Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘मिहान’बाबतचा दबाव शासन झुगारणार?
रवींद्र पांचाळ
मुंबई, ४ फेब्रुवारी

महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर नेणार असलेल्या नागपूरच्या मिहान प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे एक खिडकी सुविधा आहे. या प्रकल्पात सहभागी होत असलेल्या नामवंत अशा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय उद्योगांना भारताच्या ‘प्रसिद्ध’ बाबूशाहीचा फटका बसू नये यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मात्र मिहानच्या पहिल्या टप्प्यावरच काही स्थानिक नेत्यांच्या दबावाच्या राजकारणामुळे या महाप्रकल्पातील विसंगतीचे चित्र सामोरे आले आहे.
देशातील सर्वार्थाने वैशिष्टय़पूर्ण ठरणार असलेल्या या प्रकल्पात बोईंग इंटरनॅशनल, एल अ‍ॅन्ड टी, टाटा कन्सल्टन्सी, विप्रो, एच. सी. एल टेक्नॉलॉजीस, डीएलएफ अशा असंख्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांचे उद्योग तसेच कार्यालये असणार आहेत. मिहानचे विशेष आर्थिक क्षेत्र संपूर्णत: आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार असून विविध उद्योगांना अखंड वीजपुरवठय़ाची गरज असणार आहे. त्यामुळे मिहानमध्येच २०० मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असून तो कोळशावर आधारित असेल. त्याचबरोबर २५ मेगाव्ॉट वीज निर्मिती डिझेलद्वारा केली जाणार आहे. वीजनिर्मिती प्रकल्प ६० हेक्टरच्या भूखंडावर उभा राहात असून वीजपुरवठा भूमिगत तारांद्वारे केला जाणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर आधारित आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात आरोग्य नगरी ४० हेक्टरवर वसणार असून २५०० रुग्णांची सोय ११ अत्याधुनिक रुग्णालयांत होणार आहे. न्यूरॉलॉजी, कार्डिऑलॉजी, अवयव प्रत्यारोपण आदींचे नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ येथे आपली सेवा देणार असून जगभरातून स्थलदर्शनासाठी भारतात येणाऱ्या पर्यटकांसह आरोग्यसेवेसाठीही पर्यटक यावेत, हा विचारप्रवाह यामागे आहे. आरोग्यनगरीबरोबर आयटी पार्क हा विशेष आíथक केंद्राचा एक महत्त्वाचा घटक असणार आहे. जगातील पाच आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी टीसीएस, एचसीएल, विप्रो या कंपन्यांनी आपल्या यंत्रणेच्या उभारणीचे काम सुरु केले आहे. आयटी पार्कमध्ये कॉल सेंटर्स, डेटा सेंटर, सॉफ्टवेअर प्रॉडक्शन हाऊस, अ‍ॅनिमेशन स्टुडिओज सुरु केले जाणार आहेत.
मिहान प्रकल्पासाठी नागपूरचीच निवड करण्यामागे आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरचे या शहराचे भौगोलिकदृष्टय़ा वैशिष्टय़पूर्ण असे स्थान आहे. त्याखेरीज नागपूर शहर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गानी जोडलेले असल्याने या शहराला प्राधान्य दिले गेले. या पाश्र्वभूमीवर प्रकल्प उभारणीला वेग येत असतानाच काही राजकारण्यांच्या नकारघंटा वाजू लागल्या आहेत. त्यांचा आवाज कायमचा क्षीण करणेच नव्हे तर हा प्रकल्प सुरळीत होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पणाला लावणे याला राज्य शासनाने अग्रक्रम दिला नाही तर या प्रकल्पाच्या प्रश्नचिन्हांचा गुंता वाढत जाणार आहे. (समाप्त)