Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

न्यूझीलंड दौऱ्यासाठी हरभजन सज्ज
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

 

स्नायूंच्या दुखातींमुळे श्रीलंका दौऱ्याला मुकलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हा पुर्णपणे फिट झाला असून आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले आहे.
मी दुखापतीतून आता चांगलाच सावरलेलो आहे. प्रशिक्षणाला मी सुरूवात केली असून नेट्समध्येही चांगला सराव होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मला बऱ्यापैकी सरावासाठी वेळ मिळाला असून त्याचा फायदा मला नक्कीच होईल, असे हरभजनने सांगितले.
महान लेग स्पिनर आणि माजी कर्णधार अनिल कुंबळेने निवृत्ती पत्करल्यानंतर हरभजन हा संघातला वरीष्ठ फिरकीपटू बनला आहे आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज असल्याचेही त्याने सांगितले आहे.
जे काही सामने मी भारतासाठी खेळलो ते जबाबदारीनेच खेळलो. आता अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर माझ्यावर जबाबदारी वाढली असली तरी ती पेलण्यास मी सक्षम आहे, असेही त्याने यावेळी सांगितले.
महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंडड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. हरभजनच्या अनुपस्थीतीमध्ये भारताने श्रीलंकेमधल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये ३-० अशी आघाडी घेतलेली आहे.
श्रीलंकेतले यश हे संघभावनेने क्रिकेट खेळण्यानेच मिळाले आहे. भारतीय संघाने तिथे चांगलीच कामगिरी केलेली आहे. खासकरून मेंडिस आणि मुरलीधरन यांच्यावर जो भारतीय फलंदाजांनी हल्ला केला तो वाखाडण्याजोगाच आहे. गेल्या वर्षभरात मेंडिसच्या गोलंदाजीमध्ये चांगलीच प्रगती झालेली दिसते. पण भारतीय फलंदाजांनी ज्याप्रमाणे त्याला हाताळले ते खरच पाहण्यासारखे होते, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा भारताच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे पॅव्हेलियनमधले वातावरण कमालीचे सकारात्मक झाले आहे. प्रत्येक खेळाडूकडे ते जााणीवपूर्वक लक्ष देत असून त्यांच्यामुळे प्रत्येकाच्या खेळात अमुलाग्र बदल झाला आहेत.