Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अर्भकाचे अपहरण : डॉक्टर, नर्सचे निलंबन स्थगित
मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

मोहिनी आणि मोहन नेरूरकर या दाम्पत्याचे नवजात अर्भक पळविले गेल्या प्रकरणी पालिकेच्या शीव येथील लो. टिळक इस्पितळातील संबंधित वॉर्डचे प्रमुख डॉक्टर व प्रमुख नर्स यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचा गेल्या आठवडय़ात दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज तहकूब केला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पालिका प्रशासनाने डॉ. स्वप्निल कोरे व परिचारिका शोभा परब यांना सोमवारी निलंबित केले होते. मात्र आता चौकशी सुरू राहणार असली तरी हे दोघे पुन्हा कामावर रुजू होऊ शकतील.
गेल्या आठवडय़ात दिलेल्या आदेशानुसार सकाळी स्वत: हजर न होता पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी प्रतिज्ञापत्र केले होते. न्यायालयाने त्यांच्या जातीने हजेरीचा आग्रह धरल्यावर गफूर दुपारी हजर झाले. त्यांनी न्यायालयास सांगितले की, या अर्भक अपहरण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास तुकडी स्थापन करण्यात आली असून परिमंडळ-४ चे उपायुक्त या तपासावर जातीने लक्ष ठेवत आहेत. तपासाच्या दृष्टीने हे प्रकरण कठीण असल्याने पळविल्या गेलेल्या अर्भकाचा शोधासाठी निश्चित कालमर्यादा सांगता येण्यासारखी नसली तरी लवकरच यश येईल याविषयी खात्री वाटते.
न्या. बिलाल नाझकी व न्या. अनूप मोहता यांच्या खंडपीठाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात पोलीस आयुक्तांनी सांगितले की, ज्या महिलेने अर्भक पळविले ती नेमकी कोण हे समजले नसले तरी तिचा शोध घेता येईल, अशी माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. या महिलेचे पूर्वी अनेक वेळा गर्भपात झाले होते व त्यामुळे ती इतरांच्या अर्भकांना उचलून घेत असे अशी माहिती मिळाली आहे. अशा वैद्यकीय समस्येसाठी त्या इस्पितळात कोण महिला येत असत याची माहिती घेतली जात आहे. शिवाय श्रीमती नेरूरकर यांनी दिलेल्या वर्णनावरून त्या महिलेची काल्पनिक रेखाचित्रे तयार करून ती शहरात जागोजागी लावण्यात आली आहेत.
आम्हाला मूळ शोधून हवे आहे व त्याच्या अपहरणास कोण जबाबदार आहे याचे उत्तर हवे आहे. ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही इस्पितळाच्या अधिष्ठात्रींना व प्रसंगी पालिका आयुक्तांनाही निलंबित करू अशी कठोर भूमिका न्यायालयाने घेतली होती. मात्र पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील के. के. सिंघवी व पालिका इस्पितळांमधील वैद्यकीय अध्यापकांच्या संघटनेतर्फे अ‍ॅड. सुदीप पासबोला यांनी बाजू स्पष्ट केल्यानंतर डॉक्टर व परिचारिकेचे निलंबन स्थगित करण्यास न्यायमूर्ती तयार झाले. मात्र नायर इस्पितळाचे अधिष्ठाते डॉ. रवी रणनवरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने येत्या १० दिवसात काम पूर्ण करून जबाबदारी निश्चित करणारा अहवाल सादर करावा. तसेच पोलिसांनीही त्यांच्या तपासाचा साप्ताहिक अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
सिंघवी यांनी सागितले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे व पालिका प्रशासनाने तिची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठीही उपाय योजले गेले आहेत. डॉक्टर किंवा परिचारिकेस निलंबित करून पळविले गेलेले मूल मिळणार नाही. एवढेच नव्हे तर न्यायालयाने याचिका मंजूर केली तरीही त्याने काही हाती लागणार नाही. त्यामुळे जबाबदारी निश्चित करणारी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणासही निलंबित करणे योग्य होणार नाही. पासबोला यांनी असे दाखवून दिले की, न्यायालयाच्या आदेशावरून ज्या डॉक्टरला निलंबित केले गेले आहे त्यांचा अर्भक पळविले जाण्याची काहीही संबंध नाही.