Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

सुनील गावस्कर यांना डॉक्टरेट प्रदान
नवी मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सक्षम भारत घडविण्याची ताकद शिक्षणात असून, जगात ताकदवान राष्ट्र म्हणून स्वत:ची छाप पाडण्यासाठी देशातील विद्यापीठांनी ठामपणे वाटचाल करण्याची आवश्यकता महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज नेरुळ येथे व्यक्त केली.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आज सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर तसेच मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ तर ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर. सी. सिन्हा यांना ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ या पदव्यांनी आज सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. डी. वाय पाटील, विजय पाटील, अजिंक्य पाटील तसेच मॉरिशसच्या ज्येष्ठ मंत्री शीला बापू आदी मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या आव्हानात्मक काळात जागतिक नकाशावर स्वत:चा ठसा उमटविण्यासाठी भारत सज्ज झाला असून, ही छाप अधिक ठसठशीतपणे उमटावी यासाठी आर्थिक विकासाची प्रक्रिया स्थिर असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी राज्यपाल जमीर यांनी यावेळी व्यक्त केले. देशातील विद्यापीठांनी केवळ शिक्षण पुरविण्याऐवजी शैक्षणिक प्रक्रियेतूनच नामवंत अशा उद्योगपतींची निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्नशील रहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अतिशय कल्पक अशा तज्ज्ञांची फळी उभारण्याचे आव्हान सध्या देशापुढे असून, विद्यापीठांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावावी, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम यांच्या अनुपस्थितीत शीला बापू यांनी डॉक्टरेटचा स्वीकार केला. सध्या संपूर्ण जग वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत असताना भारतासारख्या लोकशाही मूल्ये जोपासणाऱ्या देशाने आता संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रामगुलाम यांनी आपल्या भाषणाद्वारे केले. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही, हा मोठा सन्मान असल्याचे सांगितले. लहानपणी मी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, डॉक्टर होण्याएवढी आपली कुवत नाही, हे मला लवकरच लक्षात आले. आज मात्र या पदवीमुळे मला अभिमान वाटत आहे, असे गावसकर यांनी हा सन्मान स्वीकारताना सांगितले.