Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

वोरिवली स्टेशनवर सकाळपासून शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला एक वाजण्याच्या सुमारास हिंसक वळण लाभले. संतप्त आंदोलकांवर दगडफेक करून, रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस सुरू केली. काही मीडियावाल्यांच्या कॅमेऱ्यांचेही त्यांच्याकडून नुकसान करण्यात आले. अखेर दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास रुळांवरील आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र निश्चितपणे किती लोक जखमी झाले, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एक्स्प्रेस वृत्तसमुहाचे छायाचित्रकार आशिष शंकर हेसुद्धा पोलिसांच्या लाठीमारात जखमी झाले.
याप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना अटक केली असून त्यामध्ये १९ महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध दंगल, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, रेल्वे मालमत्तेचे नुकसान आदी गुन्हे दाखल करण्यात आहेत. प्रवाशांचे आंदोलन चिघळल्याने ३०० अतिरिक्त पोलीस मागविण्यात आले होते. प्रवाशांच्या दगडफेकीत त्यापैकी १५ जण जखमी झाले असून, भगवती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रेल्वे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वातावरण निवळल्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता उपनगरी वाहतूक सुरू करण्यात आली. तोपर्यंत केवळ चर्चगेट-गोरेगावदरम्यान पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक सुरू होती. सर्व बोरिवली, विरार लोकल रद्द करण्यात आल्या. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा मार्गातच रखडल्या. तर मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या दोन गाडय़ा उशिराने रवाना झाल्या. वेळापत्रक कोलमडल्याने उपनगरी गाडय़ांची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिराने सुरू होती. त्यामुळे लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
मालाड येथे चोरटय़ांनी सिग्नल यंत्रणेची वायर चोरल्याने ९.१० वाजताची लोकल रद्द करावी लागली होती. मात्र एक लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे गैर असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या आंदोलनामुळे अंधेरी-विरार पट्टय़ातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कार्यालयात वेळेवर पोहोचता न आल्याने अनेकांचे मस्टर चुकले. लोकल बंद असल्याने बसेसमध्ये तोबा गर्दी उसळली होती. बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि रिक्षाही सहजासहजी मिळत नव्हत्या.