Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कुलगुरूंनी कोंडून घेतले!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मुंबई विद्यापीठातील स्टिंग ऑपरेशन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व समतावादी छात्रभारती या दोन्ही संघटनांवर घातलेली बंदी या मुद्दय़ावरून पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पंचाईत झाल्याने कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी आज पत्रकार परिषदेनंतर घाईघाईने काढता पाय घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी तब्बल दोन तास स्वत:लाच कार्यालयात कोंडून घेत पत्रकारांना टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या प्रकारानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी रात्री डॉ. खोले व प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले.
‘स्पिरीच्युअल जर्नी : आस्पेक्ट ऑफ सिख स्टडीज’ या विषयावर विद्यापीठात १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी आज कालिना संकुलात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती दिल्यानंतर मनविसे व समतावादी छात्रभारती या संघटनांवर घातलेली बंदी, स्टिंग ऑपरेशनचे प्रकरण हे मुद्दे उपस्थित करीत पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. या प्रकरणाची चौकशी चालू आहे, पत्रकार परिषद फक्त आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित केली आहे असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्टिंग ऑपरेशनमुळे विद्यापीठाची बदनामी झाली आहे, त्यामुळे तुम्ही विद्यापीठाची केवळ भूमिका मांडा. हवे तर आम्ही कॅमरे बंद ठेवतो, अशी विनंती पत्रकारांनी केली. पण पत्रकार परीषद संपल्याचे सांगत त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कुलगुरूंनी पत्रकारांना त्यांच्या केबिनमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर पाठविले व आतून कडी लावली. जनसंपर्क अधिकारी आशुतोष राठोड यांची तर भंबेरीच उडाली. कुलगुरू नंतर पत्रकार परिषद घेतील, तुम्ही इथून जा अशी विनवणी ते करू लागले. सुरक्षा रक्षकांनांही त्यांनी पाचारण केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करू नका, असा दम भरत राठोड यांनी पोलिसांना पाचारण करू असा इशाराही देवून पाहिला. राठोड यांचे कोणी ऐकत नाही हे लक्षात आल्याने कुलगुरूंनीच काही पत्रकारांना फोन केला व मी कार्यालयातून निघून गेलो आहे; तुम्हीही निघून जा, अशी विनवणी करून पाहिले. अखेर सायंकाळी सात वाजून नंतर बातमी देण्याच्या घाईमुळे सर्व पत्रकार निघून गेले आणि अखेरीस डॉ. खोले यांची सुटका झाली.