Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बोरिवलीत ‘ रेल रोको’
प्रवाशांच्या धुमसत्या असंतोषाचा उद्रेक
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

विरारवाले लोकलमध्ये चढू देत नाहीत आणि गोरेगाव- मालाडहून आधीच भरून येणाऱ्या लोकलमध्येही चढता येत नाही.. बोरिवली लोकल कोणत्या फलाटावर लागेल आणि कधी रद्द होईल याचा नेम नाही.. उद्घोषणा नीट केल्या जात नाहीत आणि वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही.. रोजच्या या दुखण्याला वैतागलेल्या बोरिवलीतील रेल्वे प्रवाशांच्या सहनशक्तीचा आज अखेरीस उद्रेक झाला आणि संतप्त बोरिवलीकरांनी सुमारे चार तास लोकल सेवा रोखून धरली. रेल रोको करणाऱ्या प्रवाशांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजला होता. प्रवाशांचा रुद्रावतार पाहून खडबडून जाग्या झालेल्या पश्चिम रेल्वेने काही उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. पण ही मात्रा कितपत लागू होईल याबाबत प्रवाशीच साशंकता व्यक्त करत आहेत.
सकाळी ९.१० वाजताची बोरिवली लोकल रद्द झाल्याचे निमित्त होऊन फलाट क्रमांक एकपासून प्रवाशांच्या उस्फूर्त आंदोलनाला सुरुवात झाली. हे दररोजचेच दुखणे झाल्याने वैतागलेल्या संतप्त प्रवाशांनी सदर लोकल रोखून धरली. त्यांच्याकडून जोरदार नारेबाजी करण्यात येत होती. त्यामध्ये अनेक महिलांचाही समावेश होता. बोरिवलीहून चर्चगेटकरिता वाढीव लोकलची मागणी करण्यात येत होती. त्याबाबत रेल्वेकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत विरारकडे एकही लोकल जाऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. हळूहळू जमाव वाढत गेला आणि ९.२५ वाजल्यापासून बोरिवली स्थानकातून रेल्वे वाहतूक ठप्प झाली.