Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

कंत्राटदारांवर दबाव आणल्याप्रकरणी तीन नगरसेवकांना नोटीस
‘टेंडर सेल’मधील गैरप्रकार अद्यापही सुरूच
पुणे, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिकेच्या ‘टेंडर सेल’मध्ये गुंडगिरी करून तेथील प्रक्रिया ताब्यात घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आज पक्षाच्या तीन नगरसेवकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. ‘टेंडर सेल’मधील गैरप्रकार अद्यापही सुरूच असून आजही तेथे जोरदार वादंग, भांडणे वगैरे प्रकार झाले.

टोळ्यांची गुंडगिरी
मुकुंद संगोराम

पुणे महापालिकेत असलेला महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा गेले काही दिवस खिन्न अवस्थेत आहे. त्यांच्या डोळ्यासमोर तिथे जे काही चालले आहे, ते त्यांना सक्तीने पाहावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांची खिन्नता अधिकच वाढली आहे. जनतेच्या प्रश्नांवर पालिकेवर येणारे मोर्चे वेगळे आणि पालिकेच्या आवारात टोळीयुद्धाच्या सदृश परिस्थिती निर्माण होणे वेगळे. आदिमानवाच्या काळात एकमेकांवर अधिकार गाजवण्यासाठी टोळ्या एकमेकांची माणसे मारून जरब बसवीत असत.

नगरसेवक काची यांच्यावर खटला दाखल करण्यास आता आयुक्तांचीच परवानगी
एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप,

सुनील माळी
पुणे, ४ फेब्रुवारी

एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक राजन काची यांच्यावर खटला दाखल करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने फेटाळला असला तरी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आपल्या अधिकारात काची यांना न्यायालयात खेचण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे. आयुक्तांनी अशी खंबीर भूमिका घेतल्याने आता काची यांच्या विरोधात लाच घेतल्याचा खटला पोलिसांना न्यायालयात दाखल करता येणार आहे.

पिंपरीत स्थायी समितीसाठी एक महिन्याचा सभापती ?
वाघेरे यांच्यासह आठ सदस्य निवृत्त; इच्छुकांची भाऊगर्दी

पिपरी, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पिपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षा उषा वाघेरे यांच्यासह आठ सदस्य निवृत्तीच्या मार्गावर असून आपल्याला ‘स्टॅंिडग’ मिळावी, यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. वाघेरे यांच्या निवृत्तीनंतर नवीन सभापती होईपर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरता सभापती करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा उषा वाघेरे यांच्यासह शरद बोऱ्हाडे, अमर मूलचंदाणी, सुलभा उबाळे, काळुराम पवार, अजित गव्हाणे, अलका यादव, नाना काटे हे आठ सदस्य येत्या एक मार्चला निवृत्त होत आहेत.

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
पिंपरी ४ ,फेब्रुवारी/ प्रतिनिधी

सांगवी भागाला पाणीपुरवठा करणारी नवी जलवाहिनी चाचणी सुरु असताना आज दुपारी चिंचवड येथे फुटल्याने या परिसरात लाखो लिटर्स पाणी वाया गेले. पालिकेच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चिंचवड येथील पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स दुकानासमोरील चौकात सुरु आहे. वाल्हेकरवाडीकडून थेट सांगवी पाणी टाकीपर्यंत ही वाहिनी टाकण्याचे काम गेले काही दिवस सुरु आहे. दुपारी जलवाहिनी चाचणीचे काम सुरु होते.पाण्याचा दाब वाढून जलवाहिनी फुटून उंच फवारे उडू लागल्याने या भागातील रस्ता जलमय झाला होता. परिसरातील रस्यांवर वाहतुकीचाही प्रचंड खोळंबा झाला.

संस्कृत संमेलन सहा फेब्रुवारीपासून
पुणे, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्रीबालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या वतीने येत्या सहा ते आठ फेब्रुवारी दरम्यान ‘त्रिदिवसीय संस्कृत संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य संस्कृत स्थायी समितीच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत वेदपाठशाळा, महाविद्यालये, विद्यापीठांतील संस्कृत विभाग, संस्कृत अध्यायन केंद्र व संस्कृतप्रेमी यांच्याकरिता या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदाशिव पेठेतील उद्यानप्रसाद कार्यालयामध्ये सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रा. विश्वनाथ कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्कृतच्या कार्याबद्दल दिला जाणारा इंदिरा बेहरे पुरस्कार यंदाच्या वर्षी डॉ. ग. उ. थिटे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष व स्थायी समितीचे संघटक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संस्कृतचे सद्य:स्थितीतील स्थान, राष्ट्रीय ऐक्यता, भाषिक एकता, प्रसार व प्रचार, संस्कृत शिकवताना येणाऱ्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार आहे, असेही बिराजदार यांनी यावेळी सांगितले.

बचतगट बँक जोडणीत पुण्याचा अव्वल क्रमांक
पुणे, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

बचतगटांच्या बँकजोडणीचे चांगले काम केल्याबद्दल पुणे जिल्ह्य़ाची ‘उत्कृष्ट कामगिरी पुरस्कारा’साठी राष्ट्रीय ग्रामीण व कृषी विकास बँकेने (नाबार्ड) केली आहे. पुणे जिल्ह्य़ाला गतवर्षीच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला असून जिल्ह्य़ातील १० हजार बचतगटांची बँकजोडणी झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत सुमारे चाळीस हजार बचतगट स्थापन झाले आहेत. या बचतगटांपैकी १० हजार ५६९ बचतगटांची बँकजोडणी होऊन त्यांना कर्ज मिळाले आहे. पुणे जिल्ह्य़ाने बँकजोडणीचे हे उत्कृष्ट काम केल्यामुळे नाबार्डने या पुरस्कारासाठी जिल्ह्य़ाची निवड केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण १३ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे.

लायन्स क्लबच्या वतीने १५ फेब्रुवारीला सायकल रॅलीचे आयोजन
पुणे, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लायन्स क्लब पुणे सायकल प्रतिष्ठानच्या वतीने १५ फेब्रुवारी हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्यात यावा, यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते साडेनऊ दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लबचे राज मुछाल व डॉ. दिलीप सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सायकल हे दळणवळणाचे मुख्य साधन असून आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी सायकलचा वापर किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे.
‘सायकल वापरा, प्रदूषण टाळा व फुफ्फुस वाचवा,’ हे रॅलीचे ब्रीदवाक्य राहील. यामध्ये शहरातील शंभरहून अधिक शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र देण्यात येणार असून, ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त असेल त्या शाळेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल, असे मुछाल म्हणाले. शहरातील पाच भागांतून ही रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये कोथरुड येथील शिवाजी पुतळा, बालाजीनगर येथील विवेकानंद पुतळा, नाना पेठेतील क्वार्टर गेट, बंडगार्डन येथील पुणे सेंट्रल आणि पुणे विद्यापीठ या ठिकाणाहून ही रॅली निघून नऊ वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मैदान येथे संपेल. या वेळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुछाल यांनी सांगितले.

पोलिसालाच गंडा घालणाऱ्या बहाद्दरास अटक, कोठडी
पुणे, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बँकेत नोटांचा भरणा करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार चंद्रकांत जगताप यांनाच चोरटय़ाने चक्क अठरा हजार रुपयांना ‘चुना’ लावल्य ोचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमेशचंद्र मोरे यांनी आदेश दिले. जफर शाहनवाज इराणी (वय २३, रा. लोणीकाळभोर, ता. हवेली) असे या बहाद्दराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना ३० एप्रिल २००८ रोजी मार्केट यार्डच्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जगताप हे पैसे भरण्यासाठी बँकेत गेले होते. त्या वेळी रुमालातील पैसे घेऊन गेले होते. त्या वेळी बँकेत स्लिप भरली का, अशी विचारणा आरोपी साथीदारांनी जगताप यांना केली. रुमालातील पैसे मोजण्यास देण्याचा प्रयत्न करीत असताना चोरटय़ांनी ‘चुना’ लावला आणि रक्कम घेऊन गायब झाले. चोरटय़ांना दुसऱ्या गुन्ह्य़ात पोलिसांनी अटक केली असता हा गुन्हा उघडकीस आला. त्याच्याकडून आठ हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली.

ओ.पीं.च्या नावाने मिळालेला पुरस्कार आनंददायी- शमशाद बेगम
पुणे, ४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

हिंदी चित्रपट संगीत सृष्टीमध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल पाश्र्वगायिका शमशाद बेगम यांना या वर्षीच्या ओ. पी. नय्यर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ओ. पी. नय्यर फाउंडेशनचे विश्वस्त नंदू बेलवलकर व रोहन पुसाळकर यांनी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी हा पुरस्कार प्रदान केला. १ किलो वजनाची चांदीची ट्रॉफी व २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याविषयी आनंद व्यक्त करताना बेगम म्हणाल्या की, नुकताच मला पद्मभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे.ओ.पी.ंच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी फार आनंददायी आहे. जुन्या काळात कॅसेट, सीडीसारखी आधुनिक साधने नसतानासुद्धा मी गायिलेल्या गाण्यांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशा बेलवकर म्हणाल्या की, हा पुरस्कार खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरेल.