Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अपोलो मोहिमेच्या पाऊलखुणा चांद्रयानाला सापडल्या..
विनायक परब
मुंबई, ४ फेब्रुवारी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चांद्रयान- एक’ या यशस्वी मोहिमेने अमेरिकेच्या अपोलो मोहिमेच्या पाऊलखुणा शोधण्याचा निर्णय घेतला होता. त्यात अपोलो-१६ या मोहिमेच्या काही पाऊलखुणा शोधण्यात चांद्रयानाला यश आले आहे. चांद्रयान अजून काही दिवसांत पुन्हा एकदा नेमक्या त्याच भागावरून प्रदक्षिणा करत पुढे जाईल, त्यावेळेस अपोलो-१६ या मोहिमेतील रोव्हरच्या भ्रमणाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती चांद्रयान मोहिमेत सहभागी ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. नरेंद्र भंडारी यांनी आज येथे ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत दिली.
मुंबईत सुरू असलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन प्लॅनेटरी सायन्समध्ये चांद्रयान मोहिमेवर प्रात्यक्षिकासह व्याख्यान सादर करण्याच्या निमित्ताने प्रा. नरेंद्र भंडारी मुंबईत आले होते. चांद्रयानाने अलीकडेच १०० दिवस पूर्ण केले. त्यानिमित्ताने या मोहिमेशी संबंधित सर्व तज्ज्ञांची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात प्रा. भंडारी सहभागी झाले होते. चांद्रयानातील सर्वच्या सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असून त्यातील सर्व यंत्रणांनी पाठविलेली माहिती ब्याललू येथील केंद्रापर्यंत व्यवस्थित प्राप्त होते आहे, असे सांगून प्रा. भंडारी म्हणाले की, या यंत्रणांनी पाठविलेल्या नोंदी या आजवरच्या चांद्रमोहिमांमधील सर्वात अचूक नोंदी आहेत. मात्र यातील काही यंत्रणांतील नोंदी अधिक सुस्पष्ट येण्यासाठी चंद्रावरील सूर्यप्रकाश अधिक प्रखर असण्याची गरज आहे. त्यामुळेच सूर्यप्रकाश अधिक प्रखर असेल त्यावेळेस या यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात येतील, असा निर्णय इस्रोने घेतला आहे. खरे तर गेल्यावर्षी अशाप्रकारचा प्रखर सूर्यप्रकाश चंद्रावर होता. ता पुन्हा काही महिन्यांनी सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढेल, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
अमेरिकन अंतराळवीरांनी प्रथम चंद्रावर पाऊल ठेवले. मात्र त्यासंदर्भात गेली काही वर्षे एक वादही सुरू आहे. म्हणूनच अमेरिकन अंतराळ यान आणि त्यांच्या रोव्हरचा माग काढण्याचा निर्णयही इस्रोने घेतला होता. त्यात अपोलो १६च्या पाऊलखुणा सापडल्या असून आता त्यातील रोव्हरच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न संशोधक चांद्रयानामार्फत करणार आहेत. येत्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा चांद्रयान याच भागातून भ्रमण करेल, त्यावेळेस रोव्हरच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. अपोलो १६ मोहिमेतील रोव्हरने एकूण २६.७ किलोमीटर्स भ्रमण केले होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या चांद्रयान चंद्राबरोबर ज्या कोनात भ्रमण करते आहे, तो कोन पाच अंशांनी वाढविण्याचा निर्णयदेखील इस्रोने घेतला आहे. चांद्रयानातील यंत्रणांची कार्यक्षमता व त्यांच्या नोंदीची अचूकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र हा कोन वाढविण्याबाबत सध्या संशोधकांमध्ये काही मतभेद आहेत. तरीही बहुतांश संशोधक हा कोन वाढविण्याच्या बाजूचे आहेत, असेही प्रा. भंडारी यांनी सांगितले. चांद्रयानातून चंद्राच्या पृष्ठभागावर आदळवण्यात आलेले मून इम्पॅक्ट प्रोब (एमआयपी) हे उपकरण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील श्ॉकल्टन विवराजवळ आदळले. एमआयपीने पाठविलेल्या नोंदींवर सध्या अभ्यासक काम करत आहेत. येत्या काही दिवसांत त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातील, असेही ते म्हणाले.