Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

विशेष

सद्भावनांचा विजय!
ओबामा अखेर अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. व्हाईट हाऊसच्या प्रांगणात आनंदाचा जल्लोष झाला ते चित्र मी डोळे भरून पाहत होतो. कुठल्याही उत्कट क्षणी हल्ली डोळे भरून येतात. हे केवळ चष्म्याचा नंबर (डोळ्यातील भिंगाचा नंबर) बदलल्यामुळे होत असावे, हा चाळिशीत वाटलेला संशय पन्नाशीत खोटा ठरला. डोळ्यातील पाण्याबरोबर छातीत भाव दाटून येतात, श्वास जड होतो, मुक्त रडावेसे वाटते. दुसऱ्याचे दु:ख व आनंद आपणच अनुभवत असल्यासारखे वाटते. परदेशी शिक्षणाला गेलेले मूल पहिल्या सुट्टीत घरी येते तेव्हा घट्ट मिठी मारून त्याच्या खांद्यावर अश्रू ढाळताना आपल्या दिवंगत आई-बाबांची आठवण दाटून येते. गळा कोरडा होतो. मुलाला कळत नाही पित्याचे डोळे आनंदातही का पाणावतात ते! मलाही आठवतं, हॉस्टेलवरून बऱ्याच दिवसांनी घरी यायचो तेव्हा आई एकटक मला पाहात राहायची. गालावरून हात फिरवणाऱ्या आजीचे हात खूपच थरथरायचे. आज माझ्या मुलाला जे समजत नाही तेच मलाही त्यावेळी उमजलं नाही.

वाद प्राधीकरण व वाळूज महानगराचा
औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील २८ खेडय़ांचा विकास करण्यासाठी सिडको प्राधीकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्राधीकरणाला नियोजन आणि नियंत्रणाचे अधिकार देण्यात आले आहेत. याचे बीजभांडवल राज्य सरकार देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीबाहेरचा विकास करण्याचे काम या प्राधीकरणाचे असणार आहे. विकास आराखडा तयार करून आणि त्याची अंमलबजावणी करणे ही दोन्ही कामे प्राधीकरणाकडे असणार आहे. पाणी, ड्रेनेज, रस्ते, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी घरे, उद्याने, मैदाने, शाळा, दवाखाने, अग्निशमन केंद्र आणि मोकळ्या जागा आदी सुविधा उभारण्याची जबाबदारी प्राधीकरणावर असणार आहे. सुमारे १६ हजार ८०० हेक्टर जमीन प्राधीकरण आरक्षित करणार आहे. सातारा, देवळाई, कृष्णापूर, तुळजापूर, पिसादेवी, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, दौलतपूर, बागतलाव, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, गेवराई तांडा, गेवराई, सैजतपूर, अंतापूर, मल्हारपूर, कच्चीघाटी, मांडकी, गोपाळपूर या गावांमधील शेतकऱ्यांनी या आरक्षणाला विरोध केला आहे. वापरातील जमिनीच्या आरक्षणाला त्यांचा मूळ विरोध आहे.

कोलकात्याची डबलसीट सैर!
‘मुंबई नगरी बडी बाका’ हे खरंच, पण ‘सिटी ऑफ जॉय’ असं जिचं वर्णन केलं जातं, ती कोलकाता नगरीही काही कमी नाही. कला, साहित्य, संस्कृती आणि संगीत आदी क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण योगदान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या या राजधानीविषयी इतर भारतीयांप्रमाणेच सर्वसामान्य मराठी माणसांनाही कायम कुतूहल वाटत आले आहे. मोटारसायकलवरून रोम, तसेच आफ्रिका खंडात सफर करणारे प्रवीण कारखानीस तेथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत पाच वर्षे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. मुळातला साहसी आणि भटका स्वभाव असल्याने प्रवीण कारखानीसांनी बंगालमध्ये मनसोक्त भटकंती केली. विविध लेखांमधून त्यांनी त्यांचे अनुभव आणि निरीक्षणे नोंदवून ठेवली. कोलकात्यात येत्या ७ व ८ फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या ७५ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ‘हावडा-ब्रिजवरून..’ नामक त्यांच्या या लेख संग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे त्यांच्या मोटारसायकलवर बसून केलेली कोलकात्याची सैरच आहे. मराठीतले पहिले पुस्तक- सिंहासन बत्तीशी १८१४ मध्ये बंगालमधील श्रीरामपूरच्या छापखान्यात छापले गेले. प्रवीण कारखानीसांचे हे नवे पुस्तक तयार झाले महाराष्ट्रात, मात्र प्रकाशन समारंभ बंगालमध्ये होणार आहे.
रवींद्रनाथ टागोर शरदचंद्र, सत्यजित राय, नेताजी सुभाषचंद्र बोस, मदर टेरेसा, भारताला ‘वंदे मातरम्’ हे अजरामर गीत देणारे बंकिमचंद्र चटोपाध्याय, विक्रमी वेळेत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा पराक्रम करणारे मिहीर सेन, जगातील सर्वात मोठी शाळा असा लौकिक साऊथ पॉइंट हायस्कूल, स्वामी विवेकानंद, त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस, देशात छापले गेलेले सर्व भाषेतील जवळ जवळ सर्व पुस्तके असणारी अलीपूरची नॅशनल लायब्ररी, तेथील फुटबॉल प्रेम, एकाच वेळी कालीमातेवर आणि कम्युनिस्ट विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारे तेथील समाजमन या साऱ्याचा अत्यंत रोचक शैलीत प्रवीण कारखानीस वाचकांना परिचय करून देतात.
कोलकात्याला बदली झालचे समजल्यावर या साहसी वीराने ट्रेन किंवा प्लेनने न जाता स्वत:च्या मोटारसायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. १९८१ ते ८६ अशी पाच वर्षे ते कोलकात्यात होते. परतीचा प्रवासही त्यांनी अर्थातच मोटारसायकलवरून पण वेगळ्या मार्गाने केला. कोलकात्यातील या वास्तव्यात तेथील महाराष्ट्रीयनाबरोबरच बंगाल्यांशीही त्यांचा स्नेह जुळला. त्या आठवणींचा एक उत्तम कोलाज म्हणजे त्यांचे हे नवे पुस्तक.
प्रशांत मोरे
moreprashant2000@gmail.com