Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

२७ लाखांची घरफोडी उघड!
२६ लाख ६१ हजारांचा ऐवज हस्तगत
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मुलाची चौकशी करण्याच्या बहाण्याने मालाड पश्चिम येथे एका फ्लॅटमध्ये शिरून तीन अनोळखी इसमांनी केलेली २७ लाख रुपयांची घरफोडी मालाड पोलिसांनी उघड केली असून या प्रकरणी खासगी चालकासह चौघांना अटक केली आहे. या घरफोडीतील सुमारे २६ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यातही पोलिसांना यश मिळाले आहे.
मालाड पश्चिम येथील गोरेगाव-मुलुंड िलक रोडवरील अक्मे कॉम्प्लेक्समधीस २/सी इमारतीत राहणाऱ्या बिजला कुटुंबीयांकडे त्यांचा मुलगा संजय याची चौकशी करीत ३१ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास तीन अनोळखी इसम शिरले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी रामचंद्र बिजला, त्यांची पत्नी ज्योती, मोलकरीण नीलम चाळके व नोकर जोस जॉर्ज यांना बेडरूममध्ये कोंडून या त्रिकुटाचे घरातील रोख रक्कम, सोने-हिऱ्यांचे दागिने, मोबाईल फोन व घडय़ाळे असा नऊ लाख ९ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटल्याची तक्रार सुरूवातीला दाखल करण्यात आली. मात्र त्यावेळी घरी नसलेला त्यांचा मुलगा संजय याने १७ लाखांची रोकड त्यावेळी घरात असल्याबाबत पुरवणी तक्रार दिली. त्यामुळे चोरीचा एकूण ऐवज २७ लाख ४८ हजार रुपये असा नोंदला गेला. या प्रकरणी उपायुक्त मकरंद रानडे व वरिष्ठ निरीक्षक एम. डी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक फटांगरे यांनी सहाय्यक निरीक्षक चिमाजी आढाव यांच्यासह तपास करून तीन दिवसांत हा गुन्हा उघड केला.
घरात १७ लाखांची रोकड असल्याची माहिती बिजला यांचा चालक जसपालसिंग ऊर्फ जस्सी याला माहिती होती. हाच दुवा पकडून पोलिसांनी सुरूवातीला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि काही क्षणातच त्याने या कटाची माहिती दिली. त्यावरून जस्सीसह त्याचे मित्र सोमपाल जोगीराम वाल्मिकी (३०), जोगींदर राजपाल बडलान (२५) व अमरेश कामेश झा (२६) या तिघांना पोलिसांनी अटक केली. चोरलेल्या रोख रकमेपैकी १६ लाख १२ हजार ५०० रुपये तसेच सोने-हिऱ्यांचे दागिने, मोबाईल फोन, घडय़ाळे असा सारा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. इतक्या मोठय़ा प्रमाणात चोरीचा ऐवज हस्तगत होण्याची ही विरळा घटना असल्याचे उपायुक्त रानडे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले.