Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आरोग्य संचालकांच्या प्रतिनियुक्तीची फाईल गहाळ
संदीप आचार्य
मुंबई, ४ फेब्रुवारी

 

महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचे वेळोवेळी धिंडवडे निघत असतानाच आता मंत्रालयातील ‘बाबू’ लोकांच्या मनमानी कारभाराचा फटका आरोग्य विभागाला बसला आहे. राज्याचे आरोग्य संचालक हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असताना त्यांना मुदतवाढ देणे, अथवा प्रतिनियुक्ती करणे किंवा दुसऱ्या कोणाची संचालकपदी नियुक्ती करणे एवढेही काम वेळेत करणे आरोग्य खात्यातील उच्चपदस्थांना जमलेले नाही. त्यातच विद्यमान संचालक एस. बी. चव्हाण यांच्या प्रतिनियुक्तीची फाईल गहाळ झाल्यामुळे गेले चार दिवस राज्याचा आरोग्य विभाग संचालकाविना पोरका झाला आहे. या साऱ्यामागे आरोग्य संचालकपदी सनदी अधिकारी नेमण्याचा संबंधितांचा घाट असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
यापूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांची वर्णी ‘इएसआयएस’च्या आयुक्तपदी लावण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र एडस् सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून डॉक्टरांच्या जागी सनदी अधिकारी नेमण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे मिशन डायरेक्टर म्हणूनही सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील सहसंचालक आस्थापना या पदीही सनदी अधिकाऱ्याला नेमून आरोग्य विभागच ताब्यात घेण्याचे काम सनदी अधिकाऱ्यांकडून पद्धतशीरपणे करण्यात येत असून आरोग्य संचालकपदाचा घोळ निर्माण करून भविष्यात आरोग्य संचालकपदीही सनदी अधिकाऱ्यांचीच नेमणूक करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचे मत आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कुपोषणापासून राज्यात कोठेही आरोग्याची समस्या निर्माण झाली तर उत्तर देण्यासाठी मंत्रालयातील ‘बाबू’ लोक कधीही पुढे येत नाहीत उलट प्रत्येकवेळी डॉक्टरांनाच बळीचा बकरा करण्यात येत असतो. यापूर्वीही कुपोषणाचा प्रश्नावर शासन काय करणार याबाबत मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याची वेळ आली त्यावेळी तत्कालीन आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळूंखे यांनाच न्यायालयात पाठविण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर विद्यमान आरोग्य संचालक डॉ. एस. बी. चव्हाण हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असल्याचे माहित असतानाही या पदाबाबत वेळेत निर्णय घेण्यात आला नाही. आरोग्य संचालक डॉ. प्रकाश डोके हे १ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त संचालक असलेल्या डॉ. चव्हाण यांना १५ डिसेंबर रोजी संचालक म्हणून नेमण्यात आले. ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार असल्यामुळे केवळ १५ दिवस संचालकपदाची जबाबदारी मिळाली होती. या पाश्र्वभूमीवर डॉ. एस. बी. चव्हाण यांच्याबाबत वेळेत निर्णय करणे आवश्यक होते. मात्र मुदतवाढ न देण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे त्यांच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव खात्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. याबाबतची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे गेली व तेथून ही फाईल नेमकी कोठे आहे याचा पत्ता लागत नसल्यामुळे गेले चार दिवस आरोग्य खात्याच्या संचालकपदी कोणाचीही नेमणूक होऊ शकलेली नाही. डॉ. चव्हाण यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार सहसंचालक डॉ. गुप्ता यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र त्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामागे संचालकपदी तीन वर्षे सेवा झालेल्या अतिरिक्त आयुक्त नेमणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. डॉ. गुप्ता यांची अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश मॅटने आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही डॉ. गुप्ता यांची अतिरिक्त संचालक म्हणून नेमणूक करण्यास आरोग्य विभागातील ‘बाबू’ लोकांनी तीन वर्षे घोळ घातला. आज आरोग्य विभागात अतिरिक्त आयुक्त, सहसंचालक, उपसंचालक यांची अनेक पदे रिक्त असून याची जबाबदारी कोणाची असा सवालही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील अनेक पदांच्या नियुक्त्या वेळेत न केल्यामुळे हा विभागच ‘आजारी’ पाडण्याच्या मार्गावर असून याची जबाबदारी हे ‘बाबू’ लोक घेणार आहेत का, असा सवाल आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.