंबच उघडय़ावर पडले असून त्यांना राज्य शासनाच्या मदतीची गरज असल्याचेही श्रीमती केळकर यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष बाबा कदम, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे हेही उपस्थित होते.

नव्या संधींचा शोध घेऊन विद्यार्थ्यांंनी व्यक्तिमत्त्व घडवावे’
कराड, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

अखंडित प्रक्रिया असणाऱ्या शिक्षणात दररोज नवनवीन दालने सुरू होत आहेत. तरी या नव्या संधींचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचा लाभ उठवावा, असे आवाहन शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी केले. नांदगाव (ता.कराड) येथे दिवंगत द्वारकाबाई सुकरे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ अशा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात अध्यक्षस्थानी होते, तर शिक्षण मंडळ कराडचे सचिव डॉ. रा. गो. प्रभुणे, दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे, आनंदराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.भगवानराव साळुंखे यांनी नांदगाव माळावर हा ज्ञानाचा मळा फुलल्याचे समाधान व्यक्त करुन दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेस सदैव सहकार्याची ग्वाही दिली.