Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शिवसेनेच्या शिववडापावसाठी पालिकेची लगीनघाई!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली ‘शिव वडापाव’ ही योजना लागू करण्याची पालिका प्रशासनालाच घाई झाली आहे. पालिकेने या योजनेसाठी झुणका भाकर केंद्राप्रमाणे आधार केंद्रे बांधण्यास मान्यता दिली असून अर्थसंकल्पात त्यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे.
झुणका भाकर केंद्रे राज्य सरकारने रद्द केली आहेत. मात्र पालिकेच्या जागेवर असणाऱ्या झुणका भाकर केंद्रांना ‘अन्नदाता आधार केंद्र’ असे नाव देऊन ही योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या योजनेला आधीच मान्यता दिलेली आहे. आता अर्थसंकल्पातही या योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. शहरातील २१५ ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच पालिकेच्या इतर कार्यालयांत, इस्पितळांतही शिववडा पाव मिळणार आहे. शिवाय रस्त्यांवरील गाडय़ांना पालिका मान्यता देणार आहे. विशेष म्हणजे गेले काही वर्षे पालिकेने रस्त्यांवरील गाडय़ांना परवाना देणे बंद केले आहे. पालिका अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आल्याने पालिकेच्या निधीतून ही आधार केंद्रे बांधली जाणार आहेत. पालिका अर्थसंकल्पाला अजून पालिका सभागृहाने मंजूरी दिलेली नाही. मात्र या आधार केंद्रांना सुरू करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या जवळच्या कार्यकर्त्यांना ही आधार केंद्रे चालवायला मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.