Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९

क्रीडा

विक्रमापेक्षा राखीव खेळाडूंना संधी देण्याला प्राधान्य -धोनी
कोलंबो, ४ फेब्रुवारी / पी. टी. आय.

सलग तीन विजयांसह यजमान श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकल्याने आता सलग नऊ विजयांच्या विक्रमाच्या मागे न लागता उर्वरित दोन लढतींमध्ये राखीव खेळाडूंना संधी देण्यालाच आपण पसंती देऊ, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत श्रीलंकेवर १४७ धावांनी विजय मिळवत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी तर घेतलीच शिवाय सलग आठ एकदिवसीय लढती जिंकण्याच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी हरभजन सज्ज
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

स्नायूंच्या दुखातींमुळे श्रीलंका दौऱ्याला मुकलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हा पुर्णपणे फिट झाला असून आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले आहे.
मी दुखापतीतून आता चांगलाच सावरलेलो आहे. प्रशिक्षणाला मी सुरूवात केली असून नेट्समध्येही चांगला सराव होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मला बऱ्यापैकी सरावासाठी वेळ मिळाला असून त्याचा फायदा मला नक्कीच होईल, असे हरभजनने सांगितले.

आयपीएलमध्ये खेळण्यास क्रिकेट मंडळाचाच विरोध
वसीम अक्रम यांचा आरोप
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी / पीटीआय
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमिअर लिग स्पर्धेत खेळण्यापासून क्रिकेट मंडळच परावृत्त करत असल्याचा आरोप माजी गोलंदाज वसीम अक्रम यांनी केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा मात्र खेळण्यास विरोध नसल्याचे अक्रम यांनी स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा काहीही विरोध नसताना केवळ क्रिकेट मंडळाने विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे अक्रम यांनी नमूद केले आहे.

दादागिरी पुन्हा पाहायला मिळणार
कोलकाता, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितीजावरून हरपलेला आणि ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी बिरूदावली मिळविणारा सौरव गांगुलीला आता पुन्हा एकदा मैदानाावर पाहण्याची संधी सर्व क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. १५ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या रणजी एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यांमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या सौरवची ‘दादागिरी’ पाहायला मिळेल.

प्रशिक्षकाने निवडप्रक्रियेत लुडबुड करू नये
असलम शेरखान यांनी हरेंद्रसिंग यांना सुनावले
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी / पीटीआय
प्रशिक्षकाने केवळ त्याचे काम करावे, उगाच निवड समितीच्या कामात लुडबुड करू नये, असे भारतीय हॉकी निवड समितीचे हंगामी सदस्य असलम शेरखान यांनी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांना सुनावले.
सध्या सुरू असलेल्या पंजाब गोल्ड चषक हॉकी स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील काही जेष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर शेरखान यांनी टीका केली होती.

पश्चिम आणि दक्षिण विभाग आमने-सामने
दुलीप करंडक
चेन्नई, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

दुलीप करंडकाच्या उपान्त्य फेरीतील सामन्यांमध्ये पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग या दोन्ही संघांनी एकहाती विजय मिळविल्याने उद्यापासून होणारा अंतिम सामना चांगलाच रंगण्याची शक्यता क्रिकेट रसिकांना आहे. येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने पहिल्या डावात आघाडीच्या जोरावर सामना जिंकण्यासाठी दोन्हीही संघ प्रयत्नशील असतील. उपान्त्य फेरीतील सामन्यात दक्षिण विभाग जलदगतीने धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरला होता. संघातील सलामीवीर रॉबीन उत्थप्पा, कर्णधार एस. बद्रिनाथ आणि राहुल द्रविड हे तिघेही चांगल्याच फॉर्मात आहेत.

सानियाची अनुपस्थिती जाणवली; भारतावर न्यूझीलंडची ३-० मात
फेडरेशन चषक टेनिस
पर्थ, ४ फेब्रुवारी / पीटीआय

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झाची अनुपस्थिती भारतीय संघाला प्रकर्षांने जाणवली आहे. आशिया-ओशनिया गटातील सलामीच्याच लढतीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला आहे.पहिल्या सामन्यात रश्मी चक्रवर्ती मानांकनाच्या बाबतीत डॅनी होलंडपेक्षा सरस होती, पण तिला ३-६, ०-६ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची प्रमुख असलेली चक्रवर्ती पराभूत झाल्यामुळे सारी मदार अंकिता व साना भांब्री यांच्यावर होती. पण अंकिता भांब्रीला मरिना इराकोव्हिककडून २-६, ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला. ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला मग प्रतिष्ठा राखण्यासाठी अखेरची लढत जिंकण्याची गरज होती, पण दुहेरीत साना व अंकिता भांब्री यांना २-६, ३-६ अशी मात सहन करावी लागली. भारतीयांच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघप्रशिक्षक एन्रिको पिपेर्नो नाराज झाले. मुलींनी आपल्या क्षमतेला साजेसा खेळ केला नाही. प्रतिस्पर्धी खेळाडू निश्चितच वरचढ होते पण आमच्या खेळाडूंनी खराब खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारताच्या पदरी अपयश आले.भारताची पुढील लढत इंडोनेशियाशी होणार असून इंडोनेशियाने पहिल्या लढतीत उझबेकिस्तानला नमवून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे भारतापुढे इंडोनेशियाच्या रूपात मोठे आव्हान असेल.

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिका अमिरातीत, पण.
कराची, ४ फेब्रुवारी / पीटीआय

अशांत परिस्थितीमुळे पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास ऑस्ट्रेलियाने नकार दिलेला असल्यामुळे पाकिस्तानने आता पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका संयुक्त अरब अमिरातीत खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. पण या स्पर्धेत जर आयसीएलमध्ये खेळत असलेले पाकिस्तानी खेळाडू खेळणार असतील तर मात्र या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट पसरणार आहे. नुकताच स्थानिक न्यायालयाने आयसीएलच्या खेळाडूंवरील बंदी पुढील सुनावणीपर्यंत उठविण्याचा निर्णय दिला होता. एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका व एक ट्वेन्टी-२० सामना आयोजित करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने १९९८पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. शिवाय, या दोन देशांत २००५पासून कोणतीही मालिका झालेली नाही. ऑस्ट्रेलियाशी त्रयस्थ ठिकाणी खेळण्याच्या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटपटूंनी मात्र नाराजी प्रकट केली आहे.

हेडनचा वारसदार कोण?
मेलबर्न, ४ फेब्रुवारी / पीटीआय

मॅथ्यू हेडनच्या निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार याचा निर्णय निवड समितीने लवकरात लवकर घ्यावा, यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने पिच्छा पुरविला आहे.
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तसेच अ‍ॅशेस मालिकेसाठीही संघ निवडताना निवड समितीने जो योग्य सलामीवीर वाटेल त्याची झटपट निवड करण्याची तयारी करावी.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची उद्या घोषणा होणार आहे. सायमन कॅटिचच्या साथीला फिलिप ह्युजेस, फिल जेक्स यांच्या नावांचा सलामीवीर म्हणून विचार होण्याची शक्यता आहे. ह्यूजेसने शेफिल्ड शिल्ड स्थानिक क्रिकेट स्पर्धेत १५१ आणि नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. तर जेक्सनेही दुखापतीमुळे क्रिकेटपासून दुरावण्यापूर्वी खेळलेल्या शेवटच्या कसोटीत शतक ठोकले होते. पॉन्टिंगने या दोघांचेही कौतुक केले आहे.