Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

नवनीत

जे य कंते पिए भोए लद्धे व पिट्ठी कुव्वई।
साहिणे चयइ भोए से हु, चाइ त्ति वुच्चई।।

जो माणूस सुंदर आणि आकर्षक उपभोगाकडे पाठ फिरवितो किंवा स्वाधीन उपभोगांचा त्याग करतो तोच खरा त्यागी आहे.
जरा जाव न पीडेइ वाही जाव न वड्ढइ।
जाविंदिया न हायंति, ताव धम्मं समायरे।।

 


जोपर्यंत वार्धक्य छळत नाही, रोग वाढत नाहीत, इंद्रिये कमजोर होत नाहीत, तोपर्यंत धर्माचरण करावे.
। भोगी भमइ संसोर अभोगी विषमुच्चई।।
भोगात लोळणारा माणूस संसारचक्रात भ्रमण करीत राहतो व अभोगी माणूस जन्म-मरणाच्या दुष्टचक्रातून सुटतो, मुक्त होतो.
भगवान महावीर आपल्या प्रवचनात त्यागाचे संचय न करण्याचे, सुखोपभोगात लोळत न राहण्याचे, संयमाचे वेगवेगळी उदाहरणे देऊन महत्त्व सांगत होते. ‘शक्ती आहे तोपर्यंत धर्माचरण करा- ‘स्व’ला ओळखा’ म्हणत होते. श्रेणिक राजाबरोबर त्याचा पुत्र मेघकुमारही प्रवचन ऐकायला आला होता. सुग्रास जेवण, नृत्यांगनांचे नृत्य, संगीत विविध विलास यात सदैव रमणारा अशी त्याची ख्याती होती. त्याने महावीरांची मधुर वाणी ऐकली. एक राजपुत्र भर तारुण्यात राजसुख सोडत राजमहाल सोडून वनात जातो. नग्न दीक्षा घेऊन तप करतो आणि स्वकल्याण करता करता जनकल्याण करतो. करपात्री आहार घेतो. अनेक दिवस उपवास करतो. सारेच आश्चर्यजनक! मेघकुमार साऱ्या सुखोपभोगांपासून-विलासाहून मुक्त झाला. त्याला वैराग्य आले. प्रत्येक माणसात परमात्मा होण्याची बीजे असतात. पतीत पावन होऊ शकतो. वासनेचे दास्य सर्वात मोठे दास्य आहे. इंद्रिय सुखे क्षणभंगुर असतात. मेघकुमारच्या कानात महावीरांचे शब्द गुंजन करू लागले. त्याने सम्राट श्रेणिकाला म्हटले, ‘‘मला दिगंबर दीक्षा घेण्याची परवानगी द्या. मला या जीवनाचा उबग आलाय. श्रेणिक दु:खी झाले. चकित झाले. म्हणाले, ‘‘हे असिधारा व्रत सोपे नाही. तू विचार कर. तू आमच्या दोघांचा लाडका पुत्र आहेस. तुझ्याशिवाय आम्ही कसं जगायचं?’’ मेघकुमार आपल्या निश्चयापासून ढळला नाही, कुटुंबातील सर्वाची अनुमती मिळवून खऱ्या सुखाच्या शोधासाठी त्याने दीक्षा घेतली.
लीला शहा

गुरूवरचा लाल डाग काय दर्शवितो? असे वैशिष्टय़पूर्ण डाग आणखी कोणत्या ग्रहावर आढळतात?
थोडय़ाशा शक्तिशाली दुर्बिणीतून पाहिले असता गुरूवर काही वेळा लाल रंगाचा डाग दिसून येतो. चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओने हा डाग प्रथम पाहिल्यानंतर असंख्य खगोल निरीक्षक हा डाग पाहात आले आहेत. गुरूच्या परिवलनामुळे हा डाग गुरूच्या पृष्ठभागावर सरकताना आढळतो. व्हॉयेजर यानांनी जवळून घेतलेल्या छायाचित्रांमुळे तसेच हबल दुर्बिणीतून घेतलेल्या छायाचित्रांवरून आणि डागाच्या वर्णपटावरून हा डाग म्हणजे गुरूच्या पृष्ठभागावरील एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे दिसून आले आहे. या चक्रीवादळाचा व्याप इतका प्रचंड आहे, की त्यात तीन पृथ्वीसदृश ग्रह सामावले जाऊ शकतील. मात्र हे चक्रीवादळ पृथ्वीवरील चक्रीवादळापेक्षा वेगळे आहे. पृथ्वीवर चक्रीवादळ होताना केंद्रभागी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो आणि आजूबाजूच्या प्रदेशातून जास्त दाबाची हवा केंद्रभागी घुसते. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांना चक्राकार गती प्राप्त होते. पृथ्वीवरील चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेत (अपसव्य), तर दक्षिण गोलार्धात सव्य दिशेत फिरतात. गुरूवर मात्र हा डाग दक्षिण गोलार्धात असूनही अपसव्य दिशेत फिरताना आढळतो. त्याचे कारण तिथे केंद्रस्थानी वायूंचा दाब जास्त आहे. अंतर्भागातून द्रव्य बाहेर पडताना काही छायाचित्रांमध्ये आढळून आले आहे. गुरूच्या अंतर्भागातील उष्णतेद्वारे मोठय़ा प्रमाणात ऊर्जा उपलब्ध झाल्यामुळे हे चक्रीवादळ इतकी शतके फिरत राहू शकले आहे. फॉस्फरसमुळे या डागाला लाल रंग प्राप्त झाल्याचे मानले जाते. व्हॉयेजर-२ यानाला अशाच प्रकारचा पण काळसर प्रचंड डाग नेपच्यूनवर आढळून आला. त्याशिवाय एक छोटासा वेडावाकडा, नेपच्यूनभोवती सोळा तासांत प्रदक्षिणा घालणारा, ढगसुद्धा सापडला. त्याच्या वैशिष्टय़पूर्ण गतीमुळे त्याला ‘स्कूटर’ हे नाव देण्यात आले. तसेच डी-२ नावाचा एक काळसर डाग (ढगाच्या स्वरूपात) नेपच्यूनवर आढळून आला, मात्र तो वर उल्लेखलेल्या ‘द ग्रेट डार्क स्पॉट’च्या तुलनेत फार लहान आहे.
महेश शेट्टी
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

इगार्देन रोमान व्हीतॉल्द या तत्त्ववेत्त्याचा जन्म ५ फेब्रुवारी १८९३ रोजी पोलंडमधील क्राकुफ या गावी झाला. शालेय शिक्षणानंतर हुसर्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्त्वज्ञानाचे धडे त्यांनी गिरविले. गुरूसोबत त्यांनी फ्रायबर्ग येथे प्रयाण केले. इथेच त्यांनी आपला प्रबंध प्रसिद्ध करून ‘हॅबिलिटेशन शिफ्ट’चे काम पूर्ण केले. पोलंडमधील जॅगीलोनियन विद्यापीठात समाजवाद्यांशी मतभेद झाल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. ‘द लिटररी वर्क ऑफ आर्ट’ हे त्यांचे पहिले पुस्तक. ‘कॉन्ट्रॉव्हर्सी ओव्हर द एक्झिस्टन्स ऑफ द वर्ल्ड’ हे त्यांचे १९४७ सालचे पुस्तक त्यांचे गुरू एम्युंटे हुसर्ल यांचा अतिशायी चिद्वादाकडील कल त्यांना मान्य नव्हता. त्यांच्या मते गुरूचा अतिशायी चिद्वाद हा इतर चिद्वादांच्या प्रकारांसारखा असून, त्यामुळे वास्तवता ही कोणत्याही प्रकारच्या मत किंवा चेतनेवर अवलंबून नसते. ‘द लिटररी वर्क ऑफ आर्ट’ या पुस्तकातून त्यांनी सत्स्वरूप मीमांसेविषयी विश्लेषण करताना असे म्हटले, की, ‘साहित्यिक कलाकृती अस्तित्वात असण्यासाठी निर्हेतुक साहित्य भाव असायला हवा.’ १४ जून १९७० रोजी मेंदूमधील रक्तस्रावाने त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

एका श्रीमंत उद्योगपतीने दहा हजार सोन्याची नाणी विठ्ठल मंदिरात जाऊन अर्पण करायचे ठरवले. थैली घेऊन तो मंदिरात गेला. त्या वेळी मंदिरात फार भक्त नव्हते. होते ते हाताच्या बोटांवर मोजण्याजोगेच! थैलीमधून नाणी काढताना तो खणखणाट करायचा. तो खणखणाट ऐकण्यासाठी मंदिरात गर्दी जमायला सुरुवात झाली. त्याबरोबर तो उद्योगपती आणखीनच जास्त जोरात नाणी थाळीत टाकू लागला. नाण्यांचा आवाज वाढत चालला. लोकांची गर्दी वाढायला लागली, त्याबरोबर उद्योगपतीचा चेहराही आनंदाने फुलत चालला. सारी नाणी मोजून संपली. उद्योगपती मोठय़ा अभिमानाने गर्दीकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आपल्या संपत्तीचा गर्व होता. जे इतरांकडे नाही ते धन केवळ माझ्याकडे आहे आणि ते देवाला अर्पण करण्याची दानत माझ्यात आहे. या गोष्टीचा अहंकार त्याच्या डोळय़ांत चमकत होता. मोठय़ा ऐटीत त्याने साऱ्या गर्दीवरून नजर फिरवली आणि मग त्याची नजर पुजाऱ्यावर स्थिरावली. ती नजर जणू पुजाऱ्याला सांगत होती, ‘बघ, माझ्यासारखा मोठा दानशूर या मंदिरात यापूर्वी कधी आला होता का? एवढी भली थोरली रक्कम तुझ्या मंदिराला कुणी दान दिली होती का? पाहा, मी किती श्रेष्ठ माणूस आहे!’ पुजारी उद्योगपतीला म्हणाला, ‘‘बाबा रे, ही सगळी संपत्ती तू परत घेऊन जा. विठ्ठल या भेटीचा स्वीकार करणार नाही. विठ्ठलमाऊलीला हे धन घेणं आवडणार नाही.’’ आपल्याच गुर्मीत असलेल्या धनिकाला पुजाऱ्याचे बोलणं फार अपमानास्पद वाटलं. लोकांना मात्र पुजाऱ्याच्या आवाजाचा नाद घंटानादासारखा मनात विचारांची वर्तुळे उठवणारा, पवित्र भाव जागवणारा वाटला. धनिकाने संतापून विचारले, ‘‘भेट का स्वीकारणार नाही. या धनात काय खोटी आहे म्हणून विठ्ठलाला ते आवडणार नाही?’’ पुजारी म्हणाला,‘‘ प्रेमाचे असे प्रदर्शन करता येत नाही. तुम्ही भक्तिभावाने हे दान देत असाल तर त्याची जाहिरात कशासाठी करता? पांडुरंग भक्तिभावाचा भुकेला आहे, प्रदर्शनाचा किंवा जाहिरातीचा नाही.’’
आपण जेव्हा एखादे चांगले काम करतो, दुसऱ्याला मदत करतो, इतरांना उपयोगी पडेल, अशी गोष्ट करतो तेव्हा ती निमूटपणे करावी. तिचा गाजावाजा करू नये. इतरांना आपण केलेले सत्कृत्य सांगून मोठेपणा मिळवायचा प्रयत्न करू नये.
आजचा संकल्प : मी आज दुसऱ्याच्या उपयोगी पडेन, पण त्याबद्दल कुणाला सांगणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com