Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘आयपीटीव्ही’बाबत नाशिककरांमध्ये उत्सुकता
प्रतिनिधी / नाशिक

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि एमकेसीएल यांच्या वतीने शहरात शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (आयपीटीव्ही) सेवेव्दारे संगणकाच्या मॉनिटरबरोबरच दूरचित्रवाणी संचावरही १०५ चॅनल्स सोबत विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. मागणीनुसार चित्रपट, विविध प्रकारचे गेम्स, ऑनलाईन एज्युकेशन, कार्यक्रम पाहतानाच तो रेकॉर्ड करून ठेवण्याची सोय आदी सेवाही या अंतर्गत मिळणार आहेत.त्यासाठी बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे कनेक्शन आहे त्यांना ही सेवा लगेचच मिळू शकेल तर अन्य मंडळींना मात्र त्यासाठी प्रथम कनेक्शन घ्यावे लागेल. सुरूवातीला एक महिन्याची वर्गणी मोफत असल्याने ज्यांच्याकडे सध्या ब्रॉडबँड आहे त्यांच्यासाठी ही सुविधा अधिकच लाभदायी ठरणार असल्याने त्याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. आयपीटीव्हीची सुविधा बीएसएनएलतर्फे वास्तविक पाहता दिवाळीच्या सुमारासच सुरू होणार होती

एका वाढदिवसाची गोष्ट!
प्रतिनिधी / नाशिक

शहराच्या परिवर्तनाला सुरुवात करायची तर आण्णांच्या वाढदिवसाएवढा चांगला मुहूर्त कसा सापडणार? आण्णांप्रती कार्यकर्त्यांची निष्ठा एवढी थोर की, आपल्याच साहेबांनी पुढाकार घेऊन शहरभर होर्डिग न लावण्याचा जो नाशिक पॅटर्न रुजविला, त्याची तमा बाळगण्याची गरजही कार्यकर्त्यांना वाटली नाही.वाढदिवसाच्या चार दिवस अगोदरपासूनच शहरातील चौकाचौकांत, रस्त्यांच्या कडेला पुन्हा एकदा शुभेच्छा देणाऱ्या होर्डिगचे पीक आले आणि हे कमी म्हणून की काय, वाहतूक शिस्त वगैरे कशाचीच भीडभाड न ठेवता अतिउत्साही कार्यकर्त्यांनी डी. जे. च्या दणदणाटात ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यातून परिवर्तन रॅली काढून आज आण्णांचा वाढदिवस असल्याची दवंडी दिली.

‘संस्कार भारती’तर्फे कलामहोत्सव!
प्रतिनिधी / नाशिक

रांगोळी, चित्रकला, सुलेखन, नृत्य, नाटय़, संगीत अशा सर्वच कलांचा मेळा ७ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये ‘कला महोत्सव २००९’ अंतर्गत भरणार आहे. नाशिक महानगर ‘संस्कार भारती’तर्फे गंगापूररोडच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये हा महोत्सव होणार असून ज्येष्ठ-श्रेष्ठांचा सहभाग हे त्याचे वैशिष्टय़े राहणार आहे. ललित कलांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाचे संस्कार घडावे व कलाकारांचे संघटन उभे करणे या माध्यमातून संस्कार भारतीचे कार्य संपूर्ण देशात सुरू आहे.नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, समाजातील विविध कलावंतांचे एकत्रीकरण व्हावे व संस्कार भारतीच्या राष्ट्रीयत्वाच्या संस्कारात त्यांचा सहभाग व्हावा या उद्देशाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

तृप्तिदाता!
राष्ट्रपतींचे शाही भोजन असो की धार्मिक कार्यक्रमांतील लक्षभोजन.. नाशिककरांना अशा प्रसंगी पहिली आठवण येते ती उत्तमराव गाढवे यांची. आचाऱ्याचे रुपांतर ‘केटरर’मध्ये होतानाच्या काळात या व्यवसायाला आपल्या कल्पनाशक्तीची जोड देत नाशिकमध्ये त्याला ‘कॉर्पोरेट’ तोंडवळा प्राप्त करून देण्याचे श्रेय जसे उत्तमरावांकडे जाते तसेच ‘लॉन्स’ची संकल्पना रुजविण्याचे, त्या अनुषंगाने गोरज मुहूर्ताला पुन्हा चालना देण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. आजवर हजारो समारंभांद्वारे लाखो जणांना तृप्तीची अनुभूती देणाऱ्या उत्तमरावांचा देशविदेशांतील ना ना पाककृतींमध्ये हातखंडा तर आहेच, पण त्यासोबतच अठरा पगड जाती आणि देशभरातील भाषा, प्रांत, धर्म, पंथांच्या वेगवेगळ्या लग्नविधींचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे.

आरोग्य विद्यापीठातर्फे मुंबईत प्रमाणपत्र अभ्यासक्रम
नाशिक, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक विभाग, आंतरविद्या संशोधन शाखा आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात ते आठ फेब्रुवारी या कालावधीत ‘एथिक्स इन क्लिनिकल रिसर्च’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन मुंबई येथील हाफकिन इन्स्टिटय़ुटमध्ये करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव भूषण गगरानी यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या बाबतची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी दिली. व्यक्तींच्या मुलभूत हक्क व नैतिक मुल्यांची जपवणूक करणे आवश्यक असून या उद्दीष्टांसाठी नैतिक मूल्य समितीची स्थापना करणे हे बंधनकारक असते. या अनुषंगाने नैतिक मूल्य समितीची कार्यप्रणाली, उद्दीष्टय़े आणि मार्गदर्शक तत्वे याविषयक कक्षा रुंदाविणे महत्वाची बाब आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा समितीची परवानगी ही संशोधन प्रकल्प सुरू करण्यास आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्य समितीचे सदस्य, क्लिनिकल ट्रायलचे संशोधक, प्रायोजक, निरीक्षक, परीक्षक, रुग्ण प्रतिनिधी, पत्रकार, विद्यार्थी आणि या क्षेत्रातील जाणकार व्यक्ती सहभागी होऊ शकतील. हा अभ्यासक्रम दरवर्षी राबविण्याचा विद्यापीठाचा मानस असून त्यादृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊस असल्याचे फडके यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात सहभागी होण्याकरिता ९९६०९-४०१००, ९२२६३-३७८५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

नंदुरबारमध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर
नंदुरबार / वार्ताहर

कोळदा येथे कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्य़ातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी केंद्र पुरस्कृत अ‍ॅस्कड योजनेतील प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पशुसंवर्धन उपसंचालक डॉ. अ. प्र. चंद्रात्रे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. गजानन डांगे, उपायुक्त डॉ. के. आर. सिंगल आदी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अद्ययावत तांत्रिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रबोधन करावे असे आवाहन केले. पशुसंवर्धन विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासह जिल्ह्य़ाचा कृषी विकास दर वाढवावा, प्रशिक्षण हे आत्मविश्वासासाठी आवश्यक आहे. कारण त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे नियोजन करणे सोपे जाते. असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. एन. एस. हिरे यांनी केले. प्रशिक्षणासाठी डॉ. वाय. बी. साळुंखे, एल. एम. राजपूत, एम. के. जाधव, व्ही. व्ही. गावित, जी. जी. सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे आर. एम. पाटील, पी. सी. कुंदे, जे. एन. अत्तरवार, आर. एस. दहातोंडे, आर. आर. भावसार यांनी परीश्रम घेतले. जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. तुंबारे यांनी आभार मानले.

चांदवडला आज खंडेराव महाराज यात्रा
चांदवड / वार्ताहर

येथील पुरातन खंडेराव महाराज मंदिराचा नुकताच जिर्णोद्धार करण्यात आला असून पाच ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत येथे खंडेराव महाराज यात्रा भरणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. ताईबाई मुरळी, निवृत्ती जेऊघाले, विट्टल ठाकरे या वाद्य मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. आठवडे बाजारातील हनुमान मंदिरापासून कावडी व रथाची मिरवणूक निघणार असून सायंकाळी सहाला बारा गाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम शंकर भागुजी कोतवाल यांच्या हस्ते होणार आहे. ग्रामपालिका चांदवड व सचिन अग्रवाल यांच्या वतीने प्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री नऊला निवृत्ती जेऊघाले यांचा लंगरी जागरणाचा कार्यक्रम होईल. भंडाराचा कार्यक्रम होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन खंडेराव महाराज यात्रा समिती, खंडेराव महाराज यात्रा पंचकमेटी व समत ग्रामस्थ चांदवड यांनी केले आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्याच मोटारसायकलची चोरी
रावेर / वार्ताहर

गुन्हेगारांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या पोलिसांना आता त्याचा प्रसाद मिळण्यास सुरूवात झाली असून ठाण्याच्या आवारातूनच सहाय्यक निरीक्षकांची मोटारसायकल चोरण्यापर्यंत चोरटय़ांची मजल गेली आहे.
गेल्या महिन्यापासून भुरटय़ा चोऱ्यांसह मोठय़ा गुन्ह्य़ात वाढ झाली आहे. शेती शिवारातील केबल वायर, ठिबक सिंचनच्या नळ्या, शेती उपयोगी साहित्य चोरीस जात आहेत. या चोरीचा फटका येथील पोलीस ठाण्याचे सहायय्क निरीक्षक विक्रम पाटील यांनाही बसला. त्यांच्या मालकीची मोटारसायकल ठाण्याच्या आवारात उभी करून ते कामात गुंतले असता थोडय़ा वेळातच त्यांचे वाहन जागेवरून बेपत्ता झाल्याचे आढळून आले. सर्वत्र शोध घेण्यात आला. गाडी कुठेही न दिसल्याने शेवटी पाटील यांना आपली मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसात देणे भाग पडले.

‘इम्पॅक्ट २००९’ स्पर्धेत वाडीया महाविद्यालय विजेते
जळगाव / वार्ताहर

येथील मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित डॉ. जी. डी. बेंडाळे राज्यस्तरीय सॉफ्टवेअर इम्पॅक्ट २००९ स्पर्धेचा फिरता चषक पुण्याच्या नौरोसजी वाडीया महाविद्यालयाने पटकावला. पदवीपूर्व गटात मूळजी जेठा महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक मिळवले. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा डॉ. एस. बी. चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शिक्षणातील सातत्य व माहिती तंत्रज्ञान यांची सांगड हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे चिंचोलकर यांनी सांगितले. नॅकसाठी असे प्रदर्शन व स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. या स्पर्धामध्ये पाच विद्यापीठातील १८ महाविद्यालयांमधील ९१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पदवीपूर्व गटात जेठा महाविद्यालयाच्या गणेश इंगळे, मिलिंद फिरके व मच्छिंद्रनाथ महाजन यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. पुढील वर्षी १५ ते १७ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल राव यांनी दिली.

भारत ज्ञान विज्ञान समुदायतर्फे चर्चासत्र
नाशिक / प्रतिनिधी

भारत ज्ञान विज्ञान समुदायातर्फे शिक्षणाचा अधिकार व गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आठ व नऊ फेब्रुवारी रोजी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या जिमखाना हॉलमध्ये चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन येत्या रविवारी सकाळी साडेदहाला होईल, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. समिती गेल्या २५ वर्षांंपासून साक्षरता, शिक्षण, दलित, महिला सबलीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन, विज्ञान प्रसार, अंधश्रध्दा निर्मूलन या विषयांविषयी समाजात कार्यरत आहे. सामाजिक उत्क्रांतीच्या हेतूने शिक्षण हे माणसाला प्रगतीपथावर नेणारे प्रभावी माध्यम असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, याचे कारण चांगल्या व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव हे होय. शिक्षणाच्या सर्व मुद्यांवर चर्चा व्हावी, या हेतूने एक कृती कार्यक्रम तयार व्हावा या दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या भारत ज्ञान विज्ञान समुदायाने या कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. विनोद रैना, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. सिंमतीनी धुरू, डॉ. अरूण ठाकूर, विवेक मॉटेरो सहभागी होतील. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पैलु, शिक्षण प्रश्न, कृतीशील शिक्षण, शिक्षण हक्क विधेयक, शिक्षण विषयक माहितीपट, कर्नाटकातील अनुभव-चर्चासत्र, आनंददायी शिक्षण या विषयांवर चर्चासत्र घेण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थेतून किमान दोन शिक्षक कार्यशाळेत पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले असून कार्यशाळेसंदर्भातील अधिक माहितीसाठी ९६०४४७४९४४ किंवा ९४२३०७०७२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक फ्लोराच्या पुष्परचनेला पारितोषिक
नाशिक / प्रतिनिधी

येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपवने व उद्याने यांच्यामार्फत आयोजित वार्षिक पुष्पप्रदर्शनात ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. नाशिक फ्लोरा प्रा. लि. च्या पिवळ्या गुलाबाला राणी म्हणून बहुमान मिळाला तर पांढऱ्या गुलाबाला प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला. कलात्मक पुष्परचना व शुष्ककाष्ट पुष्परचनेमध्ये नाशिक फ्लोराला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. फ्लोराचे संचालक अतुल साबु मागील दहा वर्षांपासून आधुनिक पद्धतीची फुलशेती करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे सुमारे आठ एकर हरितगृहात ही फुलशेती केली जाते. विविध प्रकारच्या २० फुलांच्या प्रकाराचे उत्पादन घेतले जाते. ही फुले जपान, हॉलंड व कॅनडा या देशांमध्ये निर्यात केली जातात. नुकताच त्यांनी फ्लोरेजेंल हा नवीन ब्रँड विकसित केला आहे. या ब्रँड अंतर्गत नाशिक फ्लोरातर्फे फार्मफेश फ्लावर्स (शेतातील ताजी फुले) तसेच या फुलांपासून बनविलेल्या मनमोहक पुष्परचना ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात.

लोणखेडा महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा
शहादा / प्रतिनिधी

शहादा येथील लोणखेडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या उपस्थितीत झाला. प्रत्येकाने आपल्याला सोपविलेले काम प्रामाणिकपणे केले तर संस्थेची प्रगती शक्य आहे. त्यामुळे गुणवत्तेत भर पडते. कधी कधी विद्यार्थी तक्रारही करतात. या तक्रारीचे स्वागत करून त्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे असे आवाहन पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील, हैदर नुरानी, लोणखेडा सरपंच बायजाबाई भिल उपस्थित होते. प्राचार्य मेजर डॉ. अशोक पाटील, प्रा. डॉ. विश्वास पाटील, प्रा. जीवन जगदाळे यावेळी उपस्थित होते.