Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

लोकल रद्द होण्याचे केवळ निमित्त!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

अचानक उद्रेक होणाऱ्या एखाद्या सुप्त ज्वालामुखीप्रमाणे आज सकाळी बोरिवली स्थानकात संतप्त प्रवाशांच्या भावना उफाळून आल्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून पश्चिम रेल्वेकडून केवळ बोरिवली-विरार पट्टयाचाच विचार होत आहे. बोरिवलीकरांच्या समस्यांकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे आजचे आंदोलन होण्यासाठी लोकल रद्द होणे हे प्रवाशांच्या आंदोलनासाठी केवळ निमित्त ठरले. पश्चिम रेल्वेचा ढिसाळ कारभार पाहता कधी ना कधी हे होणारच होते, अशी भावना बहुतांश बोरिवलीच्या प्रवाशांकडून व्यक्त होत होती.
आधी फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवरून सोडण्यात येणाऱ्या बोरिवली लोकल पुन्हा तेथूनच सोडण्यात याव्या. नव्या सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटावरून सोडण्यात येणाऱ्या गाडय़ांच्या वेळा आणि फलाट बदलू नयेत. बोरिवली गाडय़ा अंधेरीच्या पुढे जलद कराव्या अशा काही बोरिवलीकरांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली होती व त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचेही आश्वासन रेल्वेने दिले होते. प्रवाशांच्या आंदोलनानंतर पश्चिम रेल्वेने काही तातडीच्या उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये राजेंद्रनगर पुलावरून फलाट क्रमांक आठवर जाण्यासाठी जिने बांधणे. फलाट क्रमांक सात व आठमधील भुयारी मार्गापर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी बेस्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे. सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत फलाट क्रमांक एक, दोन आणि तीनवरून चर्चगेटकरिता लोकल सोडणे कितपत शक्य आहे; याचा आठवडय़ाभरात आढावा घेणे आणि केबल चोरीला आळा घालण्यासाठी आरपीएफची गस्त वाढविणे या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस. एस. गुप्ता यांनी सांगितल्या. मात्र यापैकी बहुतांश उपाययोजना करण्यास बराच कालावधी जाणार असल्याने बोरिवलीकरांना त्वरित कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांचे हे आंदोलन सुरू असताना माजी रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्यासह भाजपा, शिवसेना, मनसेचे अनेक स्थानिक कार्यकर्ते बोरिवली स्थानकात होते. मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गावरील लोकलची संख्या वाढवून वेळापत्रकाचे ताळतंत्र ठेवण्याची मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केली.