Leading International Marathi News Daily                                गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोरिवलीत ‘ रेल रोको’
प्रवाशांच्या धुमसत्या असंतोषाचा उद्रेक

मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

विरारवाले लोकलमध्ये चढू देत नाहीत आणि गोरेगाव- मालाडहून आधीच भरून येणाऱ्या लोकलमध्येही चढता येत नाही.. बोरिवली लोकल कोणत्या फलाटावर लागेल आणि कधी रद्द होईल याचा नेम नाही.. उद्घोषणा नीट केल्या जात नाहीत आणि वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही.. रोजच्या या दुखण्याला वैतागलेल्या बोरिवलीतील रेल्वे प्रवाशांच्या सहनशक्तीचा आज अखेरीस उद्रेक झाला आणि संतप्त बोरिवलीकरांनी सुमारे चार तास लोकल सेवा रोखून धरली.

निवडणुकीची नांदी; सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी
* राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात सरासरी २० ते २५ टक्के वाढ
* घरभाडे आणि वाहतूक भत्त्याचा समावेश नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
मुंबई, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच विविध घटकांवर सवलतींचा वर्षांव करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करून या वर्गाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे सुमारे १४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी २० ते २५ टक्के वाढ होणार आहे. मात्र घरभाडे व वाहतूक भत्त्याचा निर्णय सरकारने पुढे ढकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये ‘थोडा गम, थोडी खुशी’ निर्माण झाली आहे. घरभाडे व वाहतूक भत्त्याचा निर्णय पुढे ढकलून सरकारने वर्षांला सुमारे चार हजार कोटी रुपये सध्या तरी वाचविले आहेत.केंद्र सरकारच्या धर्तीवर १ जानेवारी २००६ पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

‘मिहान’बाबतचा दबाव शासन झुगारणार?
रवींद्र पांचाळ
मुंबई, ४ फेब्रुवारी

महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर नेणार असलेल्या नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे एक खिडकी सुविधा आहे. या प्रकल्पात सहभागी होत असलेल्या नामवंत अशा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय उद्योगांना भारताच्या ‘प्रसिद्ध’ बाबूशाहीचा फटका बसू नये यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मात्र मिहानच्या पहिल्या टप्प्यावरच काही स्थानिक नेत्यांच्या दबावाच्या राजकारणामुळे या महाप्रकल्पातील विसंगतीचे चित्र सामोरे आले आहे.

कुलगुरूंनी कोंडून घेतले!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील स्टिंग ऑपरेशन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व समतावादी छात्रभारती या दोन्ही संघटनांवर घातलेली बंदी या मुद्दय़ावरून पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पंचाईत झाल्याने कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी आज पत्रकार परिषदेनंतर घाईघाईने काढता पाय घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी तब्बल दोन तास स्वत:लाच कार्यालयात कोंडून घेत पत्रकारांना टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या प्रकारानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी रात्री डॉ. खोले व प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले.

अणुऊर्जा महामंडळाचा फ्रेंच कंपनीशी करार; कोकणातील जैतापूर येथे प्रकल्प उभारणार
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/पी.टी.आय.

अणुव्यापारावरील ३४ वर्षांचे निर्बंध अणुकरारामुळे संपुष्टात आल्यानंतर भारतीय अणुऊर्जा महामंडळाने प्रथमच फ्रान्स येथील ‘अरेवा’ या कंपनीसोबत दोन अणुभट्टय़ा मिळविण्यासाठी व्यापारी करार केला आहे. १६५० मेगाव्ॉट अणुऊर्जा निर्माण करू शकतील अशा दोन अणुभट्टय़ा ही कंपनी भारताला पुरविणार असून महाराष्ट्रातील राजापूरनजीकच्या जैतापूर येथे हा अणुप्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. के. जैन आणि अरेवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अ‍ॅनी लौव्हरजीऑन यांच्यामध्ये प्रत्यक्ष करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या.

अपोलो मोहिमेच्या पाऊलखुणा चांद्रयानाला सापडल्या..
विनायक परब
मुंबई, ४ फेब्रुवारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चांद्रयान- एक’ या यशस्वी मोहिमेने अमेरिकेच्या अपोलो मोहिमेच्या पाऊलखुणा शोधण्याचा निर्णय घेतला होता. त्यात अपोलो-१६ या मोहिमेच्या काही पाऊलखुणा शोधण्यात चांद्रयानाला यश आले आहे. चांद्रयान अजून काही दिवसांत पुन्हा एकदा नेमक्या त्याच भागावरून प्रदक्षिणा करत पुढे जाईल, त्यावेळेस अपोलो-१६ या मोहिमेतील रोव्हरच्या भ्रमणाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती चांद्रयान मोहिमेत सहभागी ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. नरेंद्र भंडारी यांनी आज येथे ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत दिली.

बाबरी प्रकरणी कल्याणसिंह यांची माफी
लखनऊ, ४ फेब्रुवारी/पी.टी.आय.

आपली हिंदुत्ववादी ही प्रतिमा त्यागण्यासाठी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मुस्लिमांना खूष करणारे वक्तव्य केले आहे. मुस्लिम हे आपल्याला त्यांच्याविरोधी समजत नाहीत. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत बाबरी मशिद पाडली गेली. या कालखंडात मुस्लिमांविषयी आपण कधी दूजाभावाने वागलो नाही. पण तरीही ही मशीद पाडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या कृत्याबद्दल आपण मुस्लिमांची माफी मागतो असे वक्तव्य कल्याण सिंह यांनी केले आहे. भाजपाचा त्याग केल्यानंतर आपण आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह जवळ आलो. याबद्दल केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम मंडळीही दूरध्वनी आणि तारा करून आपले खास अभिनंदन करीत आहेत. आपण कधीही मुस्लिम विरोधी नव्हतो अन तसा सिध्द करणारा पुरावा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वेळा झालेल्या कारकीर्दीतही देता येणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर भाजपा पक्ष म्हणून नक्कीच कमजोर होईल असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. एकेकाळी बाबरी मशीद हे गुलामीचे प्रतीक असल्याचे वर्णन कल्याणसिंह यांनी केले होते. पण आता ते वेगळेच मत आळवत असून जात आणि धर्माचे राजकारण देशाला बरबाद करीत असल्याची आगपाखड त्यांनी केली आहे. मुलायम आणि आपण समविचारी आहोत. राजकीय आघाडय़ा आणि युती या गोष्टी वेगळ्या असल्या तरी काळाच्या कसोटीवर मैत्री टिकून उरते, असेही कल्याणसिंह म्हणाले.

सुमाताई करंदीकर यांचे निधन
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

निवृत्त शिक्षिका सुमाताई करंदीकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांच्या त्या पत्नी होत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने गेल्या गुरुवारी सुमा करंदीकर यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढतच गेली आणि आज रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले. ‘रास’ हे सुमा करंदीकर यांनी लिहिलेले आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन पुत्र, विवाहित कन्या, सुना आणि नात असा परिवार आहे. सुमाताईंनी देहदान व नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा देह सेंट जॉर्ज रुग्णालयाकडे देण्यात येणार असल्याचे रमेश पारधे यांची सांगितले.

इंग्रजीसह सर्व अमराठी शाळांमध्ये १ ते ४ थी पर्यंत मराठी विषय सक्तीचा
मुंबई, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

इंग्रजी व अन्य अमराठी भाषिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला आहे. मात्र हा निर्णय सी.बी.एस.ई. व आय.सी.एस.सी.च्या राज्यातील शाळांना लागू होणार नाही. इंग्रजी, उर्दूसह सर्व भाषक शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्याची सुरुवात येत्या शैक्षणिक (२००९-२०१०) वर्षांपासून करण्यात येईल. राज्यातील सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचे सरकारचे धोरण असून त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिल्यानंतर या संदर्भातील आदेश शालेय शिक्षण विभागाने आजच लागू केला. मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असला तरी मराठी विषयाचे औपचारिक मूल्यमापन होणार नाही व लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच दर आठवडय़ाला मराठी विषयाचे दोन तास घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. इंग्रजी व अन्य अमराठी शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मराठी विषय सक्तीचा करण्यात आल्याने त्यांना प्रचलित मराठी भाषेचा अभ्यासक्रम कठीण जाईल. त्यामुळे अमराठी शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता नव्याने मराठीचा अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. राज्यातील सी.बी.एस.ई. व आय.सी.एस.सी.च्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची मागणी विधिमंडळात करण्यात आली होती. तसा प्रस्तावही सरकारच्या विचाराधिन होता. मात्र अन्य राज्यांमध्येही या दोन अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये त्या-त्या राज्यांच्या भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केल्यास हे प्रकरण न्यायालयात गेले असते. त्यामुळेच शासनाने सी.बी.एस.सी. व आय.सी.एस.ई. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचे टाळण्यात आले आहे.

नागोठण्याजवळ एसटीला लक्झरीची धडक; तीन ठार
अलिबाग ४ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

म्हसळ्यातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी माथेरानला निघाले असताना त्यांच्या एसटीला मुंबईहून महाबळेश्वरला जाणाऱ्या लक्झरी बसने आज सकाळी सव्वासात वाजता गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठण्याजवळच्या जिंदाल कंपनीलगत समोरूनच जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयाचे प्राध्यापक शकील शहजहा, एसटी बसचालक राजीव घाडगे आणि लक्झरी बस चालक सुभाषकुमार बाबूलाल व्यास हे तिघे जागीच ठार झाले आहेत़ अन्य तिघे अत्यवस्थ, सात गंभीर तर २८ किरकोळ जखमी झाले.महाविद्यालयातील १८ मुली, २७ मुले आणि चार प्राध्यापक असे एकूण ४९ प्रवासी या एसटीत होत़े अत्यवस्थ आणि गंभीर जखमींना मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर किरकोळ जखमींना नागोठणे येथील सरकारी रूग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितल़े

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८