Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपतींच्या विमानासाठी अमरावती विमानतळाचा विस्तार!
मुंबई, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

भारताच्या राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांना नवी दिल्लीहून थेट अमरावतीला येता यावे म्हणून राष्ट्रपती भवनच्या सूचनेवरून राज्य सरकारने अमरावती विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले आहे. हे काम खासगीकरणातून करण्यात येणार असले तरी भूसंपादनाकरिता ६५ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अमरावती राष्ट्रपतींचे सासर आहे. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर गेल्या दीड वर्षांंत त्यांनी आतापर्यंत दोनदा अमरावतीला भेट दिली. अमरावती विमानतळावरील धावपट्टी छोटी असल्याने राष्ट्रपतींचे विशेष विमान तेथे उतरू शकत नाही. यामुळेच भारतीय वायूदलाचे बोईंग विमान उतरू शकेल अशा आकाराची म्हणजेच ३२०० चौरस फुटाची धावपट्टी केली जावी, अशी सूचना राष्ट्रपती भवनातून करण्यात आल्याचे राज्य शासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार राज्य शासनाने अमरावती विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे काम खासगीकरणातून केले जाणार असले तरी भूसंपादनाकरिता राज्य सरकार ६५ कोटी रुपये देणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. हा प्रकल्प २७९ कोटी रुपयांचा आहे. उर्वरित २१४ कोटी रुपये मात्र सरकारला खर्च करावे लागणार नाहीत.
राष्ट्रपती भवनच्या पाठपुराव्यामुळे अमरावतीकरांचे भाग्य उजाळले आहे. मुंबई-अमरावती अशी थेट रेल्वे गाडी सुरू झाली. या रेल्वे मार्गाकरिता भूसंपादनाचा अडसर होता. राष्ट्रपती भवनातून सूचना आल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली व लगेचच भूसंपादन पार पडले. आता विमानतळाचे अमरावतीकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रपती भवनाकडून येणाऱ्या सूचनांमुळे अमरावती शहरातील कामे मार्गी लागत आहेत. त्याच वेळी राष्ट्रपती पुत्रांचे लक्ष अमरावती विधानसभा मतदारसंघाकडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा त्याला विरोध आहे.