Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

राज्य

खरेदीखतासाठीचा १४ वर्षांचा ‘वनवास’संपला!
औरंगाबाद, ४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाने पैसे घेऊनही घराचे खरेदीखत करून दिले नाही. त्यासाठी चौदा वर्षे लढा देणाऱ्या व्यावसायिकाचा ‘वनवास’ अखेर संपला आणि त्याला न्याय मिळाला!
बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची कशी छळणूक करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक सतीश लक्ष्मण कुलकर्णी व त्यांची पत्नी स्नेहल सतीश कुलकर्णी यांनी ज्योतीनगरमध्ये ‘नागपाल बिल्डर्स’च्या ‘इंद्रप्रस्थ एनक्लेव्ह’मध्ये २८ ऑक्टोबर १९९३ रोजी ४ लाख रुपये किमतीचा बंगला करार करून घेतला.

आयुर्वेद अभ्यासक्रमात चौपट शुल्कवाढीची ‘कडू मात्रा’!
आशिष पेंडसे
पुणे, ४ फेब्रुवारी

अत्यवस्थ आयुर्वेद महाविद्यालयांची तब्येत सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्याच खिशाला कात्री लावण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. सहाव्या वेतन आयोगाचा बोजा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी शासकीय, अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांमधील शुल्क सात हजार रुपयांवरून ३० हजारांपर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील आयुर्वेद शिक्षण-संशोधन क्षेत्रातील समस्यांबाबत विचार करण्यासाठी मुंबईत आज उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

बेळगावप्रश्नी केंद्राने समानतेचा हक्क डावलल्याची महाराष्ट्राची तक्रार
केरळ, गुजरात व आंध्रला प्रतिवादी करणार
पुणे, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
बेळगावप्रश्नी केंद्र सरकारकडून समानतेचा हक्क डावलला जात असल्याची तक्रार महाराष्ट्र सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात एका पुरवणी अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. या तक्रारीबरोबरच केरळ, गुजरात व आंध्र प्रदेश सरकारलाही या दाव्यामध्ये प्रतिवादी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे.
बेळगाव, कारवार, बिदर आणि निपाणीसह ८६४ गावांचा समावेश करण्यासाठी कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्राचा न्यायालयीन लढा सुरू आहे. यासंदर्भात येत्या १८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

वाडय़ाच्या शहीद स्मारकाची उभारणी प्रगतिपथावर
ठाणे ,४ फेब्रुवारी /प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर वाडा येथे भव्य शहीद स्मारकाची उभारणी सध्या प्रगतिपथावर असून राजस्थान येथील विख्यात वास्तुकलाकार त्यावर अखेरचा हात फिरवित आहेत. ‘व्यर्थ न हो बलिदान’ असा संदेश देणारे हे स्मारक म्हणजे भावी पिढय़ांच्या दृष्टीने महन्मंगल तीर्थ बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिंगडा यांनाही हवा भिवंडी मतदारसंघ!
ठाणे, ४ फेव्रुवारी /प्रतिनिधी

चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले खासदार दामू शिंगडा यांना मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या पालघर (राखीव)मधून निवडून येणे सहजशक्य नसल्याने ते आता भिंवडीतून निवडणूक लढण्यास उत्सुक असून काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र त्यास जोरदार विरोध दर्शविला आहे. पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून दामू शिंगडा विजयी होत ते प्रामुख्याने भिवंडीतील मतांमुळेच.

रायगड जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन गैरहजर
नागरिक, पत्रकार आणि राजकीय कार्यकर्त्यांनी केले पंचनामे
अलिबाग, ४ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कार्यालयात नियोजित वेळेत उपस्थित नसतात, तर अनेक वरिष्ठ अधिकारी बेकायदेशीररीत्या आपल्या मुख्यालयाच्या क्षेत्राच्या बाहेर गेलेले असतात. परिणामी, जनसामान्यांची कामे खोळंबून त्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो़ या पाश्र्वभूमीवर पत्रकार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी संयुक्तरीत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन ‘अधिकारी उपस्थितीचे पंचनामे’ केले ...

किरकोळ कारणावरून हत्या; बापलेकासह तिघांना अटक
बदलापूर, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

अंबरनाथ येथे किरकोळ कारणावरून खून झाल्याप्रकरणी बापलेकासह अन्य एकास अटक करण्यात आल्याचे शिवाजी नगर पोलिसांनी सांगितले. कैलासनगर भागात डायमंड टॉवर येथे चंद्रशेखर कुलकर्णी (४४) हा बांधकामावर सुपरवायझरचे काम पाहत होता. त्याचे आणि बद्रीनाथ सोसायटीत वॉचमेनचे काम करणाऱ्या बाळकृष्ण सोनगरे यांच्यात किरकोळ वादावादी झाली. याचा राग येऊन बाळकृष्ण सोनगरे याने मंगळवारी आपला मुलगा राजेश (२६) याला हा प्रकार सांगितला. राजेश सोनगरे आपल्या वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या चंद्रशेखरचा राग मनात धरून मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जयंत यांच्या मदतीने चंद्रशेखरच्या डोक्यात सिमेंट काँक्रिटचा वजनी गोळा फेकून मारला. त्यात चंद्रशेखर जागीच मरण पावला असे पोलिसांनी सांगितले.मृत चंद्रशेखरचा लहान भाऊ अजय कुलकर्णी याने याबाबत तक्रार देताच बाळकृष्ण सोनगरे, रुपेश सोनगरे आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. डी. डांगे अधिक तपास करीत आहेत.

डॉक्टराला लुटणाऱ्या दुकलीला अटक
ठाणे,४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ईमेलद्वारे अमेरिकेतील हेल्थकेअर सेंटरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कल्याणच्या एका डॉक्टरला एक लाख ९४ हजार रूपयांना गंडा घालणाऱ्या नार्जेरीयन तरूणासह मुंबईतील महिलेला पोलिसांनी अटक केली असून या टोळीत आणखी काही विदेशी नागरिक सामील आहेत काय, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत घुले यांनी दिली.
रामबागमधील डॉक्टर साईनाथ जगन्नाथ डोईफोडे यांची फसवणूक करणारा नार्जेरियन तिबक्नो झिलेस्ले (२४) आणि एलिझाबेथ जिस्सोनो (४७) रा. कलिना, सांताक्रुझ यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. डॉ. डोईफोडे यांनी ३१ जानेवारीला दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. अमेरिकेतील क्रिझ हेल्थ केअर कंपनीत डॉक्टरची नोकरी असल्याचा ई-मेल मिळाल्यानंतर डोईफोडे यांनी पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. व्हिसा, तिकीट व इतर कागदपत्रांसाठी एक लाख ९३ हजार ५०० रूपये खर्च सांगण्यात आला. डॉक्टरांनी ती रक्कम बँक ऑफ बडोदाच्या कलिना शाखेत जमा केली. काही दिवस उलटूनही काही प्रगती न झाल्याने डॉक्टरांनी ईमेल व मोबाईलद्वारे संपर्क साधला. तेव्हा आणखी दोन लाखांची मागणी करण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार डोईफोडे यांच्या लक्षात आला आणि थेट महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॅंकेतील एलिझाबेथच्या खात्यावरून पत्ता मिळवून आरोपींना गजाआड केले.

रात्रीचा गारठा अन् दुपारच्या उकाडय़ाने नागरिक हैराण
पुणे, ४ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

हवामानातील चढ-उतार सुरूच असून, सध्या रात्रीचा गारठा अनुभवतानाच दुपारी उन्हाचा कडाका सहन करावा लागत असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात हीच स्थिती आहे. दिवसा व रात्रीच्या तापमानातील मोठय़ा फरकामुळे घशाचा संसर्ग, ताप, सर्दी अशा आरोग्याच्या समस्यासुद्धा वाढल्या आहेत. राज्यात दोन दिवसांपूर्वीपर्यंत उबदार वातावरण होते. थंडीचे दिवस आहेत का, असा प्रश्न पडावा इतके वेगळे हवामान होते. आता मात्र हवामानात अचानक बदल झाले असून, रात्रीच्या वेळी थंडी अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आणि दुपारी नोंदवले जाणारे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस हवामानाची अशीच स्थिती राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

लाच मागणारा पोलीस नबिलाल मुल्ला याला लाच घेताना रंगेहाथ अटक
अलिबाग, दि़ ४ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

हुंडय़ासाठी पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा दाखल करू नये, यासाठी एक जिवंत कोंबडा आणि दहा हजार रुपये अशी लाच मागणारा पनवेल पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नबिलाल जिलानी मुल्ला यास दोन हजार रुपयांची लाच पोलीस ठाण्याच्याच आवारात घेताना आज संध्याकाळी रंगेहाथ अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत घोडके यांच्या पथकास यश आले आहे. पनवेलजवळच्या वांगणी तळोजा गावातील मंगल रामा भगत याचा भाऊ बुध्या रामा भगत याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर हुंडय़ासाठी पत्नीचा छळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करू नये, यासाठी एक जिवंत कोंबडा आणि दहा हजार रुपयांची मागणी मुल्ला याने मंगल रामा भगत याच्याकडे केली होती. मोलमजुरी करणारे हे आदिवासी कुटुंब या मागणीमुळे हादरून गेले. त्यात तडजोड करण्यासाठी मंगल रामा भगत व त्याच्या नातेवाईकांना मुल्लाने आज बोलावले होते. या संदर्भात मंगल भगत याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आजच सकाळी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर भागवत, नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मोरे, गावंड, तावडे यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

तळोजा येथे पोलिसांशी चकमक; दोन गुंड ठार
नवी मुंबई व पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई
पनवेल, ४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पुणे गुन्हे अन्वेषण शाखा व नवी मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी तळोजा येथे केलेल्या कारवाईत मुवीन सय्यद शेख (वय ३५) व त्याचा एक साथीदार, असे दोन गुंड ठार झाले. पुणे पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला, चार खुनांसह एकूण २८ गुन्ह्य़ांची नोंद असणाऱ्या मुवीनला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. बुधवारी दुपारी तो साथीदारासह तळोजा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे व नवी मुंबई पोलिसांनी पनवेल-मुंब्रा मार्गावर टोलनाक्याजवळ सावळा रचला. इंडिका गाडीतून आलेल्या मुवीनला पोलिसांनी शरण यायला सांगितले; परंतु त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो व त्याचा साथीदार जखमी झाले. वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात या दोघांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुवीनच्या साथीदाराचे नाव समजू शकले नाही.