Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘पवई योजना दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माणाची नव्हतीच’
मुंबई, ४ फेब्रुवारी/ व्यापार प्रतिनिधी

 

पवई क्षेत्र विकास योजना या २१ वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या योजनेविषयी आता भलतेसलते आरोप करणे हा माझ्या व कंपनीच्या प्रतिष्ठेला हितसंबंधी मंडळींकडून बट्टा लावण्याचा प्रकार असल्याचा दावा आज नामांकित बिल्डर निरंजन हिरानंदानी यांनी केला. ही योजना दुर्बल घटकांसाठी किंवा अल्प उत्पन्न गटासाठी गृहनिर्माणाची नाही, असे खुद्द एमएमआरडीनेच २००४ साली न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निर्वाळा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवई योजनेसंदर्भात अनेक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिरानंदानी यांच्यावर २००० कोटी रुपयांच्या दंड आकारला जाईल, अशा आशयाचे एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंबंधी निरंजन हिरानंदानी आज एका पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला. पत्रकारांना सामोरे जाण्यापूर्वी हिरानंदानी यांनी आपली बाजू स्पष्ट करणारे सविस्तर लेखी निवेदन एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनाही सादर केले.
‘‘विविध सरकारी विभाग, पालिका प्रशासन तसेच एमएमआरडीएने वेळोवेळी केलेल्या तपासण्या आणि आवश्यक परवानग्या घेऊनच आपण पवईत आजवर इमारती बांधल्या. नियमांचा कुठे भंग झाल्याचा अहवाल आजवर कोणीही दिलेला नाही. उलट सर्वच बाजूने झालेल्या कामाबद्दल स्तुती व सन्मानच माझ्या पदरी आला आणि आता एकदम दंडाची इतकी मोठी रक्कम पाहून आपल्याला धक्काच बसला,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पवईचा विकास हा जरी त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून झाला असला तरी त्यात ४० चौरस मीटर (४३० चौरस फूट) आणि ८० चौरस मीटर (८६० चौरस फूट) अशी घरांच्या क्षेत्रफळाबाबत कोणतीही मर्यादा अथवा बंधन नव्हते आणि १९९१ सालच्या विकास नियंत्रण नियमावलीनंतर हा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय येथील घरांचे एकत्रीकरण करून मोठय़ा क्षेत्रफळाच्या घरातील रुपांतरणही १९ वर्षांपूर्वीच्या म्हणजे १८ ऑगस्ट १९८९च्या एमएमआरडीएच्या लेखी आदेशानेच केले गेले आहे. शिवाय ही योजना १९८६ साली जेव्हा कार्यान्वित झाली तेव्हा ‘टीडीआर’ ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. १९९१ नंतर टीडीआर अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या पवईतील वापराबाबत कोणताही र्निबध असण्याचे काही कारणच नाही, असेही हिरानंदानी यांनी स्पष्ट केले.