Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

१२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राज्य शासनाने आज १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नांदेडचे जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे
सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे. या पूर्वीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री नाराज असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे होते.
एम. बी. गायकवाड यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र शेती महामंडळ पुणे, या पदावरून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या पदावर बदली झाली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना नांदेडचे जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरनारायणन यांना अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तर ओमप्रकाश बकोरिया यांना गडचिरोलीमधील अहेरी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पदावरून बदलून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीनकुमार शिवदास खाडे हे आता नव्या नियुक्तीनुसार चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन सेवा या पदाचा कार्यभार पाहतील. तर पुणे-िपपरी चिंचवड परिवहन सेवेचे आधीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार हे आता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.
मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य आक. आर. मांजरीकर यांना हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्याधिकारी हर्षदिप कांबळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे उप सचिव मारुती सावंत यांना आयुक्त अपंग कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.