Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, ५ फेब्रुवारी २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएलमध्ये खेळण्यास क्रिकेट मंडळाचाच विरोध
वसीम अक्रम यांचा आरोप
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी / पीटीआय

 

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमिअर लिग स्पर्धेत खेळण्यापासून क्रिकेट मंडळच परावृत्त करत असल्याचा आरोप माजी गोलंदाज वसीम अक्रम यांनी केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा मात्र खेळण्यास विरोध नसल्याचे अक्रम यांनी स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचा काहीही विरोध नसताना केवळ क्रिकेट मंडळाने विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे अक्रम यांनी नमूद केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालय व मंडळावर सोपविला होता. असे असूनही खेळाडूंना या स्पर्धेपासून परावृत्त करणे योग्य नसल्याचे अक्रम यांनी सांगितले. अशा मुर्खपणाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानची पिछेहाट झाली आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवरही अक्रम यांनी टीका केली. अभिनेते, क्रिकेटपटू, गायक हे राजकारणी नाहीत. त्यामुळे त्यांना सुरक्षिततेची चिंता कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चॅम्पियन स्पर्धेचे यजमानपद गमावल्याबद्दलही अक्रम यांनी मंडळाचा खरपूस समाचार घेतला. सुरक्षिततेच्या कारणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. अक्रम म्हणाले, ‘‘सप्टेंबरमध्ये स्पर्धेचे यजमापद पाकिस्तान गमावणार याची चाहूल लागली होती. त्याचवेळी सहभागी राष्ट्रांची मनधरणी करुन त्यांना सुरक्षिततेसंबधी आश्वस्त करणे गरजेचे होते. मात्र मंडळाने याकडे दुर्लक्ष केले. काही खेळाडूंना सहभागी होणाऱ्या देशांमध्ये पाठवून देशातील सुरक्षिततेची खात्री पटवून देता आली असती. ’’ चॅम्पियन स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे महत्त्व कमी झाले आहे.
माजी कर्णधार इंझमाम - उल- हक व पंच डॅरेल हेअर यांच्यावरही अक्रम यांनी टीकास्त्र सोडले. इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात ओव्हल येथे कसोटी सामन्यादरम्यान वाद झाला होता. त्यावेळी हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला होता. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हस्तक्षेपानंतर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते.
चेंडू कुरतडल्याच्या वादामुळे कर्णधार इंझमाम- उल- हक याने सामना अर्धवट सोडला होता. याची आठवण करुन देत ते म्हणाले, ‘‘हेअर यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. ओव्हलमधील परिस्थिती वेगळ्या पद्धतीनेही सांभाळता आली असती. यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे जगात हसे झाले आहे.’’