Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

भारावलेले आयुक्त देणार सहा महिन्यांत २४ तास पाणी
नवी मुंबई/प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त म्हणून मागील दोन वर्षांंत या शहराशी जमलेले स्नेहबंध माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहेत, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतानाच येत्या सहा महिन्यांत शहरात २४ तास पाणीपुरवठय़ाचा प्रकल्प आपण प्रत्यक्षात आणू, असा शब्द महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी वाशी येथे शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्थांना दिला.

सेझ विरोधात संघर्ष छेडण्याचा इशारा
उरण/वार्ताहर : येथील महामुंबई सेझबाधित प्रत्येक गावांना विकासकामांसाठी सेझने देऊ केलेले दोन कोटी रुपये पंचायत समितीने ठराव करून नाकारले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जानेवारी रोजी याच संदर्भात घेतलेल्या बैठकीबाबत शिवसेनेचे सभापती विश्वास म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सेझसाठी कदापी जमीन देणार नसल्याचा ठाम निर्धार करून सेझची रिलायन्समार्फत सुरू असलेली वाढती मक्तेदारी संपुष्टात न आणल्यास १६ ऑगस्ट २००७ प्रमाणे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रिलायन्स सीआरएस निर्मूलन संघटनेची स्थापना
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स सीआरएस निर्मूलन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या सभेत रिलायन्समधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अनेक कामगार उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटनेला हाताशी धरून पद्धतशीरपणे ‘स्वेच्छानिवृत्ती योजना’ कारण नसताना कामगारांच्या गळी उतरवली, असा आरोप यावेळी करण्यात आला. स्वेच्छानिवृत्ती लादलेल्या सर्व ४५० कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

‘योग हे जीवनाचे मर्म’
पनवेल/प्रतिनिधी : योग हे जीवनाचे मर्म असून, अखिल मानव जातीसाठी ते दिशादर्शक आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केले. इन्स्टिटय़ूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती, पनवेलतर्फे चालविण्यात येणाऱ्या योगाभ्यास केंद्राच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. के.व्ही. कन्या विद्यालयात दोन दिवस चालेल्या या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. नसरत शेख व जयंत कवठेकर यांचीही व्याख्याने झाली. या कार्यक्रमांना शेकडो नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

खांदा कॉलनीत ३० कोटींचा उड्डाणपूल
पनवेल/प्रतिनिधी

पनवेल-दिवा रेल्वेमार्गावर खांदा कॉलनी येथे ५०० मीटर्स लांबीचा व ३० कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलाअभावी रेल्वे फाटकाजवळ पादचारी, विद्यार्थी, वाहनचालक, शालेय बसेस आदींना खूपच त्रास होत असे. तसेच तेथून रेल्वेगाडी जाण्यापूर्वी भयंकर वाहतूक कोंडी होत असे. या पाश्र्वभूमीवर रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात येत होती. सिडकोने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निविदाही काढल्या होत्या, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सिडकोने हे काम रोखले होते. त्यानंतर पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी लक्ष घालून सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर या पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे पनवेल, नवीन पनवेल व खांदा कॉलनीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून खांदा कॉलनीतील रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. रेल्वे फाटक बंद असताना रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही यामुळे मदत होणार आहे.

आगरी-कोळी-कराडी महोत्सवाची सांगता
उरण/वार्ताहर : मागील तीन दिवस सुरू असलेल्या आगरी-कोळी-कराडी महोत्सवाची आज सांगता झाली. तीनही समाजातील पारंपरिक रूढी, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविलेल्या या महोत्सवाचा आनंद अवघ्या उरणकरांनी लुटला.माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून उरणमध्ये आगरी-कोळी-कराडी महोत्सव भरविण्यात आला होता. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात पारंपरिक रूढी परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवित अनेक कार्यक्रम स्थानिक कलाकारांनी सादर केले. पारंपरिक वेशभूषेतील नृत्य-गायनाला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.तीनही समाजातील परंपरेला साजेसे खाद्यपदार्थांचे स्टॉलही महोत्सवात लावण्यात आले होते. खेकडा, कोळीम, जवळा, भाकरी व तत्सम चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या पदार्थांचा रसिक प्रेक्षकांनी या दरम्यान मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून तीनही समाजातील गुणवंत, यशवंत, समाजधुरिणांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकारांचाही समावेश होता.महोत्सवादरम्यान हजारो रसिकांनी हजेरी लावली. रसिकांना आकर्षित करण्यासाठी इतर करमणुकीची साधनेही उपलब्ध होती. महोत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक जे.डी. जोशी, सीमा घरत, चंद्रकांत घरत, मेघनाथ तांडेल, मनोहर म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

उरणच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
आयडियल प्ले अ‍ॅबॅकस राज्यस्तरीय स्पर्धा

उरण/वार्ताहर : तिसऱ्या आयडियल प्ले अ‍ॅबॅकसच्या राज्यस्तरीय स्पर्धेत उरणच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात चमकदार कामगिरी करून पहिल्या क्रमांकांची पारितोषिके पटकाविली आहेत.
आयडियल प्ले अ‍ॅबॅकसची तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये उरणच्या ६८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावित अमृता गुरव हिने चॅम्पियनपद पटकाविले, तर विविध गटांतून सहभागी झालेल्या उरणच्याच अनिकेत गंभीरे, संदेश पाटील, आर. एस. सुगन, श्रुती पाटील, ऋतुजा भद्रे या विद्यार्थ्यांनी पहिले पारितोषिक पटकाविले. ६८ पैकी इतर १० विद्यार्थ्यांनी दुसरे, नऊ विद्यार्थ्यांनी तिसरे अशी पारितोषिके पटकाविली. ११ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. चौथ्या व पाचव्या क्रमांकापर्यंत पोहचण्यात अनुक्रमे १४ व १७ विद्यार्थी यशस्वी ठरले.संगणक आणि गणक यंत्रापेक्षाही वेगाने पाच मिनिटात १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी उरणच्या आयडियल प्ले अ‍ॅबॅकसचे नाव उज्ज्वल केल्याने मार्गदर्शक रवी सोमवंशी व राजेश शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेच, त्याचबरोबर चैताली चावडा, भावना पाटील या प्रशिक्षकांची प्रशंसा केली.

धूतपापेश्वर घेणार धुराची काळजी
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक कारखाना असणाऱ्या श्री धूतपापेश्वरमधून निघणाऱ्या धुरामुळे व दरुगधीमुळे अशोका गार्डन परिसरातील नागरिक गेले काही महिने हैराण आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल शहर अध्यक्ष प्रथमेश सोमण यांनी आवाज उठवल्यानंतर येत्या ३१ मार्चपर्यंत कारखान्यामुळे होणाऱ्या धूर व दरुगधीपासून परिसरातील नागरिकांना मुक्त करू, असे आश्वासन या कारखान्याच्या व्यवस्थापिका सुवर्णा पुराणिक यांनी दिले. मनविसेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनसेच्या ‘राजगड’ या मुख्यालयात धूतपापेश्वरचे व्यवस्थापन व मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्यात बैठक झाली. यावेळी पुराणिक यांनी हे आश्वासन दिले. या बैठकीला गोवर्धन पोलसानी, पराग बालड, प्रथमेश सोमण आदी मनसे व मनविसेचे नेते, तसेच अशोका गार्डनमधील रहिवासी उपस्थित होते.