Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

विक्रमापेक्षा राखीव खेळाडूंना संधी देण्याला प्राधान्य -धोनी
कोलंबो, ४ फेब्रुवारी / पी. टी. आय.

 

सलग तीन विजयांसह यजमान श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकल्याने आता सलग नऊ विजयांच्या विक्रमाच्या मागे न लागता उर्वरित दोन लढतींमध्ये राखीव खेळाडूंना संधी देण्यालाच आपण पसंती देऊ, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने म्हटले आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत श्रीलंकेवर १४७ धावांनी विजय मिळवत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी तर घेतलीच शिवाय सलग आठ एकदिवसीय लढती जिंकण्याच्या आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. मात्र सलग नऊ लढती जिंकण्याचा विक्रम करण्यापेक्षा या मालिकेत ज्या खेळाडूंना अद्याप खेळायला मिळालेले नाही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी देणे महत्त्वाचे आहे, असे धोनीने सामन्यानंतर बोलताना सांगितले. युवराज सिंग (११७) व विरेंद्र सेहवाग (११६) यांच्यातील २२१ धावांची भागीदारीच या लढतीत निर्णायक ठरल्याचे धोनीने सांगितले. श्रीलंकन गोलंदाजांच्या चांगल्या चेंडूंवरही आक्रमक फटके खेळत या दोघांनी त्यांना चुका करायला भाग पाडले, असेही त्याने पुढे म्हटले आहे.
दरम्यान, यजमान संघाचा कर्णधार महेला जयवर्धने यानेही युवराज-सेहवागच्या फलंदाजीचे कौतुक करून त्यांनी आमच्या गोलंदाजांवर जबरदस्त दडपण आणल्याची व या हल्ल्यातून आमचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही, अशी स्पष्ट कबुली दिली. या पराभवातही काही गोष्टी आमच्यासाठी सकारात्मक असून, मालिका गमावली असली तरी उर्वरित दोन लढती जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगितले. या लढतीत सामनावीर किताब मिळविणाऱ्या युवराज सिंगने या वेळी आपला सहकारी सेहवागलाही धन्यवाद दिले आणि हा पुरस्कार दोघांमध्ये विभागून घ्यायला आपल्याला आवडेल, असे त्याने म्हटले आहे. सेहवागने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करून माझ्या खांद्यावरील दडपण दूर करण्यास मदत केली. प्रत्येक वेळी मोठय़ा भागीदारीत एक सहकारी आक्रमक खेळताना दुसरा फलंदाज निव्वळ त्याला साथ देण्याची भूमिका निभावतो; पण आमच्या कालच्या भागीदारीत दोन्ही बाजूंनी धावफलक सातत्याने हालत राहिला, असे युवराजने सांगितले.

ट्वेन्टी-२० लढतीसाठी जयवर्धनेला वगळले; कर्णधारपदी दिलशान
भारताविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी श्रीलंका संघ आज जाहीर झाला आहे. निवड समितीने नियमित कर्णधार महेला जयवर्धने आणि उपकर्णधार कुमार संगकारा यांना वगळण्याचा निर्णय घेतला असून तिलकरत्ने दिलशानची कर्णधारपदी नियुक्त करण्यात आली आहे. चामरा कपुगेदराकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून त्याला १० फेब्रुवारीला होणाऱ्या या लढतीसाठी १५ खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले आहे. मुथय्या मुरलीधरन, अजंथा मेंडिस आणि नुवान कुलसेखरा यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रीलंका संघ :- तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), सनथ जयसूर्या, जेहान मुबारक, चामरा कपुगेदरा, चामरा सिल्वा, इंडिका डे सरम, लसिथ मलिंगा, दिलहारा फर्नान्डो, फरवीझ महारूफ, कौशल वीररत्ने, मलिंगा बंदारा, जीवंथा कुलतुंगा, दिलहारा लोकुहेट्टीगे, महेला उदवत्ते, थिलन तुषारा.