Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

लोकल रद्द होण्याचे केवळ निमित्त!
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अचानक उद्रेक होणाऱ्या एखाद्या सुप्त ज्वालामुखीप्रमाणे आज सकाळी बोरिवली स्थानकात संतप्त प्रवाशांच्या भावना उफाळून आल्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून पश्चिम रेल्वेकडून केवळ बोरिवली-विरार पट्टयाचाच विचार होत आहे. बोरिवलीकरांच्या समस्यांकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे आजचे आंदोलन होण्यासाठी लोकल रद्द होणे हे प्रवाशांच्या आंदोलनासाठी केवळ निमित्त ठरले. पश्चिम रेल्वेचा ढिसाळ कारभार पाहता कधी ना कधी हे होणारच होते, अशी भावना बहुतांश बोरिवलीच्या प्रवाशांकडून व्यक्त होत होती.

आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

वोरिवली स्टेशनवर सकाळपासून शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला एक वाजण्याच्या सुमारास हिंसक वळण लाभले. संतप्त आंदोलकांवर दगडफेक करून, रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस सुरू केली. काही मीडियावाल्यांच्या कॅमेऱ्यांचेही त्यांच्याकडून नुकसान करण्यात आले. अखेर दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास रुळांवरील आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मात्र निश्चितपणे किती लोक जखमी झाले, याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. एक्स्प्रेस वृत्तसमुहाचे छायाचित्रकार आशिष शंकर हेसुद्धा पोलिसांच्या लाठीमारात जखमी झाले.

अर्भकाचे अपहरण : डॉक्टर, नर्सचे निलंबन स्थगित
मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मोहिनी आणि मोहन नेरूरकर या दाम्पत्याचे नवजात अर्भक पळविले गेल्या प्रकरणी पालिकेच्या शीव येथील लो. टिळक इस्पितळातील संबंधित वॉर्डचे प्रमुख डॉक्टर व प्रमुख नर्स यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचा गेल्या आठवडय़ात दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज तहकूब केला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पालिका प्रशासनाने डॉ. स्वप्निल कोरे व परिचारिका शोभा परब यांना सोमवारी निलंबित केले होते. मात्र आता चौकशी सुरू राहणार असली तरी हे दोघे पुन्हा कामावर रुजू होऊ शकतील.

सुनील गावस्कर यांना डॉक्टरेट प्रदान
नवी मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सक्षम भारत घडविण्याची ताकद शिक्षणात असून, जगात ताकदवान राष्ट्र म्हणून स्वत:ची छाप पाडण्यासाठी देशातील विद्यापीठांनी ठामपणे वाटचाल करण्याची आवश्यकता महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आज नेरुळ येथे व्यक्त केली.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आज सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर तसेच मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ तर ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर. सी. सिन्हा यांना ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ या पदव्यांनी आज सन्मानित करण्यात आले.

बापट आयोगाचे काय झाले?
मुख्यमंत्र्यांकडून गोलमाल खुलासा
मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी
‘सामना’ चित्रपटात मारुती कांबळे याचे काय झाले, हा प्रश्न चित्रपटातील एक पात्र मास्तर आणि दर्शकांना छळत असतो त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करू नका, अशी स्पष्ट शिफारस केलेल्या बापट आयोगाचे काय झाले असा सवाल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केला असता ‘बापट आयोगाच्या शिफारशी आम्ही स्वीकारलेल्या नाहीत किंवा फेटाळलेल्या नाहीत’, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आसमंतात ‘बापट आयोगाचे काय झाले’ हा प्रश्न घुमवत ठेवला.

२७ लाखांची घरफोडी उघड!
२६ लाख ६१ हजारांचा ऐवज हस्तगत
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
मुलाची चौकशी करण्याच्या बहाण्याने मालाड पश्चिम येथे एका फ्लॅटमध्ये शिरून तीन अनोळखी इसमांनी केलेली २७ लाख रुपयांची घरफोडी मालाड पोलिसांनी उघड केली असून या प्रकरणी खासगी चालकासह चौघांना अटक केली आहे. या घरफोडीतील सुमारे २६ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यातही पोलिसांना यश मिळाले आहे.

विनोद कांबळी राजकारणात
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोक भारती या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारुन क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी राजकारणात प्रवेश केला. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईकर आणि देशातील बांधवानी व्यक्त केलेल्या भावना, आक्रोश पाहून आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून यापुढे शिक्षण आणि खेळांच्या प्रसारासाठी वेळ देणार असल्याचे कांबळी यांनी स्पष्ट केले. आपण निवडणूक लढविणार नाही, असेही त्यांनी सांगितले. विनोद कांबळी यांनी लोक क्रीडा अकादमी स्थापन करण्याचीही घोषणा केली. या अकादमीचे अध्यक्ष स्वत: विनोद कांबळी आहेत तर उपाध्यक्षपही द्वारकानाथ संझगिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अकादमीच्यावतीने ग्रामीण भागातील आणि शहरातील विविध क्रीडा प्रकारांत रस असणाऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल ,असे त्यांनी जाहीर केले. मी क्रिकेटमधून निवृत्त झालो नाही, मात्र आता राजकारण आणि समाजकारणासाठी वेळ दिला पाहिजे, असे आपले मत बनले आहे. मोठय़ा पक्षांनी आपल्याला निमंत्रण दिले होते, मात्र मला स्थानिक पातळीपासून काम करायचे आहे, म्हणून लोकभारतीची निवड केली, असेही कांबळी म्हणाले. मी फार शिकलो नाही, मात्र ही वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून मी शिक्षण प्रसाराचे काम करणार आहे. लोकभारती पक्ष हा शिक्षणांवर भर देणारा पक्ष आहे, म्हणून या पक्षाची निवड केली, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी कांबळी यांना सदस्यत्व देऊन त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

बोरिवलीत सोमवारी उपनगरी रेल्वे परिषद
मुंबई, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

बोरिवली, दहिसरकरांच्या उद्रेकाला कारणीभूत असलेले उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक, सकाळच्या गर्दीच्या वेळेत अत्यंत गैरसोयीच्या अशा सात आणि आठ क्रमांकांच्या फलाटावरून चर्चगेट गाडय़ा सोडण्याचा निर्णय याविरोधात शिवसेना विभाग क्रमांक एकतर्फे येत्या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता बोरिवली पूर्वेला रेल्वे प्रवासी परिषद होत आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देणार आहे. या परिषदेसाठी अनंत गीते, मोहन रावले, आनंद अडसूळ, आनंद परांजपे, रामदास कदम, राम नाईक, गोपाळ शेट्टी, गजानन कीर्तिकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे संयोजन विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले आहे. आंदोलनात प्रवाशांनी सहभागी व्हावे तसेच ७ व ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत बोरिवली व दहिसर स्थानकानजीक आपल्या तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘गोराईतील विपश्यना केंद्राला सर्व खात्यांची मंजुरी’
मुंबई, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बोरिवली (प.) गोराई येथील पॅगोडाच्या वास्तूमधील विपश्यना केंद्राला केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण ग्लोबल विपश्यना फाऊंडेशनचे विश्वस्त वल्लभ भन्साळी यांनी दिले.‘राष्ट्रपती करणार बेकायदा पॅगोडाचे उद्घाटन’ या लोकसत्ताच्या आजच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबद्दल भन्साळी यांनी सांगितले की, ग्लोबल विपश्यना फाऊंडेशन शांतता आणि सलोख्याचे प्रतिक असलेल्या पॅगोडाची गेली ११ वर्षे उभारणी करीत आहे. याकरिता वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांकडून आवश्यक ती मंजुरी मिळवलेली आहे. विकास, चटईक्षेत्र निर्देशांक, सीआरझेड, पर्यावरण रक्षण, सीसी, ओडी आदी मंजुरी मिळाली आहे. केंद्र व राज्य सरकार, मुंबई महापालिका, सागरी प्राधिकरण, पर्यटन विकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगरविकास विभाग यांनी आराखडे तपासून सर्व परवानगी दिली आहे.

भांडुप येथे आजपासून जाहीर प्रबोधनमाला
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

फुले-शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे येत्या ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत जाहीर प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली आहे. डॉ. भदंत राष्ट्रपाल नगरी, जय यशवंत को. ऑ. हौ. सोसायटी मैदान, भांडुप (पूर्व) येथे उद्या सायंकाळी सात वाजता भिख्खुणी चारुशिला यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.पहिल्या दिवशी ए.सी./ एस.टी. अत्याचार प्रतिबंधक आयोगाचे सदस्य डॉ. प्रशांत पगारे यांचे ‘अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट-जनजागरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया कॉन्फडरेशन ऑफ एस. सी./ एस. टी. ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा डॉ. इंदिरा आठवले यांचे ‘खासगी क्षेत्रात आरक्षणाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.प्रबोधनमालेची सांगता ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक अरिवद व्य. गोखले यांच्या भाषणाने होणार असून ‘दहशतवाद’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सर्व व्याख्याने सायंकाळी सात वाजता होणार असून दररोज व्याख्यानापूर्वी काही मान्यवर कवींचे काव्यवाचन होणार आहे. फुले-शाहू आंबेडकरी विचार मंचचे प्रवक्ते शेखर गवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

शीला तिवारी यांची बदली
मुंबई, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विविध शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षकांच्या बेकायदा नेमणुकांप्रकरणी शिक्षण उपसंचालिका शीला तिवारी यांची अखेर शालेय शिक्षण विभागाने बदली केली आहे. रिक्त झालेल्या या पदावर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही. या पदासाठी बसंती रॉय यांचे नाव चर्चेत होते. परंतु, ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे समजते.
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या १३ जागांवर खुल्या वर्गातील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय अध्यश्र डॉ. श्रीधर साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीत तिवारी यांच्यासह सहाय्यक संचालक वामन म्हात्रे व एस. के. राठोड हे दोषी आढळले होते. राठोड व म्हात्रे यांच्यावर कारवाई होऊन त्यांची यापूर्वीच बदली करण्यात आलेली आहे. मात्र, तिवारी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नव्हती. परंतु, त्यांच्याविरोधात आंदोलने झाल्यामुळे अखेर शालेय शिक्षण विभागाने त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने तिवारी यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली आहे.