Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

खासगी रुग्णालय सुरू करण्याचा पालिकेचा वादग्रस्त निर्णय
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

बोरिवली येथे अत्याधुनिक सोयींनी सज्ज असणारे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी केली आहे. या रुग्णालयात उपचारासाठी मात्र पैसे मोजावे लागतील. आयुक्तांच्या या निर्णयावर टीका होत आहे. तसेच गेल्या वर्षी मॉल बांधण्याची घोषणा आयुक्तांनी केली होती, त्याचे काय झाले असा सवालही विचारला जात आहे.
बोरिवली, मागाठाणे येथे माता व बाल रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयात मध्यमवर्गीयांवर उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रसूतिसाठी ५०० रुपये तर बालकांच्या रुग्णशय्येसाठी ५० रुपये भाडे आकारले जाणार आहे. या रुग्णालयात पालिकेचे पूर्णवेळ कर्मचारी असतील. उच्च दर्जाची चिकित्सालयीन सेवा २४ तास पुरविली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर अशी रुग्णालये नव्याने सुरू करण्यात येतील, असे फाटक यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.
आरोग्य खात्यावरील खर्च या अर्थसंकल्पात कमी केला असताना खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय सुरू करण्याची गरज काय, असा सवाल विचारला जात आहे. पालिका रुग्णालयातील अनेक सेवांचे आधीच खासगीकरण करण्यात आलेले आहे, आता पूर्णपणे खासगी रुग्णालय बांधण्याचा पालिकेचा निर्णय गैर आहे, असे विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी आयुक्तांनी केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. शहरात दिवसेंदिवस वाढणारे मॉल बघून पालिकेनेही स्वत: मॉल बांधण्याची घोषणा आयुक्तांनी केली होती. मात्र वर्षभरात असा मॉल उभा राहीला नाही. या अर्थसंकल्पातही आता पालिका बाजार सुरू करण्याची घोषणा आयुक्तांनी केली आहे.